गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेल्या पत्रीपुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण करावे. हे काम लष्कराच्या मदतीने पूर्ण करावे, अशी मागणी भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

पत्रीपूल भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या वेळी हा पूल येत्या तीन महिन्यांत बांधून पूर्ण केला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मात्र आठ महिने उलटून गेल्यानंतरही हे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. गेल्या आठवडय़ात या पुलाच्या ठिकाणी एका तरुणाला जीव गमवावा लागला. यावरून लोकप्रतिनिधींवर टीकेची झोड उठताच कल्याणचे भाजप आमदार नरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन रखडलेल्या पत्रीपुलाचे बांधकाम लष्कराकडून करून घ्यावे, अशी मागणी एका पत्राद्वारे केली आहे.

दरम्यान, राज्य रस्ते विकास महामंडळ, रेल्वेच्या अभियंत्यांनी या रेल्वे मार्गावरील पुलाची निविदा प्रक्रिया अद्याप सुरू केलेली नाही. या पुलाचे लोखंडी सांगाडे बनवण्याची कामे हैदराबाद येथे सुरू आहेत. त्यामुळे हे काम सुरू होण्यास आणखी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तवली जात आहे.