सांस्कृतिक आणि कलेची परंपरा असलेल्या बदलापूरकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. रत्नागिरी येथे पार पडलेल्या ५५ व्या महाराष्ट्र संगीत नाटय़ स्पर्धेत बदलापूरच्या अनंत जोशी यांनी संगीत दिग्दर्शनात प्रथम पारितोषिक पटकावले आहे.

५५ वी महाराष्ट्र संगीत नाटय़ स्पर्धा नुकतीच रत्नगिरी येथे पार पडली. त्यात राज्यभरातून एकूण ३१ नाटय़ संस्थांनी आपल्या कलाकृती सादर केल्या. त्यात मुंबईच्या ‘संगीत शांती ब्रह्म’ या नाटय़ातील संगीतासाठी बदलापूरकर अनंत जोशी यांना संगीत दिग्दर्शनासाठी प्रथम पारितोषिक जाहीर झाले. अनंत जोशी हे बदलापूरच्या संगीत विद्यालयाचे विद्यार्थी असून त्यांना त्यांच्या वडिलांचा संगीताचा वारसा आहे. त्यांच्या या यशाने बदलापूरातील संगीत चळवळ आणखी मजबूत झाली आहे, अशी भावना संगीत विद्यालयाचे अनुप जोशी यांनी व्यक्त केली.