शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलमध्ये दर्शनी भागात उभारण्यात आलेले अतिशय देखणे कलादालन रसिकांचे लक्ष वेधून घेत होते. दीनानाथ दलाल, गजानन जाधव आणि जिव्या सोमा माशे या जागतिक कीर्तीच्या कलावंतांच्या अमूल्य चित्रांचा सहभाग हे या कलादालनाचे प्रमुख वैशिष्टय़ ठरले. त्याचबरोबर जुन्या आणि नव्या पिढीतील मातबर चित्रकारांच्या कला सादरीकरणालाही रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभला.

अंबरनाथमध्ये रंगलेल्या शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलमध्ये संगीत आणि खाद्यमहोत्सवाबरोबरच धर्मवीर आनंद दिघे कलादालनही रसिकांसाठी एक मोठी पर्वणी ठरली आहे. जागतिक कीर्तीचे चित्रकार, राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवलेले युवा चित्रकार आणि त्यांचे प्रत्यक्ष चित्र सादरीकरण हे रसिकांच्या कला जाणिवा श्रीमंत करीत आहेत. जुन्या, नव्या चित्रकारांची चित्रे रसिक आवर्जून पाहत होते. कलादालनाच्या प्रांगणात अनेक कलावंत कॅनव्हॉसवर निरनिराळ्या शैलीतील चित्रे काढीत होते. प्रत्यक्ष चित्रकर्त्यांकडून त्यांच्या कलाकृतीमागचे मर्म जाणून घेण्याची संधी रसिकांना यानिमित्ताने मिळाली.

जिव्या सोमा माशे यांच्या वारली चित्रांनाही मोठी पसंती मिळत आहे.  ललित कला अ‍ॅकॅडमीचा पुरस्कार मिळालेल्या विक्रांत भिसे यांनीही त्यांची समकालीन विषयांवर आधारित ‘इम्प्रेशन’ या प्रकारातील चित्रांचे थेट सादरीकरण केले. त्यांच्याभोवतीही जाणकार रसिकांनी गर्दी केली होती. अंबरनाथ शहरात अशा प्रकारचे कायमस्वरूपी कलादालन असावे अशी भावना रसिक व्यक्त करत होते. लॅण्डस्केप प्रकारात प्रसिद्ध असलेले गणेश हिरे यांच्यासह वीरेंद्र चोपडे, असिफ शेख, चंद्रकात बोराडे, संदीप शिंदे, अक्षय पै, वैभव नाईक आणि सचिन सावंत यांच्यासारख्या चित्रकारांनीही या वेळी आपली कला सादर केली.