आनंदराज आंबेडकर यांचा टोला; बाबासाहेबांच्या नवभक्तांवरही टीका

रामदास आठवलेंना आपले जहाज जेव्हा बुडेल असे वाटते तेव्हा त्यांना अचानक रिपब्लिकन ऐक्याची उपरती होते. आम्ही काय जनावरे नाहीत जी एका गोठय़ात बांधाल आणि कशीही हाकाल, अशी खरमरीत टीका रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी बदलापुरात केली. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बदलापुरात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आठवलेंवर निशाणा साधला.

काही दिवसांपूर्वी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी सर्व रिपब्लिकन पक्षांना एकत्र येण्याचे आमंत्रण दिले होते. रिपब्लिकन ऐक्यासाठी मी एक पाउल मागे येण्यासही तयार आहे, असेही ते म्हणाले होते. तसेच शक्यता भासल्यास प्रकाश आंबेडकर यांना सामूहिक नेतृत्वाचे अध्यक्षपद देण्यासही मी तयार आहे, असेही आठवले म्हणाले होते. या विषयावर प्रतिक्रिया विचारली असता आनंदराज आंबेडकर यांनी आठवलेंवर टीका केली. रिपब्लिकन नेते काही गोठय़ातली जनावरे नाहीत. कुणीही हाका, गोठय़ात एकत्र बांधा. आठवलेंचे जहाज बुडू लागताच त्यांना रिपब्लिकन ऐक्याची जाणीव होते. त्यामुळे त्यांच्या अशा आवाहनांकडे आम्ही दुर्लक्ष करतो, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सत्तेसाठी लाचारी करण्याची बाबासाहेबांच्या अनुयायांची संस्कृती नाही. आम्ही जे मिळवतो ते हक्काने असा टोला आंबेडकर यांनी यावेळी आठवलेंना लगावला. बदलापुरातील जाहीर कार्यक्रमा वेळी बोलताना तृप्ती देसाई यांच्या आंदोलनावरूनही सरकारवर टीका केली. स्वातंत्र्यानंतरही महिलांना समानतेचे अधिकार मिळत नाही ही लाजिरवाणी गोष्ट असल्याचेही त्यांनी नमूद केले.

संघाला टोला

सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त अनेक नव भक्त दिसू लागले आहेत. महत्त्वांच्या विषयांना बगल देत भारत माता की जय बोला म्हणून आंदोलन करायचे आणि स्वतच्या कार्यालयावर मात्र साधा तिरंगा फडकवायचा नाही, हा दुटप्पीपणा आहे, असा टोलाही संघाला यावेळी लगाविला.