ठाणे : राज्य सरकारने जाहीर केलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत करोनाबाधितांना खासगी रुग्णालयांतूनही मोफत उपचार मिळावेत, अशा सूचना असताना ठाण्यात खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. खुद्द महापौर नरेश म्हस्के यांनीच महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे. शहरातील कोविड रुग्णालयांवर नियंत्रण राहावे, याकरिता पालिकेने तयार केलेल्या ‘कोविड वॉर रूम’ला अंधारात ठेवून खासगी रुग्णालये परस्पर रुग्णांना दाखल करून घेत असल्याचेही महापौरांनी म्हटले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील खासगी कोविड रुग्णालयांकडून रुग्णांना अवाजवी देयके आकारली जात असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत असून त्यापैकी काही तक्रारींमध्ये सकृद्दर्शनी तथ्य आढळून येताच महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी होरायझन प्राइम या रुग्णालयाची एक महिन्यासाठी नोंदणी रद्द केली आहे. या कारवाईनंतर खासगी रुग्णालयांच्या मनमानी कारभाराला आळा बसून रुग्णांना मोठा दिलासा मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, शासनाच्या नियमाप्रमाणे महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेत सर्व रेशनकार्डधारकांना सामावून घेत नसल्याची बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर महापौर नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना पत्र पाठवून या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

ठाणे महापालिकेचे शहरातील सर्व रुग्णालयांवर नियंत्रण राहावे आणि करोनाबाधित रुग्णांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी, यासाठी महापालिकेने कोविड वॉर रूम सुरू केली आहे. परंतु या वॉर रूमला न कळविताच काही खासगी रुग्णालये रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेत असून हा प्रकार चुकीचा आहे. जी खाजगी रुग्णालये शासनाच्या नियमाप्रमाणे महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ रुग्णाला देणार नाहीत आणि त्यापासून त्यांना वंचित ठेवतील, अशा रुग्णालयांवरही कारवाई करण्यात यावी. तसेच या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी खास अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.