जिल्हा परिषदेकडून पहिल्या टप्प्यात १ हजार संचांची खरेदी

ठाणे : करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी अधिकाधिक चाचण्यांवर भर देण्याचा निर्णय ठाणे जिल्हा परिषदेने घेतला आहे. त्यानुसार आता जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातही शीघ्र प्रतिजन चाचण्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात एक हजार चाचणी संच खरेदी करण्यात आले असून त्यांची संख्या आणखी वाढवण्यात येणार आहे.

ठाणे जिल्ह्य़ात शहापूर, मुरबाड यासह भिवंडी, कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूरचा काही भाग ग्रामीण क्षेत्रात येतो. या परिसरांमध्येही करोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. या भागात आतापर्यंत ९ हजार ३३८ करोना रुग्ण आढळून आले आहेत, तर तीनशे रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सद्य:स्थितीत या भागात दररोज ८० ते १०० रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही शीघ्र प्रतिजन चाचण्या करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. या भागामध्ये सध्या ‘आरटीपीसीआर’ चाचण्या करण्यात येत आहेत. या चाचण्यांचा अहवाल येण्यास दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे रुग्ण शोधमोहिमेत अडथळा निर्माण होत होता; परंतु आता शीघ्र प्रतिजन चाचण्या करण्यात येणार असून यामुळे संशयित रुग्णांचे अर्ध्या तासात चाचणी अहवाल प्राप्त होणार आहेत. त्यामुळे संबंधित रुग्णाला आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा तात्काळ शोध घेऊन त्यांना विलगीकरण करणे शक्य होणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होणार आहे.

तीन ठिकाणी केंद्रे

शीघ्र प्रतिजन चाचण्यांसाठी भिवंडी तालुक्यातील काल्हेर, मुरबाड तसेच शहापूर तालुक्यातील वासिंद आणि जोंधळे महाविद्यालय येथे केंद्र उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी दररोज २५ ते ३० प्रतिजन चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात सध्या आरटीपीसीआर आणि प्रतिजन चाचण्या असे मिळून दररोज १८० चाचण्या केल्या जात आहेत, तर या चाचण्यांसाठी लागणारे आणखी किट खरेदी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने राज्य शासनाला प्रस्ताव सादर केला आहे. त्यास राज्य शासनाने मान्यता दिल्यानंतर प्रतिजन चाचण्यांची संख्या आणखी वाढणार आहे.