ठाणे महापालिकेच्या विशेष पथकाने केलेल्या तपासणीत खासगी करोना रुग्णालयांनी अवाजवी उपचारशुल्क आकारल्याचे उघडकीस आले आहे. ४८६ देयकांपैकी सुमारे २७ लाख रुपयांची १९६ आक्षेपार्ह देयके आढळली असून महापालिकेने संबंधित रुग्णालयांना नोटिसा बजावण्याची कारवाई सुरू केली आहे.

पालिकेच्या तपासणी मोहिमेतूनच खासगी रुग्णालये रुग्णांची लूटमार करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. खासगी रुग्णालयांनी घेतलेल्या  उपचारशुल्काचा आकडा कोटय़वधी रुपयांच्या घरात जाऊ शकतो, असा सूत्रांचा अंदाज आहे.  ठाणे  पालिकेने शहरातील १५ खासगी रुग्णालयांना करोना रुग्णालये म्हणून घोषित केले आहे. या रुग्णालयांचे  शुल्कदर  पालिकेने निश्चित केले होते. परंतु, रुग्णालये शुल्क आकारणीबाबत मनमानी करीत असल्याच्या तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी, मुख्य लेखा परीक्षक किरण तायडे यांच्या नेतृत्वाखाली  पथक तयार करून पालिकेच्या दरांनुसार रुग्णालये शुल्क आकारतात की नाही, याची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यातून  ही लबाडी उघड झाली.

.. तर रुग्णांना परतावा

* महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी वाढीव शुल्काबाबत संबंधित रुग्णालयांकडून तात्काळ स्पष्टीकरण मागविण्याचे आदेश दिले आहेत.

* रुग्णालयांकडून स्पष्टीकरण आल्यानंतर त्याची शहानिशा करण्यात येईल. अधिक शुल्क घेतल्याचे सिद्ध झाल्यास अतिरिक्त रक्कम संबंधित रुग्णाच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश देण्यात येतील.

२७ लाखांची देयके आक्षेपार्ह : पालिकेच्या पथकाने शहरातील १५ खासगी करोना रुग्णालयांची तपासणी केली आणि रुग्णालयांनी कशा प्रकारे शुल्क आकारणी केली याची तपशीलवार माहिती घेतली. पथकाने मिळवलेल्या १७५२ देयकांपैकी ४८६ देयकांची तपासणी पूर्ण झाली आहे. त्यापैकी १९६ आक्षेपार्ह देयकांची नोंद करण्यात आली असून त्यांची रक्कम २७ लाखांपेक्षा अधिक आहे.