News Flash

ठाणे शहरात करोना रुग्णांसाठी अतिरिक्त अडीच हजार खाटांची व्यवस्था

पालकमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना

(संग्रहित छायाचित्र)

पालकमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना

ठाणे : शहरात दररोज सरासरी एक हजाराहून अधिक करोना रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य व्यवस्था अपुरी पडण्याची भीती व्यक्त होत असून या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने तीन नव्या करोना रुग्णालयांच्या माध्यमातून अडीच हजार खाटा लवकरच उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या तीन करोना रुग्णालयांची पाहणी करून प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना केल्या असून त्याचबरोबर रुग्णालयात दाखल होण्यासाठी रुग्णाला तिष्ठत राहावे लागू नये आणि त्यांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी येता कामा नयेत, असा इशाराही दिला आहे.

वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन दिवसांपूर्वी पालिका अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन त्यात करोनाविरुद्धच्या लढय़ासाठी पुन्हा पूर्ण क्षमतेने सज्ज होण्याचे आदेश दिले होते. खाटा उपलब्ध नाही आणि रुग्णवाहिका मिळत नाही, अशा तक्रारी येऊ नयेत, यासाठी योग्य नियोजन करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. तसेच कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला होता. त्यानंतर नवीन तीन करोना रुग्णालये तातडीने रुग्णसेवेत दाखल करण्यासाठी पालिका प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. या रुग्णालयांची पाहणी करून तेथील तयारीचा आढावा पालकमंत्री शिंदे यांनी शनिवारी घेतला. करोनाच्या पहिल्या लाटेत बुश कंपनीच्या जागेवर रुग्णालय सुरू करण्यात आले होते. तिथे ४५० खाटांची क्षमता आहे. परंतु, काही महिन्यांपूर्वी रुग्णसंख्या घटल्यामुळे या रुग्णालयाचा पूर्ण क्षमतेने वापर होत नव्हता. मात्र, आता पुन्हा रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत असल्यामुळे हे रुग्णालय पुन्हा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे निर्देश शिंदे यांनी यावेळी दिले. पोखरण रस्ता क्रमांक दोन येथील व्होल्टास कंपनीच्या जागेवर एक हजार खाटांच्या क्षमतेचे रुग्णालय उभारण्यात आले असून तेसुद्धा रुग्णसेवेत दाखल होण्यासाठी सज्ज आहे. ज्युपिटर रुग्णालयाजवळील पार्किंग प्लाझा येथे ११६९ खाटांच्या क्षमतेचे रुग्णालय उभारण्यात आले असून त्याचा अंशत: वापरही सुरू झाला आहे. सद्य:स्थितीत या ठिकाणी ३५० खाटांचा वापर सुरू आहे. मनुष्यबळ वाढवून हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे आणि या ठिकाणी आणखी किमान ५०० खाटा वाढवण्यासाठी नियोजन करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. प्राणवायू असलेल्या खाटांना प्राणवायूचा पुरवठा अव्याहत होईल, याची खबरदारी घ्यावी. रुग्णालये तसेच विलगीकरण कक्षामध्ये जेवणासंबंधी किंवा गैरसोयीच्या कुठल्याही तक्रारी येता कामा नये. औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवा. प्रत्येक रुग्णाचा जीव महत्त्वाचा असून रुग्णालयात दाखल होण्यासाठी रुग्णाला तिष्ठत राहावे लागू नये. त्याच्यावर तातडीने उपचार होण्याची गरज असून पहिल्या टप्प्यात महापालिकेने ज्या कार्यक्षमतेने काम केले, त्याहीपेक्षा अधिक सजगपणे काम करण्याची गरज आहे, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या आहेत.

दीड लाख नागरिकांचे लसीकरण

ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत एक लाख ५० हजार ४१३ नागरिकांना पालिका तसेच खासगी रुग्णालयात करोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. त्यामध्ये २० हजार ६९२ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला तर ११ हजार १७७ कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2021 12:02 am

Web Title: arrangement of additional 2500 beds for corona patients in thane city zws 70
Next Stories
1 मीरा-भाईंदरमधील करोनास्थिती चिंताजनक
2 महापालिकेचे कर्मचारी वाहनचोरीचे सूत्रधार
3 शहरबात : वास्तववादी अर्थसंकल्पाचे महत्त्व
Just Now!
X