आज विरारमध्ये वितरण कार्यक्रम

वसई: वसई: करोना काळातील अभ्यासपूर्ण मालिकेचे लेखन आणि आरोग्यविषयक जनजागृतीपर कार्यक्रमांच्या आयोजनासाठी ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांना यंदाच्या ‘आरोग्य ज्ञानेश्वरी’ पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. विरारच्या ग्लोबल सिटी येथे बुधवारी, ११ नोव्हेंबर रोजी हा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी ‘आरोग्य ज्ञानेश्वरी’ या आरोग्यविषयक दिवाळी अंकाचे प्रकाशनही केले जाणार आहे.

आरोग्यासंदर्भात जनजागृती व्हावी, या हेतूने विरारमधील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉक्टर हेमंत जोशी दरवर्षी ‘आरोग्य ज्ञानेश्वरी’ हा दिवाळी अंक प्रसिद्ध करतात. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘आरोग्य ज्ञानेश्वरी’ पुरस्काराने सन्मानित केले जाते.

२००१ पासून हा पुरस्कार देण्यात येतो. यंदा ‘लोकसत्ता’चे संपादक गिरिश कुबेर यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. करोना विषाणूने भारतात हातपाय पसरण्यास सुरुवात केल्यानंतर लागू करण्यात आलेली टाळेबंदी, त्यामुळे निर्माण झालेले आर्थिक प्रश्न, जनतेची मानसिकता, आरोग्यविषयक दृष्टिकोन, जागतिक परिस्थिती अशा विविध पैलूंवर भाष्य करणारी कुबेर यांची ‘कोविडोस्कोप’ ही लेखमाला चांगलीच गाजली होती. करोनामुळे निर्माण झालेल्या आरोग्यविषयक प्रश्नांवर जनजागृती करण्यासाठी ‘लोकसत्ता’च्या वतीने ‘आरोग्यभान’ कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात येत होते. या उल्लेखनीय कार्याबद्दल कुबेर यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. यावेळी ‘आरोग्य ज्ञानेश्वरी’ या दिवाळी अंकाचे प्रकाशनही कुबेर यांच्या हस्ते केले जाणार आहे.

करोनामुळे केवळ ५० जणांच्या उपस्थितीला परवानगी असल्याने हा कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठी असणार आहे. मात्र प्रकाशन सोहळा आणि कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण http://linktr.ee/doctorjoshi या लिंक वर थेट पाहता येणार आहे.