वाढत्या शहरीकरणामुळे खाडीतील गाळाला अडसर निर्माण झाला आहे. या वाढत जाणाऱ्या खाडीतील गाळामुळे पाण्यातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे जलचर प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. यासाठी काही दिवसांपूर्वी निरीने एक अहवाल सादर केला होता. त्यामध्ये खाडीच्या पात्रातील गाळ मोठ्या प्रमाणात वाढल्याचा उल्लेख करण्यात आला होता. अहवालानंतर प्रशासनाकडून खाडीतील गाळ काढण्यासाठी काही योजना ही राबविण्यात आल्या आहेत. पण, ही प्रक्रिया नैसर्गिक असून त्यात काही बदल करण्याचा प्रयत्न करू नये, असे मत पर्यावरण अभ्यासक विद्याधर वालावलकर यांनी व्यक्त केले.

ठाण्यातील खाडीत सर्वच ठिकाणचे पाणी येत असल्यामुळे खाडीत असणाऱ्या जलचरांना धोका निर्माण झाला आहे. खाडीत असणाऱ्या बांधकामामुळे खाडीत अडथळा निर्माण होत आहे. सध्या जलवाहतुकीच्या योजना सुरु करण्यासाठी गाळ काढण्याचं प्रयत्न सुरु आहे, परंतु सदरचा गाळ हा नैसर्गिक असल्यामुळे तो काढण्याचा प्रयत्न न करता,  फक्त विविध कारणाने खाडीत निर्माण झालेले अडथळे हटवावे, त्यामुळे सर्व प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास वालावलकर यांनी व्यक्त केला.

खाडीत येणारा गाळ खाडीच्या पात्रात अरुंद झाला आहे. खाडीत बांधकामामुळे अडसर निर्माण झाला आहे. त्यामुळे खाडीत भरती तसेच आहोटीमुळे येणारे पाणी बाहेर किंवा आतमध्ये येत नाही. पूर्वीच्या काळात खाडीतील पाण्यातून चालता येत असे, परंतु सध्याच्या परिस्थीतीला पाणी दुषित झाल्याचे दिसते. त्यातच ऑक्सिजनची पातळी कमी होत असल्यामुळे जलचर प्राण्यांच्या बाबतीत प्रश्न चिन्ह निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असेही ते म्हणाले.