संदेशवहन, सुरक्षित गुंतवणूक, पैशांचे हस्तांतरण आदी सुविधा पुरविणारी हक्काची आणि सर्वात विश्वासार्ह व्यवस्था मानल्या जाणाऱ्या टपाल कार्यालयांना गेल्या काही वर्षांपासून असुविधांनी ग्रासले आहे. बहुतेक टपाल कार्यालये अंधाऱ्या, खिळखिळ्या झालेल्या अत्यंत अपुऱ्या जागेत आहेत. दरम्यानच्या काळात कैकपट लोकसंख्या वाढून त्याचा जादा ताण टपाल कार्यालयांवर असूनही त्या प्रमाणात कर्मचारी उपलब्ध करून दिले जात नाहीत. उलट निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची अनेक पदेही रिक्त आहेत. सध्या गुंतवणुकीचे अनेक स्मार्ट पर्याय उपलब्ध असले, तरी बहुतेक मध्यमवर्गीय ज्येष्ठ नागरिकांनी त्यांची आयुष्यभराची पुंजी टपाल योजनांमधून गुंतवली आहे. टपाल कार्यालयातील अव्यवस्थेमुळे त्यांना फार मोठय़ा प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. ठाणे, डोंबिवली, कल्याण परिसरातील टपाल कार्यालयांच्या सद्य:स्थितीवर टाकलेला एक दृष्टिक्षेप..