भाईंदर :-मिरा भाईंदर काँग्रेस जिल्हा अध्यक्ष पदावर  विराजमान झाल्याच्या तासाभरातच  प्रमोद  सामंत यांच्यावर नवघर पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद झाली. सामाजिक अंतराचे पालन न  करता आंदोलन केल्यामुळे सामंतसह  काँग्रेसमधील पदाधिकारी आणि  कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

करोनाच्या पाश्वभूमीवर केंद्र शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या २० लाख करोड रुपयांचे ‘नेमके काय झाले’असा सवाल करत शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास  मिरा भाईंदर काँग्रेस पक्षाने  भाजप कार्यालयाबाहेरच ठिय्या आंदोलन केले होते.परंतु  सामाजिक अंतराचे भान न राखता अनैतिक पद्धतीने आंदोलन करण्यात आले असल्याची तक्रार मिरा भाईंदर  भाजप प्रवक्ता रणवीर वाजपेयी यांनी नवघर पोलिस ठाण्यात केली होती. त्यानुसार  जमावबंदी कायद्याचे उलंघन केल्या प्रकरणी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रमोद सामंत  सह  युवक अध्यक्ष दीप काकडे,सेवादल जिल्हा अध्यक्ष रविंद्र उपाध्याय, कुणाल काटकर आणि अन्य अनोळखी १५ कार्यकर्त्यावर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली.विशेष म्हणजे प्रमोद सामंत यांनी अध्यक्ष पदाची जबाबदारी घेतल्याच्या तासाभरात त्यांच्यावर  गुन्हा दाखल झाल्यामुळे सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.