चाळीस वर्षांपूर्वी सांस्कृतिक श्रीमंती एवढी होती की वैज्ञानिक श्रीमंतीची उणीव जाणवायची नाही. कुमारगंधर्व, पंडित भीमसेन जोशी यांची कला जवळून अनुभवल्याने विज्ञान आणि तंत्रज्ञान यापेक्षा कला जास्त महत्त्वाची आहे असे वाटू लागते. आता तरुणाई तंत्रज्ञानावर अधिक भुलू लागली आहे. मात्र माझं पहिलं प्रेम लिखाणावर आहे. मराठी ज्ञानभाषा झाली पाहिजे असा माझा प्रयत्न असून त्यात अर्धा टक्का जरी वाढ झाली तरी मी समाधानी आहे, असे मत लेखक अच्युत गोडबोले यांनी येथे एका कार्यक्रमात व्यक्त केले.
पै फ्रेण्ड्स लायब्ररीच्या २९ व्या वर्धापनदिनानिमित्त येथील सर्वेश सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘माझा लेखन प्रवास’ या विषयावर बोलताना त्यांनी वरील मत व्यक्त केले. आपण मुलांना डॉक्टर, इंजिनीअर या एकाच साचेबद्ध जीवन प्रवासातून मार्गक्रमण करायला भाग पाडतो. त्यांना वेगळ्या वाटा चोखाळायला देत नाही. त्यामुळे नोबेल पारितोषिक भारतात आणू शकेल, अशी व्यक्तिमत्त्वे आपल्याकडे अपवादानेच दिसतात. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एकही नवीन प्रकल्प आपण बनविलेला नाही. हे आपले अपयश आहे. मुलांना वेगळ्या वाटेवर जाऊ द्या, यश- अपयशाची जाणीव त्यांना होऊ द्या, असे सांगताना त्यांनी लेखन करताना मी तज्ज्ञ समीक्षकाचा आव आणत नाही, असे स्पष्ट केले. माझ्या लेखनाला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळतो. यामुळे मी समाधानी आहे. लेखनावर प्रेम असल्याने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठय़ा पगाराच्या नोकऱ्या मी नाकारल्या. अनेक पुस्तके वाचून मराठी भाषिकांना योग्य माहिती रंजकतेने द्यायची असे ठरवून मी लिखाण केले. ते अनुवादन नाही, असेही ते म्हणाले. वाचन संस्कृती कमी होत असताना पै फ्रेण्ड्स लायब्ररीचे पुंडलिक पै हे वाचक घडविण्याचे काम करीत आहेत. यावेळी लेखक गोडबोले यांच्या हस्ते उत्तम कादंबरीकारांना देण्यात येणाऱ्या मधुश्री पुरस्काराचे वाटप करण्यात आले. यात सवरेत्कृष्ट पुरस्कार ल.सी.जाधव (सुंभ आणि पीळ), कृष्णात खोत (धुळमाती) व डॉ. आशुतोष जावडेकर (मुळारंभ) यांना देण्यात आला. तसेच अत्युत गोडबोले व दीपा देशमुख लिखित कॅनव्हॉस या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.

‘अजून लिखाण करायचे आहे’
आजची पिढी तंत्रज्ञानावर भर देत असली तरी चित्रकला, शिल्पकला अशा कलाही तेवढय़ाच महत्त्वाच्या आहेत. साहित्यात वेगळे काही तरी लिहायचे म्हणून मी कॅनव्हॉसविषयी लिहिले. मला अजून खूप लेखन करायचे असून यासाठी मदत म्हणून दीपा देशमुख यांचे सहकार्य लाभत असल्याचेही त्यांनी सांगितले.