29 February 2020

News Flash

चर्चेविनाच २६० प्रस्ताव मंजूर

पालिकेत निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न

पालिकेत निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न

बदलापूर : अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपली असतानाच, त्यापूर्वी म्हणजेच मंगळवारी घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी शिवसेना आणि भाजपने कोणत्याही चर्चेविनाच अवघ्या पंधरा मिनिटांत २५ कोटी रुपयांच्या २६० प्रस्तावांना मंजुरी दिली. या प्रस्तावांमध्ये पेव्हर, नाले, खुली व्यायामशाळा, उद्यानात रंगमंच, उद्यान सुशोभीकरण अशा कामांचा समावेश होता. त्यामुळे मतदारांना खूश करण्यासाठीच सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेने निवडणुकीपूर्वी अशा प्रस्तावांना मंजुरी दिल्याची चर्चा आता शहरात रंगली आहे. दरम्यान या सभेत मंजूर झालेली कामे यापूर्वी झाली आहेत का, याबाबत चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीने केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

कुळगाव-बदलापूर नगरपालिकेची निवडणूक येत्या एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यासाठी जानेवारी किंवा फेब्रुवारीपासून पालिका प्रशासनाकडून तयारी सुरू होईल. या निवडणुकीआधी म्हणजेच मंगळवारी पालिकेची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेमध्ये सत्ताधारी शिवसेना आणि भाजपने प्रशासनाला हाताशी धरून २९५ प्रस्ताव मंजुरीसाठी आणले होते.

त्यापैकी २ कोटी रुपयांचे ३५ प्रस्ताव हे प्रशासनाचे, तर २६० प्रस्ताव हे नगरसेवकांचे होते. त्यामध्ये पेव्हर ब्लॉक बसवणे, उद्यान सुशोभीकरण करणे, उद्यानात खुल्या व्यायामशाळेसाठी साहित्य बसवणे, पथदिवे बसवणे, गटार बनविणे, मोकळ्या जागेत सुशोभीकरण करणे, खुला रंगमंच उभारणे, करमणुकीचे साहित्य बसवणे अशा २५ कोटी रुपयांच्या विविध कामांचा समावेश होता.

या सभेपुढे शहरातील कोणताही मोठा प्रकल्प मंजुरीसाठी आणण्यात आला नव्हता. सभा सुरू होताच इतर प्रशासकीय विषयांवर तब्बल तासभर चर्चा चालली. त्यानंतर नगरसेवकांचे प्रस्ताव मंजुरीसाठी आल्यानंतर त्यावर चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, शिवसेना आणि भाजपच्या ज्येष्ठ नगरसेवकांनी सर्व प्रस्ताव मंजूर करा, अशा सूचना केली.

त्यानंतर कोणत्याही चर्चेविनाच अवघ्या पंधरा मिनिटांत २५ कोटी रुपयांच्या २६० प्रस्ताव मंजूर देऊन ही सभा आटोपती घेतली. प्रशासकीय  विषयांवर तासभर चाललेली सभा नगरसेवकांच्या प्रस्तावावेळी अवघ्या पंधरा मिनिटांत गुंडाळण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

तरतूद आणि पाहणीनंतरच कामांना सुरुवात

गेल्या वर्षी अशाच प्रकारे जम्बो सभा सत्ताधारी शिवसेना आणि भाजपने आयोजित केली होती. मात्र अर्थसंकल्पात तरतूद नसल्याचे कारण देत मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी सभा रोखली होती. यंदाही प्रशासनाने या २६० खासगी विषयांसाठी १५ ओळींत आपली टिपणी दिली आहे. प्रत्येक विषयाच्या जागेची पाहणी करून, कामाचा इतिहास पाहून, अंदाजपत्रकाप्रमाणे तरतूद तपासून कामांना मंजुरी देण्यात येईल, असे यात सांगण्यात आले आहे. त्यामुळे सभेत घाईगडबडीत २६० विषय मंजूर केले असले तरी त्यासाठीची स्थळपाहणी आणि तरतुदीनंतरच ही कामे होणार की नाही, हे स्पष्ट होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध

कोटय़वधी रुपयांच्या कामांची ही सभा रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आशीष दामले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती. मात्र त्यास नकार मिळाला होता. त्यामुळे या सभेत मंजूर झालेली कामे यापूर्वी झाली आहेत का, या कामांची चौकशी करण्याची दामले यांनी आता केली आहे.

First Published on December 4, 2019 3:43 am

Web Title: approved 260 proposals without discussion in kulgaon badlapur municipal council zws 70
Next Stories
1 रस्त्यासाठी वीस वर्षे प्रतीक्षा
2 रब्बी हंगामाच्या पेरण्या लांबणीवर
3 ठाणे उड्डाणपुलावर लटकून आत्महत्येचा प्रयत्न, वाहतूक पोलिसाने प्रसंगावधान दाखवत वाचवला जीव
X
Just Now!
X