ठाणे पालिकेत दोन नव्या अतिरिक्त आयुक्तांची नियुक्ती

ठाणे : ठाणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदावरील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंगळवारी रात्री उशिरा राज्य सरकारने बदली केली. त्यामुळे गेले दोन महिने पालिकेत सुरू असलेल्या प्रशासकीय गोंधळाच्या चर्चेला पुन्हा एकदा जोर आला.

करोनाचा मुकाबला करताना महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये पुरेसा ताळमेळ नसल्याची चर्चा आहे. आरोग्य व्यवस्थेतील ढिलाई, अत्यावश्यक साधनांच्या खरेदीतील संथगती, खासगी कोविड रुग्णालयांमध्ये होणारी रुग्णांची लूट, विलगीकरण केंद्रातील नागरिकांचे होणारे हाल, कळवा रुग्णालयातील सावळागोंधळाचे अनेक किस्से सातत्याने चर्चेला येत असताना दोघा वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली करून सरकारने सिंघल यांच्या मदतीला त्यांच्या आवडीच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याची चर्चा आहे.

ठाणे महापालिकेत सिंघल यांची नियुक्ती होण्यापूर्वी प्रभारी आयुक्तपदाचा कार्यभार राजेंद्र अहिवर यांच्याकडे सोपविण्यात आला होता. करोनाच्या विलगीकरण केंद्रासाठी आवश्यक असलेल्या साधनांची मोठय़ा प्रमाणावर खरेदी या काळात करण्यात आली होती. मात्र, सिंघल यांची आयुक्तपदी नियुक्ती होताच यापैकी काही वस्तूंना दिल्या जाणाऱ्या दरांविषयी आयुक्तांनी हरकत नोंदविल्याची चर्चा होती. त्यामुळे सुरुवातीपासूनच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये ताळमेळ नसल्याच्या चर्चा पालिका वर्तुळात सुरू होत्या. जयस्वाल यांच्या काळात अतिरिक्त आयुक्तपदावर कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याच्या कार्यशैलीविषयी सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. प्रशासनातील समन्वय अभावाच्या तक्रारी सतत पुढे येऊ लागल्या तसे पालकमंत्री एकनाथ िशदे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन झाडाझडती घेतली होती.

या संकटकाळात फायलींशी खेळत बसलात तर याद राखा, अशा शब्दांत पालकमंत्र्यांनी अप्रत्यक्ष आयुक्त सिंघल यांच्यावर निशाणा साधल्याची तेव्हा चर्चा होती. दरम्यान, मंगळवारी रात्री प्रशासनाने दोन्ही अतिरिक्त आयुक्तांच्या तडकाफडकी बदल्या करत आयुक्तांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांची नियुक्ती करत झालेला गोंधळ निस्तरण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

पनवेल पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख हे सिंघल यांच्या मर्जीतील अधिकारी मानले जातात. त्यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून वसई-विरार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनाही ठाणे महापालिकेत संधी देण्यात आली आहे.

भाजपची टीका

ठाण्यात करोना रोखण्यात अपयशी ठरलेल्या शासकीय यंत्रणांनी अपयश झाकण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बदल्यांचे सत्र सुरू केले आहे, अशी टीका भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार निरंजन डावखरे यांनी केली. मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यानंतर ठाणे पालिकेतील दोघा अतिरिक्त आयुक्त्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या. अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे कोविड-१९ वर नियंत्रण मिळेल का, असा सवालही आमदार डावखरे यांनी राज्य सरकारला केला आहे.