आयुक्तालयात एकमेव असलेल्या श्वानाची चोख कामगिरी
अनेक गुन्हेगार गुन्हा करताना काहीतरी पुरावा मागे सोडतो आणि तोच धागा पकडून पोलिसांची पथके गुन्हेगारापर्यंत पोहचतात. मात्र, घटनास्थळावरील पुरावा ते आरोपीचा माग या तपासादरम्यान पोलीस दलातील श्वान महत्त्वाची भूमिका बजावत असतो. ठाणे पोलीस दलातील श्वान पथकात ‘नील’ नावाचा श्वान कार्यरत असून दररोज चार ते पाच ठिकाणी घडलेल्या गुन्ह्यांच्या तपासकामात नील पोलिसांना मदत करतो. गेल्या चार वर्षांपासून ठाणे पोलीस आयुक्तालयात असलेल्या या एकमेव श्वानाने आजवर अनेक गुन्हेगारांना शोधून काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
अंबरनाथ शहरात गाजलेल्या निहारीका साळुंखे या तरुणीचे खून प्रकरण तसेच आठवडाभरापूर्वी शीळगावामध्ये एका अल्पवयीन गतिमंद मुलीवर झालेला बलात्कार या महत्त्वाच्या प्रकरणांमधील आरोपींचा माग काढण्याची कामगिरी नील या डॉबरमन जातीच्या श्वानाने केली आहे. याशिवाय, संपूर्ण आयुक्तालय क्षेत्रात घडलेले खून, घरफोडी अशा गुन्ह्य़ांची उकल करण्यासाठी त्याने पोलिसांना तपासाची दिशा दाखविली असून त्याआधारे पोलिसांनी काही आरोपींना जेरबंदही केले आहे.
ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरे ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात येतात. या सर्वच शहरांसाठी सुमारे ३३ पोलीस ठाणी आहेत. पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडणाऱ्या गुन्ह्य़ांचा तपास स्थानिक पोलिसांसह गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी करत असतात. याशिवाय, ठाणे पोलीस दलातील श्वान पथकामधील ‘नील’ या श्वानाला घटनास्थळी नेण्यात येते आणि त्याच्या आधारे गुन्ह्य़ाची उकल करण्यासाठी काही धागेदोरे मिळतात का, याचा शोध घेण्यात येतो. दिवसभरात त्याला चार ते पाच ठिकाणी तपासासाठी नेण्यात येते. पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी हे गुन्ह्य़ाच्या तपास कामात व्यस्त असतात. त्याचप्रमाणे तोही तपासकामामुळे दिवसभर व्यस्त असतो.
३० ते ३५ टक्के मदत..
खून तसेच घरफोडी या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्य़ांच्या तपासासाठी ‘नील’ला दररोज चार ते पाच ठिकाणी नेण्यात येते. यामध्ये खुनापेक्षा घरफोडय़ांचे गुन्हे अधिक असतात. नील हा ‘ट्रक डॉग’ असल्यामुळे तो घटनास्थळावरून आरोपींचा माग काढतो. वर्षभरात ‘नील’ याने सुमारे एक हजाराहून अधिक घटनास्थळांवरून आरोपींचा माग काढला आहे. आजवर ३० ते ३५ टक्के गुन्ह्यांची उकल त्याच्या क्षमतेमुळे झाली आहे, अशी माहिती ठाणे पोलीस श्वान पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राणे यांनी दिली. तसेच २०१२ मध्ये झालेल्या महाराष्ट्र पोलीस श्वान स्पर्धेत नीलने ब्राँझ पदक पटकाविले आहे, असेही त्यांनी सांगितले

उकल केलेले महत्त्वाचे गुन्हे
* अंबरनाथमध्ये वर्षभरापूर्वी घडलेले निहारिका साळुंखे खून प्रकरण
* भिवंडीतील वळपाडा भागातील खून प्रकरण
* वागळे इस्टेट भागात नवविवाहितेची भररस्त्यात झालेली हत्या
* शीळ गावातील अल्पवयीन गतिमंद मुलीवरील बलात्कार प्रकरण