राष्ट्रीय संपत्ती आणि जागतिक वारसा म्हणून ओळखली जाणारे प्राचीन वास्तुवैभव पुरातत्व विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पुरातत्व खात्याच्या वसई उपविभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या स्मारकांपैकी अंबरनाथ शिवमंदिर आणि रायगडमधील कोरलाई किल्ल्याच्या मंजूर कामासाठी गेल्या पाच वर्षांमध्ये एक रुपयाचाही निधी उपलब्ध होऊ शकला नाही. ठाण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते सुयश प्रशान यांनी भारतीय पुरातत्व विभागाकडून मागविलेल्या माहितीतून हा प्रकार उघड झाला आहे. अंबरनाथ शहराचे सांस्कृतिक वैभव आणि वास्तुरचनेचा उत्तम नमुना म्हणून ओळख असलेल्या प्राचीन शिवमंदिराकडे पुरातत्व सर्वेक्षण विभागाने अक्षम्य दुर्लक्ष केल्याने मंदिर परिसरातील ढासळणाऱ्या शिळांचे मजबुतीकरण आणि परिसराच्या सुशोभिकरणाची कामे अपुऱ्या अवस्थेत आहेत. रायगडच्या कोरलाई किल्लाही निधीच्या प्रतिक्षेत आहे. वसई उप विभागामध्ये येणाऱ्या स्मारकांचीही दुरावस्थाच होत असताना त्यांनाही तुटपुंजा निधी देऊन कामे पुर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.    
९५४ वर्षांचे अंबरनाथ येथील मंदिर हजार वर्षांपूर्वीच्या संस्कृतीची ठळक खूण आहे. त्यामुळे जगभरातून पर्यटक तसेच अभ्यासक मंदिराला भेट देत  असतात. भारतीय पुरातत्व खात्याने या मंदिराची संपुर्ण जबाबदारी घेतली असली तरी त्याच्या संवर्धनासाठी मात्र पुरातत्व खात्याकडून व्यापक प्रयत्न आजपर्यंत झालेले नाहीत. त्यामुळे मंदिराची झीज होणे, शिल्पांना तडे जाणे यासारखे प्रकार घडू लागले आहेत. मंदिराजवळून वाहणाऱ्या वालधुनी  नदीच्या पाण्यात प्रदुषणकारी रसायने आढळून येऊ लागली आहे. मंदिर परिसरातील खडकांची आणि बांधकामाची पडझड होत आहे. यासंदर्भात अनेक जागृत नागरिक पुरातत्व विभागाकडे वारंवार तक्रारी आणि पाठपुरावा करत आहेत. तक्रारी आल्यानंतर त्यावर कारवाई करण्याच्या दृष्टीने पुरातत्व खात्याने या कामांची दखल घेतली असली तरी या कामांसाठी गेल्या पाच वर्षांमध्ये निधी मात्र दिलेला नाहीत.
सध्या अंबरनाथ नगरपरिषदेच्या वतीने या भागात सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात असला तरी शासनाच्या मदतीशिवाय नगरपालिका मंदिर परिसर सुभोभिकरण करू शकणार नाही. ते काम पालिकेच्या आवाक्याबाहेरचे आहे. त्यामुळे पुरातत्व विभागाकडून मंदिर संवर्धनासाठी निधी मिळणे आवश्यक आहे, असे मत सुयश प्रधान यांनी व्यक्त केले.  
वसई उप विभागात पाच वर्षांत उपलब्ध करून देण्यात आलेला निधी
’कोरलाई किल्ला, रायगड                      निधी नाही
’अंबरनाथ शिवमंदिर                            निधी नाही
’ नालासोपारा येथील स्तूप                     १ लाख ८६ हजार ७३४     
’अर्नाळा किल्ला                                  २ कोटी ७१ लाख २ हजार ८८९
’बुद्ध स्तूप, नालासोपारा                       २ कोटी ३२ लाख ९ हजार
’बराड टेकडी                                        ७५ हजार
’वसईचा किल्ला (टाऊन हॉल)             ८ लाख ५० हजार ९०५
’वसईचा किल्ला(आरोग्यदायी माता)  २ कोटी ४७ लाख ४ हजार ५२९
’वसईचा किल्ला (पोर्तुगीज स्ट्रक्चर)   २ कोटी ४६ लाख ९ हजार ९००
’वसईचा किल्ला (बालेकिल्ला)            २ कोटी ९६ लाख २३२
’वसईचा किल्ला देखभाल दुरूस्ती       १ कोटी ४२ लाख ८ हजार ६६५
’सेंट गोन्साल्वो गार्सिया चर्च               ३ कोटी ३५ लाख २ हजार १६३

वसईच्या किल्ल्यावर सर्वाधिक खर्च
पाच वर्षांमध्ये वसईच्या किल्ल्यावर सर्वाधिक खर्च झाला असून वेगवेगळ्या ठिकाणी हा खर्च करण्यात आला आहे. टाऊन हॉल, आरोग्यदायी माता, पोर्तुगीज स्ट्रक्चर, वसईचा बालेकिल्ला, सेंट गोन्साल्वो गार्सिया चर्च आणि इतर देखभाल दुरूस्तीवर सुमारे १३ कोटी ५३ लाख ६ हजार ३९४ रुपयांचा खर्च झाला आहे. तर कोरलाई किल्ला, रायगड आणि अंबरनाथ शिवमंदिरच्या कामांसाठी निधी उपलब्ध करूनच दिलेला नाही. तर बराड हिलसाठी केवळ ७५ हजारांचा निधी देण्यात आला आहे.
श्रीकांत सावंत, ठाणे</strong>