लोकसंख्या निकषाप्रमाणे नगरसेवकांच्या संख्येत चारने घट

भगवान मंडलिक, लोकसत्ता

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतून १८ गावे वगळल्यानंतर उपलब्ध लोकसंख्येच्या निकषाप्रमाणे आगामी पालिका निवडणुकीसाठी ११८ प्रभाग निर्माण होणार आहेत. या प्रभागांमधून निवडून येणारे शहरी आणि २७ गावांमधील पालिकेत समाविष्ट असलेल्या नऊ गावांतील नगरसेवक पालिकेत असतील. १८ गावांचे नेतृत्व करणारे १३ नगरसेवक पालिकेतून कमी झाले तरी प्रत्यक्षात लोकसंख्या निकषाप्रमाणे चारच नगरसेवक पालिकेतून कमी होणार आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

कल्याण-डोंबिवली पालिकेत एकूण १२२ नगरसेवक आहेत. २७ गावांतील २१ प्रभागांमधील १३ नगरसेवक १८ गावे वगळल्याने पालिकेतून बाद झाले आहेत, तर पालिकेत समाविष्ट असलेल्या नऊ गावांमधील केवळ आठ नगरसेवक पालिकेत प्रतिनिधित्व करीत आहेत. पालिकेतून १३ नगरसेवक कमी झाल्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत १०९ प्रभागांमध्ये निवडणूक होईल, असा अनेकांचा अंदाज होता. मात्र, निवडणूक आयोगाच्या नियमामुळे हा अंदाज चुकीचा ठरला आहे. निवडणूक आयोगाच्या कलम पाचमधील तरतुदीप्रमाणे लोकसंख्येच्या प्रमाणात पालिकांना प्रभागांची रचना करावी लागते. शहरातील १२ लाख लोकसंख्येच्या प्रमाणात ११५ नगरसेवक अपेक्षित आहेत. १२ ते २४ लाख लोकसंख्येसाठी १२२ नगरसेवकांची तरतूद आहे, तर १२ लाख लोकसंख्येच्या पुढे प्रत्येकी ४० हजार लोकसंख्येसाठी एक नगरसेवक प्रस्तावित आहे. कल्याण-डोंबिवली पालिकेची लोकसंख्या १२ लाख आहे. पाच वर्षांपूर्वी २७ गावांचा पालिकेत समावेश झाल्यामुळे येथील एक लाख ३० हजार ४२९ लोकसंख्या पालिकेत समाविष्ट झाली होती. मात्र, त्यापैकी १८ गावे वगळण्यात आली असून केवळ ९ गावे पालिकेत समाविष्ट करण्यात आली आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे शहरी पट्टय़ातील १२ लाख आणि पालिकेत समाविष्ट केलेल्या नऊ गावांतील लोकसंख्या अशी १३ लाख ३० लोकसंख्येच्या आधारे पालिकेची आगामी निवडणूक घेण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. या लोकसंख्येच्या आधारे प्रभाग रचना होणार आहे, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

काटेकोर पद्धतीने प्रक्रिया

१२ लाख लोकसंख्येसाठी ११५ नगरसेवक, त्याच्या पुढील प्रत्येकी ४० हजार लोकसंख्येसाठी एक नगरसेवक प्रस्तावित असल्यामुळे नऊ गावातील लोकसंख्येसाठी तीन नगरसेवक प्रस्तावित होतात. म्हणजे एकूण ११८ नगरसेवक लोकसंख्येच्या निकषाप्रमाणे पालिका निवडणुकीसाठी प्रस्तावित असतील. आयोगाच्या तरतुदीप्रमाणे हे नियम पाळावे लागतात. अन्यथा चुकीच्या प्रक्रिया राबवून त्याला न्यायालयात आव्हान मिळाले तर पालिकेने केलेली प्रक्रिया कायद्याच्या कसोटीवर टिकत नाही. त्यामुळे अतिशय काटेकोर पद्धतीने ही प्रक्रिया पार पाडावी लागते, अशी माहिती एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

नवीन प्रभाग रचना प्रस्तावित

सुरुवातीला २७ गावांसह प्रभाग रचनेचे काम सुरू करा, अशी अधिसूचना कडोंमपाला निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाली होती. शासन आदेशाप्रमाणे १८ गावांची स्वतंत्र नगरपरिषद स्थापनेसंदर्भात हरकती-सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी मागविल्या होत्या. त्यामुळे आगामी निवडणुका कशा घ्याव्यात याबाबत आयोगाकडे मार्गदर्शन मागविण्यात आले होते. त्यावर आयोगाने १८ गावांना वगळून समाविष्ट नऊ गावांसह प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत.निवडणूक आयोगाच्या तरतुदीप्रमाणे वगळलेल्या गावांचा विचार करून नवीन प्रभाग रचना प्रस्तावित करण्यात येणार आहे. शहरी आणि समाविष्ट नऊ गावांचा विचार करताना ११८ नगरसेवक नवीन रचनेत असतील. त्या आधारे आगामी पालिका निवडणुकीची आखणी करण्यात येईल, असे कडोंमपाचे सचिव संजय जाधव यांनी सांगितले.