किशोर कोकणे

वडाळा ते ठाणे मेट्रोच्या कामांमुळे होणारी वाहतूक कोंडी त्रासदायक ठरत असताना ही कामे गणेशोत्सवाच्या उत्साहावरही विरजण घालण्याची शक्यता आहे. मेट्रोमार्गालगत उभारण्यात आलेले मार्गरोधक आणि अरुंद झालेले रस्ते यामुळे गणेशमूर्तीची आगमन मिरवणूक मंडळांसाठी चिंतेचा विषय ठरू लागली आहे. वागळे इस्टेट आणि घोडबंदर परिसरात ही अडचण प्रामुख्याने जाणवू लागली असून यावर पर्याय शोधण्याची मागणी पालिका आणि वाहतूक पोलिसांकडे करण्यात येत आहे.

वडाळा ते ठाणे मेट्रो मार्गासाठी  मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मुंबई-नाशिक महामार्गावरील माजिवडा, कॅडबरी जंक्शन, नितीन कंपनी, तीन हात नाका या ठिकाणी तसेच घोडबंदर मार्गावर कापूरबावडी ते कासारवडवलीपर्यंत मेट्रोचे अडथळे बसविले आहेत. या अडथळ्यांनी मुख्य रस्त्याचा जवळ-जवळ अर्धा भाग गिळल्याने रस्ते वाहतुकीसाठी अरुंद झाले आहेत. त्यामुळे या मार्गावर रात्री आणि सकाळी अनेकदा वाहतूक कोंडी होत असते.

येत्या महिनाभरात गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. अनेक मंडळांमध्ये गणेश मूर्तीचे आगमन श्रावण महिन्याच्या मध्यावर होत असते. ठाणे शहरात सुमारे अडीचशे मंडळे नोंदणीकृत आहेत. या मंडळांपैकी ९० ते १०० मंडळे ही वर्तकनगर, वागळे इस्टेट भागांत, तर ५० हून अधिक मंडळे ही घोडबंदर पट्टय़ात आहेत. वर्तकनगर किंवा वागळे इस्टेट येथे जाणाऱ्या गणेशमूर्ती या नितीन कंपनी किंवा एलबीएस मार्गावरून येत असतात. मात्र, या दोन्ही ठिकाणी अडथळे उभारण्यात आले आहेत, तर घोडबंदर येथे जाणाऱ्या मूर्तीना मुख्य मार्गाशिवाय कोणताच पर्याय नाही. त्यामुळे मुंबईतून ठाण्यात दाखल होणाऱ्या अनेक गणेशमूर्तीची वाट अडण्याची शक्यता आहे.

प्रशासनाकडे मागणी

ठाण्यात मेट्रोच्या कामांमुळे ठिकठिकाणी अडथळे बसविण्यात आले आहे. त्यामुळे गणपतीच्या आगमनादरम्यान, हे अडथळे विघ्न ठरू शकतात, अशी भीती ठाणे गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष समीर सावंत यांनी व्यक्त केली. त्यामुळे एमएमआरडीएने गणेश आगमनापूर्वी काही दिवस तसेच विसर्जनापूर्वी हे अडथळे आतील बाजूस घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली. अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडांच्या फांद्यांचाही अडसर होत आहे. त्या फांद्यांची छाटणी करण्याबाबत पालिकेशी पत्रव्यवहार करण्यात आल्याचेही ते म्हणाले.