गुरांची चोरी करणारी टोळी ताब्यात

गुरांची चोरी करून त्यांची कत्तलीसाठी विक्री करणाऱ्या एका टोळीच्या म्होरक्याला ठाणे पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले. या कारवाईमुळे नवी मुंबई, पालघर येथील पोलीस ठाण्यात गुरे चोरीचे दाखल असलेले गुन्हे उघडकीस आले आहेत.

मुन्ना कुरेशी (२९) आणि मोसिन कुरेशी (२३) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. नवी मुंबईत गुरांची चोरी करून त्यांची कत्तल करणारी एक टोळी कार्यरत असल्याची माहिती मालमत्ता गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी मुंब्रा येथे सापळा रचून मुन्ना आणि मोसिन याला ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्य़ाची कबुली दिली.

अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक

ठाणे : कल्याण येथील दुर्गाडी किल्ला भागात मंगळवारी अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांना ठाणे पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. गुरुनाथ सापळे (४२) आणि  मंगेश शिवणे (४०) अशी आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून २० किलो गांजा जप्त केला आहे.  दुर्गाडी किल्ला येथील गोविंदवाडी बायपास परिसरात काहीजण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस नाईक नामदेव मुंढे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, मंगळवारी दुपारी पोलिसांनी सापळा रचून गुरुनाथ आणि मंगेशला ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता पोलिसांनी त्यांच्याकडून २० किलो ३८२ ग्रॅम वजनाचे अमली पदार्थ जप्त केले.