|| ऋषिकेश मुळे, ठाणे

अपंग मांजरी, अंध श्वानांना साजेसा निवारा नाही; पुरात १० प्राण्यांचा मृत्यू

दहा फुटांहून अधिक वाहत्या पाण्याचा वेगवान असा प्रवाह. त्यात पायही नसल्यामुळे जीव वाचवणे मुश्कील. २७ आणि २८ जुलै रोजी बदलापूर भागात आलेल्या महापुरात येथील पाणवठा संस्थेतील १० अपंग प्राण्यांना जलसमाधी मिळाली. मांजरी, श्वान, गायी, पोपट, टर्की असे प्राणी-पक्षी या पुरात वाहून गेल्याने त्यांचे दु:ख उराशी आहेच, परंतु मागे राहिलेल्या ४५ अपंग प्राण्यांनाही आता साजेसा निवारा उपलब्ध नसल्याने ‘पाणवठा’ चालक चिंतेत आहेत.

उल्हास नदीच्या पाण्यात वाढ झाल्यामुळे नदीला पूर येऊन बदलापूर परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. याच भागात काही अंतरावर असणाऱ्या चामटोली गावातील पाणवठा प्रकल्पातील मुक्या प्राण्यांनाही या पुराचा फटका बसला. पुरामुळे नदीकाठापासून काही अंतरावर असणाऱ्या पाणवठा या अपंग प्राण्यांच्या संस्थेत

पाणी शिरू लागले. शुक्रवारी रात्रीपासूनच प्रकल्पात हळूहळू पाणी शिरू लागल्याने प्रकल्पापासून जवळ राहणाऱ्या एका गृहस्थांनी प्रकल्प चालक गणराज जैन यांच्याशी संपर्क साधला. प्रकल्पाच्या काही अंतरावर राहणाऱ्या गणराज यांनी ताबडतोब प्रकल्पाच्या ठिकाणी धाव घेतली. तोपर्यंत प्रकल्पात पायाच्या तळव्या इतके पाणी साचले होते. पत्नी डॉ. अर्चना जैन आणि स्वयंसेवक हेमश्वेता पांचाळ तसेच इतर दोघांच्या मदतीने त्यांनी प्राण्यांना पिंजऱ्यातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली. पाय नसणे, अंधत्व अशा अवस्थेत मांजरी, श्वान, घोडे, माकड बाहेर येऊन धावू-पळू शकत नव्हते. मात्र दोन तासांनंतर पाणी दहा फुटांच्या वर जाऊ लागले.

या काळात अथक प्रयत्न करून गणराज जैन यांनी प्राण्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा प्रवाह इतका जास्त होता की तीन टर्की, दोन घोडे, दोन कुत्रे, तीन गायी हे पाण्यासोबत वाहून गेले. एक किलोमीटर अंतरावर नदीच्या डोहाच्या किनारी मृतावस्थेत या सर्व प्राण्यांचे मृतदेह आढळून आले. काळजाचा तुकडा असल्याप्रमाणे अनेक दिवस पालनपोषण केलेले अपंग प्राण्यांचे मृतदेह हाती घेणे मोठे कठीण गेल्याचे गणराज जैन यांनी सांगितले. तर उर्वरित मांजरी, टर्की, पोपट या प्राण्यांचे  मृतदेह हाती लागले नाहीत, असेही ते म्हणाले.

चार महिन्यांच्या शिंगराचे बारसे राहिले

पुरामुळे वाहून गेलेल्या प्राण्यांमध्ये प्रकल्पातील घोडय़ांचाही समावेश होता. यामध्ये अवनी नावाच्या घोडीने चारच महिन्यांपूर्वी एका मादी शिंगरूला जन्म दिला होता. या नव्या शिंगराचे नाव सुचवणे सुरू होते. तिचे नामकरण करण्याच्या अगोदरच या चार महिन्यांच्या शिंगराने आई अवनीसोबत जलसमाधी घेतल्याचे गणराज जैन यांनी सांगितले.

महापुरामुळे मोठे नुकसान

महापुरात प्रकल्पातील प्राण्यांच्या खाद्याचे, पिंजऱ्यांचे तसेच औषधांचे मोठे नुकसान झाले असून त्यासाठी चणचण भासत असल्याचे प्रकल्प चालक गणराज जैन यांनी सांगितले. तसेच प्राण्यांना पुरवठा करणाऱ्या पाण्याची मोठी टाकी पुरात वाहून गेली असून बायोगॅस युनिटचेही नुकसान झाले. पुढील काळात पुन्हा पूर आल्यास अशी परिस्थीती उद्भवू नये याकरिता प्रकल्पाचे बांधकाम हे पुन्हा नव्याने करून त्याची उंची वाढवणे गरजेचे आहे. यासाठी आर्थिक मदत नसली तरी बांधकामाच्या साहित्याची मदत होणे गरजेचे आहे. पाणवठा ही अपंग प्राण्यांसाठी निवासाची व्यवस्था, उपचार, कायमस्वरूपी अंपग प्राण्यांचा सांभाळ असे कार्य करते. मात्र निधीअभावी पुरेसे उपचार शक्य होत नाहीत. त्यासाठी विविध प्रकारची सर्वस्वी मदत आवश्यक असल्याचे प्रकल्प चालक गणराज जैन यांनी सांगितले.