माजी आमदार, महापौर आणि कोळी समाजाचे नेते अनंत तरे यांचे सोमवारी दुपारी दीर्घ आजारामुळे निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे, भाऊ आणि भावजय असा परिवार आहे.
ठाणे महापालिकेत यापूर्वी महापौर पदाचा कालावधी एक वर्षांचा होता. त्या वेळेस म्हणजेच १९९३ ते १९९६ या कालावधीत अनंत तरे यांनी सलग तीनदा महापौर पद भूषविले होते. अशा प्रकारे सलग तीनदा महापौर पद भूषविणारे ते एकमेव लोकप्रतिधी आहेत. त्यांनी रायगड जिल्ह्य़ातून शिवसेनेकडून लोकसभेची दोनदा निवडणुक लढविली होती. मात्र, त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. २००० ते २००६ या कालावधीत ते विधान परिषदेचे सदस्य होते. सध्या शिवसेनेचे उपनेते आणि कोळी समाजाचे नेते म्हणून ते कार्यरत होते. तसेच ते लोणावळा येथील एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष होते.
त्यांना दोन महिन्यांपूर्वी करोनाची लागण झाली होती. ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरूहोते. या आजारातून बरे होत असतानाच त्यांना मेंदुघाताचा झटका आला. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. या उपचारादरम्यान सोमवारी त्यांचे निधन झाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 23, 2021 12:17 am