07 April 2020

News Flash

प्रदूषणाचा फटका जलचर प्राण्यांनाही

पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण शून्य असते तर दरुगधी आली असती. या तलावात छोटी जीवसृष्टी आहे

प्रदूषणामुळे मिलापनगरच्या तलावातील मासे आणि कासव मृत्युमुखी पडल्याचे आढळून आले

डोंबिवलीतील मिलापनगरच्या तलावातील मासे, कासव मृत्युमुखी; एमआयडीसीतील प्रदुषणाचा परिणाम
डोंबिवली औद्योगिक परिसरातील प्रदूषणामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य किती धोक्यात आहे, याची प्रचीती पुन्हा एकदा आली आहे. प्रदूषणामुळे मिलापनगरच्या तलावातील मासे आणि कासव मृत्युमुखी पडल्याचे आढळून आले असून त्यामुळे स्थानिक रहिवासी हळहळ व्यक्त करीत आहेत.
तलावातील पाणी शुद्ध आहे की अशुद्ध याबाबत दोन संस्थांनी केलेल्या तपासणी अहवालात मतभिन्नता असली तरी जलचरांच्या मृत्युमुळे पाण्यात विषारी घटक असल्याच्या शक्यतेवर शिक्कामोर्तब झाल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. डोंबिवली पूर्वेतील औद्योगिक विभागातील मिलापनगरमध्ये नैसर्गिक तलावाचे जतन करण्यासाठी येथील वेल्फेअर असोसिएशन प्रयत्न करत आहे. या तलावात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येत असल्याने तलावाचे नैसर्गिक स्रोत हळूहळू बंद होत आहेत. याबरोबरच मूर्तीसाठी वापरण्यात येणाऱ्या रंगांमुळेही यातील पाणी दूषित होत असल्याचे नागरिकांचा दावा आहे. गणेश विसर्जनानंतर तलावातील मासे मृत्युमुखी पडल्याचे येथील नागरिकांना आढळून आले. यानंतर तलावातील पाण्याचे नमुने सोमय्या कॉलेजमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले. याबरोबरच महाराष्ट्र प्रदूषण मंडळानेही पाण्याचे नमुने तपासणीसाठी नेले. यानुसार सोमय्या महाविद्यालयाच्या पर्यावरण प्रयोगशाळेच्या अहवालानुसार येथील पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण शून्य असल्याने मासे मृत झाल्याचे नमूद केले तर प्रदूषण मंडळाच्या अहवालात मात्र तलावातील पाण्यात ३.२ मिलीग्रॅम प्रतिलिटर इतका ऑक्सिजन असल्याने मासे मरणे अशक्य असल्याचे नमूद केले होते. या दोन्ही अहवालाबाबत संभ्रम असतानाच गुरुवारी दुपारी या तलावातील तीन कासव मृत्युमुखी पडल्याचे नागरिकांना आढळून आले आहे. तलावातील जलचर प्राणी नक्की कोणत्या कारणामुळे मृत्युमुखी पडत आहेत, याची माहिती प्राण्यांचे शवविच्छेदन अहवालानंतरच नक्की होईल. मात्र त्याचा खर्च जास्त असल्याने ही जबाबदारी घेणार कोण, असा सवाल नागरिक करत आहेत.

पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण शून्य असते तर दरुगधी आली असती. या तलावात छोटी जीवसृष्टी आहे. मात्र तलावातील जलचर मृत्युमुखी पडल्याने यातील पाणी वातावरणामुळे दुषित होत आहे की भूगर्भातील दुषित पाणी यात मिसळत आहे याची पहाणी केली जाईल. तसेच हे कासव तलावातीलच होते की कुणी बाहेरुन आणून टाकले आहेत याची चौकशी केली जाईल.
– मधुकर लाड, उप प्रादेशिक अधिकारी, प्रदुषण नियंत्रण मंडळ, डोंबिवली

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2016 12:59 am

Web Title: aquatic animals affected by pollution
टॅग Pollution
Next Stories
1 महापालिकेचा कला, क्रीडा महोत्सव रविवारीच
2 बदलापुरात तरुणाच्या धाडसाने घरातील आग विझली
3 प्लास्टिकमुक्तीची जनजागृती!
Just Now!
X