स्मार्ट सिटीचे स्वप्न पाहणाऱ्या कल्याण- डोंबिवली महापालिकेला शहरातील दुरवस्थेत असलेल्या स्मारकांचा मात्र विसर पडला असल्याचे दिसून येते. अतिरेक्यांशी लढताना २००६ मध्ये जम्मू-काश्मीर येथे वीरमरण आलेल्या शहीद नीलेश संगपाळ यांच्या स्मारकाची दुरवस्था झाली आहे. शहीद जवानांची पालिकेला केवळ स्वातंत्र्यदिनी आठवण येते, इतर वेळी मात्र त्यांना विसर पडतो. त्यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या स्मारकाच्या दुरुस्तीसाठी पालिकेला वेळ आणि निधीही मिळत नाही ही दुर्दैवाची बाब असल्याचे सांगत शहीद जवानाचे वडील मधुकर संगपाळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कल्याण पश्चिमेतील सिंडिकेटजवळील राणी लक्ष्मीबाई उद्यानाजवळ शहीद नीलेश संगपाळ यांचे स्मारक कल्याण डोंबिवली महापालिकेने काही वर्षांपूर्वी उभारले. या स्मारकाची आता मात्र दुरवस्था झाली आहे. स्मारकाच्या बाजूचा चौथरा पूर्णपणे उखडला असून स्मारकाच्या बाजूच्या संरक्षणार्थ लावलेल्या साखळ्याही तुटल्या आहेत. स्मारकाच्या बंदुकीवरील जवानाचे शिरस्त्राणही गायब झाले आहे. या स्मारकाच्या समोरच महापालिका आयुक्तांचे निवासस्थान आहे.
या मार्गावरून अनेकदा प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय लोकप्रतिनिधी ये-जा करतात. असे असताना एकाचेही या स्मारकाच्या दुरवस्थेकडे का लक्ष नाही असा संतप्त सवाल मधुकर यांनी उपस्थित केला आहे. महापालिकेला जर शहिदांचा मान ठेवता येत नसेल तर त्यांनी किमान अशा प्रकारे त्यांच्या त्यागाची आणि बलिदानाची कुचेष्टा तरी करू नये. हे माझ्या मुलाने दिलेल्या बलिदानाचे दुर्दैव असल्याची भावना आमच्या मनात येते असे ते उद्गेवाने म्हणाले. महापालिका आयुक्तांना या स्मारकाच्या देखभालीकडे लक्ष देण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. तसेच दुरुस्ती करणार आहात की नाही असा स्पष्ट जाबही विचारला आहे, मात्र पालिकेने त्यांना अद्याप याविषयी उत्तर आले नसल्याचे ते म्हणाले.