संजय धबडे, कलादिग्दर्शक
ठाण्यात पार पडलेल्या ९६व्या अखिल भारतीय नाटय़ संमेलनाच्या रंगमंच आणि त्यावर उभारण्यात आलेल्या नेपथ्याचे सगळ्याच मान्यवरांनी कौतुक केले. भव्यदिव्य रंगमंच, त्यासमोर भव्य सभागृह, ठाण्यासह महाराष्ट्रातील स्थळे आणि नाटक या सगळ्या वैशिष्टय़ांचे एकत्रीकरण करून तयार केलेले नेपथ्य, मासुंदा तलावावर साकारण्यात आलेला तरंगमंच या सगळ्या गोष्टींनी ठाणेकरांबरोबर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांतून आलेल्या कलाकार रसिकांना मनमुराद आनंद दिला. दादोजी कोंडदेव स्टेडियमवर उभारण्यात आलेला भव्य रंगमंच जसा देखणा होता, त्याप्रमाणेच त्याला ‘अग्निरोधक’ पडद्यांनी सजवण्यात आले होते. त्यामुळे सौंदर्याबरोबरच अग्निसुरक्षा, मजबूतपणा आणि सुरक्षेच्या अनेक गोष्टींचा विचार यामध्ये करण्यात आला होता. ‘मेक इन इंडिया’च्या निमित्ताने मुंबईत झालेल्या आगीच्या घटनेच्या पाश्र्वभूमीवर कलादिग्दर्शक संजय धबडे यांनी याची विशेष काळजी घेतली होती. रंगमंचाच्या सुरक्षेचा आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्थरावर केल्या जाणाऱ्या उपाययोजना जाणून घेण्यासाठी संजय धबडे यांच्याशी ‘लोकसत्ता ठाणे’ने संवाद साधला.

’ कलादिग्दर्शन या क्षेत्रामध्ये तुम्ही कसे आलात?
मी मूळचा डोंबिवलीकर असून याच शहरामध्ये मी लहानाचा मोठा झालो. वडिलांना नाटकांची आवड होती आणि मला कलेची रुची होती. त्यामुळे गणेशोत्सवासारख्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन तेथील सजावट करण्याची लहानपणापासून सुरुवात केली. डोंबिवली शहराच्या काही परंपरा आणि वारसा आहेत, त्या गोष्टी तेथील तरुणांमध्ये आपोआप रुजल्या जातात. सांस्कृतिक कार्यक्रमांची ओढ असल्याने कलादिग्दर्शनाच्या छोटय़ा कामांना सुरुवात केली. पूर्वीच्या काळी सजावटीमध्ये केवळ रंगीत पडदे त्यावर हाताने लिहिलेली नावे, चित्रे यांचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जात होता. पुढे या क्षेत्रातील काही मान्यवरांशी संपर्क आला आणि त्यांच्यासह सहकलादिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यातून ‘भारत एक खोज’, ‘चाणक्य’ यांसारख्या मालिकांमध्ये नितीश राय या मोठय़ा कलादिग्दर्शकाबरोबर काम करण्याचा योग आला. पुढे कलादिग्दर्शनाची कामे मिळू लागली. ‘परिंदा’, ‘खलनायक’, ‘हम आपके है कौन’, ‘द हिरो’ यांसारख्या चित्रपटांमध्ये कलादिग्दर्शन करता आले. वेगवेगळे पुरस्कार सोहळे, परिषदा, संमेलने यांमध्ये कामे सुरू करण्यात आली. सुरुवातीला यामध्ये कोणत्याही प्रकारचा भव्यदिव्यपणा नव्हता. अत्यंत साध्या पद्धतीने कलादिग्दर्शन केले जात होते. मात्र हळूहळू त्यामध्ये बदल घडू लागले आणि चलचित्र, फिल्मी प्रवेशांचा काळही सुरू झाला. त्या वेळीही कलादिग्दर्शनाच्या आधुनिक गोष्टींचा वापर करण्याचा नेहमीच प्रयत्न केला. पुढील काळात कलादिग्दर्शन अधिकच बदलले असून आता थ्रीडी प्रकारामध्ये रंगमंच सजवला जातो. यापुढेही अनेक वेगवेगळ्या नव्या संकल्पना येणार असून त्यांचा स्वीकारण्याचा नेहमीच प्रयत्न करत आहोत.
’ कलादिग्दर्शनातील सुरक्षेचे महत्त्व तुम्हाला कधी जाणवले?
सुरुवातीच्या काळात भव्यदिव्य रंगमंच आणि सजावटीचे आकर्षण नव्हते, मात्र नंतरच्या काळात त्याला महत्त्व प्राप्त झाले. मात्र अशा भव्य गोष्टी साकारत असताना होणारे छोटे-छोटे अपघात सुरक्षेचे महत्त्व विषद करत गेल्या. त्यामुळे रंगमंच साकारताना आणि त्यावर सुरू असलेले कार्यक्रम संपल्यानंतरही त्याच्यापासून कोणाच्याही जिवाला अपाय होता कामा नये ही काळजी घेण्यास सुरुवात झाली. या इंडस्ट्रीमधील सगळ्याच मंडळींनी या सुरक्षेला महत्त्व देण्यास सुरुवात केली आहे. कलादिग्दर्शन करताना घ्यावयाच्या काळजीविषयी अनेक नियमावली भारतीय कायद्यांमध्ये आहे, मात्र त्या पाळल्या जात नाहीत. त्यामुळे अपघाताचे प्रसंग ओढवत असतात. याविषयीची जागृती परदेशांमध्ये मात्र मोठय़ा प्रमाणात आहे. पॅरिस येथे एका विवाह सोहळ्यासाठी एक सेट उभारत असताना सुरक्षेच्या विषयीची जागरूकता लक्षात आली. तेथे प्रशासनाकडून रंगमंचाची पूर्ण माहिती घेतली जाते. अग्निरोधक पडदे, रंगकाम करतानाही ते अग्निरोधक असले पाहिजे तसेच रंगमंचाच्या आधारासाठी साखळदंड अशी सगळी काळजी तेथील प्रशासन घेते आणि त्याचे निरीक्षणही करते. त्यांच्याकडे असलेली जागृती पाहून आपल्याकडे अनेकवेळा होत असलेले दुर्लक्ष पाहून काळजी वाटते. परदेशामध्ये प्रत्येक नागरिकाच्या जीविताला खूप महत्त्व दिले जाते. त्यामुळे त्यांच्याकडे अशी काळजी घेतली जाते ती आपल्याकडेही राखण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच सगळ्याच कलादिग्दर्शकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
’ नाटय़ संमेलनाच्या रंगमंचाच्या कलादिग्दर्शनाची जबाबदारी कधीपासून निभावत आहात? आपल्या रंगमंचाची वैशिष्टय़े काय?
