५००० पोलिसांचा फौजफाटा तैनात; ३५० गणेशोत्सव मंडळे, ध्वनिक्षेपक व्यावसायिकांना नोटिसा

ठाणे : अनंत चतुर्दशीच्या दिवशी करोना नियमांचे उल्लंघन होऊ नये तसेच अप्रिय घटना टाळण्यासाठी ठाणे पोलीस  चोख बंदोबस्त ठेवणार आहेत. सुमारे ५००० पोलिसांचा फौजफाटा गणेश विसर्जन घाट, शहरातील रस्त्यांवर तैनात करण्यात येणार आहे. पोलिसांनी ३५० गणेशोत्सव मंडळे आणि ध्वनिक्षेपक, ढोलताशे व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या आहेत. विसर्जनस्थळी श्वान पथके, बॉम्बशोधक पथकाकडून पाहणी सुरू असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.

करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या धोक्यामुळे या वर्षीही गणेशोत्सवावर राज्य सरकारने निर्बंध लागू केले आहेत. या र्निबधांमुळे मंडळांना विसर्जन मिरवणुका काढता येणार नाहीत. त्यामुळे नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी ठाणे पोलिसांनी आयुक्तालय क्षेत्रात म्हणजेच, ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात सुमारे ५००० पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामध्ये इतर पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील १५० उपनिरीक्षक, शीघ्र कृती दलाची १२० जणांची एक तुकडी, राज्य राखीव पोलीस दलाच्या चार तुकडय़ा, ७०० गृहरक्षक आणि ठाणे पोलीस दलातील ३५०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असा फौजफाटा असणार आहे. शहरातील विसर्जन घाटस्थळी बॉम्बशोधक पथक, श्वानपथकही तैनात आहेत. प्रत्येक २४ तासाने या पथकांकडून विसर्जन घाटाची पाहणी केली जात आहे.

काही दिवसांपासून आयुक्तालय क्षेत्रातील पोलीस ठाण्यांतील हद्दीमधील गणेशोत्सव मंडळांच्या बैठका पोलिसांनी घेण्यास सुरुवात केली आहे. मिरवणुका काढू नका तसेच नियमांचे उल्लंघन करू नये, अशा सूचना पोलीस करत आहेत. करोना नियमांचे उल्लंघन करण्याची शक्यता असलेल्या गणेशोत्सव मंडळांना, ध्वनिक्षेपक व्यावसायिक आणि ढोलताशे पथकांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. करोना नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात अनंत चतुर्दशीनिमित्ताने पोलिसांचा फौजफाटा तैनात असणार आहे. करोना नियमांचे पालन करण्याची सूचना आम्ही गणेशोत्सव मंडळांना केलेली आहे.

– श्रीकृष्ण कोकाटे, उपायुक्त, विशेष शाखा.