22 September 2020

News Flash

वसाहतीचे ठाणे : स्मार्ट डोंबिवलीचे छोटे प्रारूप

डोंबिवली स्थानकापासून कल्याण दिशेला साधारण अर्धा तास चालल्यानंतर शेलार नाका येतो.

अर्जून नगर सोसायटी, पाथर्ली रोड, डोंबिवली (पू.).

अर्जून नगर सोसायटी,  पाथर्ली रोड, डोंबिवली (पू.).

डोंबिवलीतील अर्जूननगर सोसायटीनेही शहर कचरामुक्त करण्याच्या दिशेने पावले उचलली असून सुरुवात त्यांनी आपल्या आवारातील स्वच्छतेपासून केली आहे. स्वच्छ, टापटीप सोसायटी अशी या गृहसंकुलाची ओळख आहे. आवारात कागदाचा तुकडाही  पडलेला दिसणार नाही. सोसायटीने ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचा संकल्प केला आहे.

डोंबिवली स्थानकापासून कल्याण दिशेला साधारण अर्धा तास चालल्यानंतर शेलार नाका येतो. या नाक्याच्या डाव्या हाताला पाथर्ली गाव आहे. गावाच्या सुरुवातीलाच अर्जुननगर सोसायटी आहे. थोडे चालून गेले की डाव्या हाताला अर्जुन नगर सोसायटीची प्रशस्त कमान तुमचे स्वागत करते. डोंबिवली शहरात शोधूनही सापडत नाही अशी हिरवळ या कमानीवर दिसते. त्यामुळे आपले छान स्वागत होते. थोडा उतार उतरून अर्जुननगर सोसायटीच्या प्रवेशद्वारातून आत गेलो की सोसायटीच्या पाच विंग तुमचे स्वागत करतात. पाचही विंगमध्ये पुरेशी मोकळी जागा आहे. तिथे एका शिस्तीत वाहने उभी केलेली असतात. सोसायटीच्या आवारात काही बाकडय़ांवर मुले गप्पा मारताना किंवा खेळताना दिसतात. कल्याण रोड या मुख्य रस्त्याला लागून ही सोसायटी असली तरी बाहेरील गाडय़ांचा आवाज सोसायटीमध्ये येत नाही. त्यामुळे शांत, निरव वातावरण अनुभवता येते. तीन मजली ५ विंगच्या या सोसायटीमध्ये ७६ सदनिका असून ७४ कुटुंबे येथे गुण्या-गोविंदाने राहतात. १९९२ मध्ये अर्जुननगर सोसायटीचे बांधकाम सुरू झाले. १९९६-९७ नंतर येथे नागरिक वास्तव्यास आले. वास्तविक शहरापासून खूप लांब असल्याने जुन्या डोंबिवलीकरांनीच येथे घर घेणे पसंत केले. सात ते आठ लाख रुपयांमध्ये ५०० चौरस फुटांपेक्षा जास्त जागेचे घर मिळाले. आता या घरांच्या किमती या ४० ते ५० लाखांच्या घरात गेल्या आहेत.

सोसायटीत बहुधर्मीय कुटुंबे राहतात. मात्र त्यांच्यामध्ये शेजारधर्माचे घट्ट नाते आहे. एकमेकांच्या सुखदुखात सोसायटीतील सारेजण सहभागी होत असल्याचे येथील एक महिला सुलभा कोरे यांनी सांगितले. या सोसायटीमध्ये सध्या चौथी पिढी नांदत असून इतरत्र दुर्मीळ झालेल्या एकत्र कुटुंब पद्धतीचे दर्शन येथे होते. सर्व सण-उत्सव सोसायटीमध्ये साजरे केले जातात. गुढीपाडव्याला सोसायटीच्या आवारात मोठी रांगोळी काढली जाते. तसेच ३१ डिसेंबरला मुलांचे विविध कार्यक्रम, स्पर्धा आयोजित केल्या जातात. सोसायटीच्या चहूबाजूंनी मोकळी जागा असल्याने तेथे नागरिकांना बसण्यासाठी बाकडे लावण्यात आले आहेत. त्यामुळे सकाळ- संध्याकाळी मोकळ्या हवेत ज्येष्ठ नागरिक येथे बसतात. लहान मुलांना खेळण्यासाठी मोकळे मैदान सोसायटीमध्ये असल्याने तिथे ते मैदानी खेळ खेळतात.

डोंबिवलीपेक्षा ठाकुर्ली जवळ..

एकेकाळी डोंबिवलीच्या टोकाला असलेली ही सोसायटी आता शहराच्या मध्यवर्ती भागात आली आहे. डोंबिवली स्थानक गाठायचे म्हटले तर अर्धा तास चालणे किंवा शेअर रिक्षा याशिवाय नागरिकांना तिसरा पर्याय नाही. मात्र ठाकुर्ली रेल्वे स्थानकही येथून हाकेच्या अंतरावर आले आहे. सर्वाकडे वाहनाची सोय असल्याने डोंबिवलीपेक्षा ठाकुर्ली स्थानक गाठणे नागरिक पसंत करत असल्याचे येथील रहिवासी सांगतात. तसेच येथून जवळपास क्रीडासंकुल, जिमखाना आहे. खासगी दवाखानाही सोसायटीपासून हाकेच्या अंतरावर आहे. सोसायटीच्या समोरच जिल्हा परिषदेची शाळा आहे. सोसायटीतील मुले ही खासगी शाळांमध्ये जात असून त्यांच्यासाठी शाळेच्या बस सोसायटीच्या प्रवेशद्वारी येत असल्याने वाहतुकीची कोणतीही गैरसोय होत नाही. आजूबाजूला झोपडपट्टी विभाग जास्त असला तरी त्या नागरिकांचा कधी त्रास झाला नाही. मात्र सुरक्षिततेच्या कारणास्तव सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे कवच सर्व इमारतींना लावण्यात आले आहे. तसेच दोन सुरक्षा रक्षकही दोन सत्रांत नेमण्यात आले आहेत. सोसायटीच्या आवारात प्रशस्त जागा असल्याने वाहने उभी करण्यात कोणतीही अडचण नाही. प्रत्येकाला त्याची जागा ठरवून देण्यात आली आहे. तसेच बाहेरील वाहनांसाठी वेगळी राखीव जागा आहे. सोसायटीच्या पाठीमागे एक नाला असून त्याच्यावरील झाकणे तुटलेली आहेत. दुर्गंधीचा त्रास होत असल्याने या नाल्यावर प्लॅस्टर करण्यात यावे अशी मागणी पालिकेकडे केली आहे.

स्वच्छतेविषयी जागरूक

सोसायटीच्या आवारात कधीही कचरा साचलेला दिसून येत नाही. सकाळी कचरा वेचक कामगार येऊन कचरा घेऊन जातात. पालिकेची घंटागाडी ही सोसायटीच्या प्रवेशद्वारी येणे आवश्यक आहे. मात्र ती येत नाही. त्यामुळे शाळेजवळील कचरा कुंडीजवळ कचरा नेऊन ठेवावा लागतो. ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी वेगवेगळ्या कचरा पेटय़ा पालिकेने उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आनंद परब यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2017 2:57 am

Web Title: arjun nagar complex pathari road dombivli east
Next Stories
1 ‘चितळेंचे दुकान आता १२ तास खुले’
2 तोडलेली इमारत नव्याने उभी
3 चार दिवस रखडपट्टीचे!
Just Now!
X