डोंबिवलीमध्ये झालेल्या नाटय़ संमेलनाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी पहिल्यांदा माझ्यावर आली होती. त्यापूर्वीच्या नाटय़ संमेलनांमध्ये कोणत्याही प्रकारचे नेपथ्य वापरले जात नसत. केवळ एका पडद्यावर कलाकुसर करून त्याचा उपयोग केला जात होता. मात्र रंगभूमीवर जर नेपथ्याचा एवढा प्रभावी वापर केला जातो, तर नाटय़ संमेलनातही त्याचा भव्यदिव्य वापर होण्याची गरज होती. हेच ओळखून आपण डोंबिवलीच्या संमेलनात वैशिष्टय़पूर्ण रंगमंच उभारण्यासाठी प्रयत्न केला. थ्रीडी रंगमंचाच्या नेपथ्यासाठीचा पहिला वापर इथे झाला आणि पुढील प्रत्येक संमेलनामध्ये हा ट्रेण्ड वापरला गेला. डोंबिवलीची वैशिष्टय़े आणि रंगभूमीची वैशिष्टय़े त्यावर कोरण्यात आली होती. पु. ल. देशपांडे, नाटय़शास्त्राचे निर्माते भरतमुनी अशा सगळ्यांची प्रतिकृती डोंबिवलीच्या संमेलनात तयार करण्यात आली होती. त्या वेळी नटराजाची मूर्ती तयार करण्यात आली असून ती आजही सावित्रीबाई फुले नाटय़गृहामध्ये दिमाखात उभी आहे. रंगमंचावर थ्रीडी हा वेगळा ट्रेण्ड या निमित्ताने निर्माण झाला असून आजही कायम आहे.
’ रंगमंचाची उभारणी करताना सुरक्षेच्या दृष्टीने कोणती काळजी घेता?
रंगमंच उभारणी करताना सगळ्यांनी काही तत्त्वे ठरवून घेण्याची गरज आहे. सामान्यपणे रंगमंच उभारण्याचा कालावधी कमी असतो व काम मोठे असते. अनेकवेळा काम रात्रीच्या वेळी करावे लागते. यामुळे अनेकवेळा मोठय़ा जोखमी घेतल्या जातात. मात्र अशी कोणतीच जोखीम घेऊ नये असा आमचा प्रयत्न राहतो. रात्रीच्या वेळी काम करत असताना कामगारांनी उंचावर चढू नये, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची बांधणी नीटनेटकी करण्यात आली पाहिजे. खुल्या विद्युतवाहिन्या इकडे-तिकडे पसरणार नाही. रंगमंचाखाली व्यवस्थितपणे फिरता येईल अशा प्रकारची जागा ठेवली जाते. सुरक्षेच्या दृष्टीने तेथे प्रकाशयोजनाही करण्यात येते. पोलिसांना तपासणीसाठी श्वानपथकासह तेथे व्यवस्थित जाता येईल, असा रंगमंचाचा तळाकडील भाग तयार केला जातो. अशी सगळी काळजी घेतली जाते. अनेकवेळा कमी पैशांमध्ये मोठी कामे करून घेण्याची इच्छा अनेकांना असते, मात्र त्यामधील धोके आम्ही
त्यांना समजावून सगळ्या गोष्टींची गरज पटवून देत असतो.
’ या क्षेत्रात येणाऱ्या नव्या पिढीला काय सांगाल?
कलादिग्दर्शन हे क्षेत्र खूपच कलात्मक आहे. प्रत्येक गोष्टीची माहिती करून त्यानुसार आपल्याला आपली कला सादर करण्याची संधी इथे मिळते. त्यामुळे या क्षेत्रात यायचे असेल तर त्यासाठीच्या तांत्रिक बाबींचा आभ्यास करून या क्षेत्रामध्ये प्रवेश करा. अर्धवट ज्ञान घेऊन काम करण्याचा प्रयत्न करू नका, त्यामुळे अपघात होण्याची अधिक शक्यता आहे. चित्रपट क्षेत्रामध्ये अनेक तरुण मंडळी दाखल होत असून ते चांगले कलादिग्दर्शन करत आहेत. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.

case filed in Actor Aamir Khan deep fake tape case
अभिनेता आमिर खान डीपफेक चित्रफीतीप्रकरणी गुन्हा दाखल
Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
raj thackray mns latest news
मनसेच्या विश्वासार्हतेला उतरती कळा; बदलत्या भूमिकेमुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांत संभ्रम
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!