ठाणे शहरातून अधिकाधिक कलाकार व खेळाडू निर्माण व्हावेत तसेच ठाणेकरांना विविध कलांचा अविष्कार तसेच खेळांचा थरार अनुभवता यावा, या उद्देशाने महापालिकेने यंदा कला व क्रीडा प्रकारांचे एकत्रित आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुर्वी शहरातील एखाद्या विशिष्ट प्रभागात हा महोत्सव आयोजित केला जात असे. तसेत कला आणि क्रिडा असे महोत्सवाचे वेगवेगळे भाग पाडले जात असत. त्यामुळे अन्य प्रभागातील नागरिकांना या महोत्सवांचा  अस्वाद घेता येत नव्हता. यंदाच्या महोत्सवाच्या माध्यमातून महापालिकेच्या नऊ प्रभाग समिती स्तरावर कला तसेच क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा घेण्यात येणार असून त्याच्या अंतिम फेऱ्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात एकत्रित पार पडणार आहेत. या महोत्सवाच्या निमित्ताने शहरांमध्ये कला तसेच क्रीडा प्रकारांचे वातावरण निर्माण करण्याचा महापालिकेचा विचार आहे.

ठाणे महापालिकेच्यावतीने दरवर्षी देशी खेळांना उत्तेजन देण्यासाठी महापौर चषक स्पर्धाचे आयोजन करण्यात येते. त्याचबरोबर  कला स्पर्धाचेही आयोजित करण्यात येतात. या स्पर्धाचे स्वतंत्रपणे आयोजन करण्यात येते आणि शहरातील एखाद्या प्रभागामध्येच या स्पर्धा होतात. स्वतंत्र आयोजनामुळे स्पर्धाना फारसे महत्व प्राप्त होत नाही. तसेच या स्पर्धा एखाद्या प्रभागापुरत्याच मर्यादित राहतात. यामुळे अशा स्पर्धाचा ठाणेकरांना अस्वाद घेता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन यंदा शहरामध्ये एकत्रित कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ठाण्याचे महापौर संजय मोरे यांनी दिली. या महोत्सवामध्ये कब्बडी, खो-खो, जिल्हास्तरीय शरिरसौष्ठव, अ‍ॅथलेटिक्स, मल्लखांब, कॅरम, बॅडमिंटन, टेबल टेनिस, जिम्नॉस्टिक, जलतरण, बुद्धीबळ, ब्रास बँड, सायकल अशा स्पर्धा होणार आहेत.