अंबरनाथमध्ये प्राचीन शिवमंदिराच्या वार्षिक जत्रोत्सवाचे औचित्य साधून संपन्न झालेला कला महोत्सव अंबरनाथकरांना एक सांगीतिक अनुभूती देणारा ठरला. १३ ते १५ फेब्रुवारी असा तीन दिवस चाललेला या महोत्सवात कला, संगीत आणि शिवमंदिराचा इतिहास या तिघांचा मेळ साधण्यात आला होता.
महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तालवादक शिवामणी यांच्या ड्रम्स, ऑक्टोबॅन, दबुर्का, उडुकाई, खंजिरा आणि अगदी पाण्याची रिकामी बाटली अशा वाद्यांचा खजिनाच त्यांनी रसिकांपुढे खुला केला. प्रख्यात सतारवादक रवी चारी आणि की-बोर्डवादक संगीत हळदीपूर यांच्यासोबत रंगलेली त्यांची जुगलबंदी रसिकांना आनंद देऊन गेली, तर पुढे आलेल्या सुप्रसिद्ध गायिका रेखा भारद्वाज यांनी त्यांच्या ‘शिव तांडव स्तोत्र’ ते बॉलिवूड जगतातील गाजलेली गाणी असे दोन वेगळे संगीताचे प्रकार गाऊन उपस्थितांची मने जिंकली.
महोत्सवाचा दुसरा दिवस संगीत रसिकांसाठी मोहून टाकणारा ठरला. जगविख्यात शास्त्रीय गायक पं. जसराज यांच्या शास्त्रीय गायनाने सारा परिसर संगीतमय झाला होता. त्यांनी शास्त्रीय संगीतातील काही राग व शिव आराधना यावेळी गाऊन उपस्थितांना स्तिमित केले. त्यांचे गायन ऐकण्यासाठी यावेळी खास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सपत्नीक उपस्थित होते. त्यांच्या नंतर आलेल्या कव्वाल आफताब साबरी व हशीम साबरी या साबरी बंधूंनी सुफी संगीत, कव्वाली व सिने जगतातील सुप्रसिद्ध गाणी गाऊन कमाल केली. महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी खरी रंगत आणली ती बहुविख्यात गायक हरिहरन यांनी. त्यांनी यावेळी गायलेल्या जीव रंगला, रोझा, तू ही रे या प्रत्येक गाण्यावर रसिकांनी वन्स मोअरची मागणी करत परिसर दणाणून सोडला.
हरिहरन यांनीही प्रेक्षकांशी मराठीत संवाद साधत त्यांची मने जिंकली. त्यानंतर विशेष आकर्षण असलेल्या अंध तरुणांच्या संगीत मैफिलीने उपस्थितांना हेलावून टाकले. त्यांच्या पेटी, तबला व ढोलकी वादनाला रसिकांनी दाद दिली. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने घेतलेला हा महोत्सव रसिकांपुढे सादर करण्याचा मोलाचा वाटा सिने दिग्दर्शक विजू माने यांनी उचलला होता. या महोत्सवाच्या तीनही दिवसांत गर्दीने उच्चांक गाठला होता. किमान तीन हजार रसिक दररोज या स्थळाला भेट देत होते. हरिहरन यांना पाहण्यासाठी गर्दी जमल्याने सुरक्षा व्यवस्थेवर ताण आला होता. तर आयोजकांची यावेळी तारांबळ उडाली होती.