विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी पालिकेचा निर्णय
ठाणे महापालिका शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा यासाठी महापालिकेने प्रसिद्ध व्यंगचित्रकार दिवंगत आर.के. लक्ष्मण यांच्या नावाने क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे, कळवा आणि मुंब्रा या शहरांमधील महापालिका शाळांचे तब्बल आठ गट पाडण्यात येणार आहेत. त्यानुसार या प्रबोधिनीचे कामकाज चालणार आहे. महापालिकेमार्फत नेमण्यात येणाऱ्या बाह्य़ संस्थेमार्फत या प्रबोधिनीचे कामकाज नियंत्रित केले जाणार असून, या आठ गटांमध्ये तब्बल ३६ क्रीडा शिक्षक नियुक्त केले जातील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. यंदाच्या अर्थसंकल्पात या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे ५० लाख रुपयांची तरतूद केली गेली आहे.
दरम्यान, महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही यंत्रणा उभारली जाणार आहे. येत्या आर्थिक वर्षांत सुरक्षित शाळा योजना हाती घेण्यात येणार असून या योजनेच्या माध्यमातून शाळा परिसरात सुरक्षेसाठी भिंती उभारण्याचे कामही हाती घेण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेच्या एकूण ८० शाळा इमारती असून त्या ठिकाणी १२१ शाळा भरविण्यात येतात. या शाळांमधून सुमारे ३४ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेल्या काही वर्षांपासून या शाळांमधील विद्यार्थ्यांचा टक्का सातत्याने घसरू लागला आहे. या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढावी आणि दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून यंदाच्या वर्षी कला व क्रीडा प्रबोधिनी उभारण्याचा निर्णय महापालिकेच्या शिक्षण मंडळाने घेतला आहे. महापालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास साधता यावा तसेच या विद्यार्थ्यांमध्ये कला आणि क्रीडागुण विकसित व्हावे यासाठी ही प्रबोधिनी कार्यरत राहील. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना चालना देण्याचे काम या प्रबोधिनीमार्फत हाती घेतले जाईल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

दरम्यान या शाळांमधील शिक्षण व्यवस्थेचा दर्जा वाढविण्यासोबत सुरक्षित शाळा या उपक्रमाच्या माध्यमातून विविध उपाय हाती घेतले जाणार आहेत. शाळा इमारतींमध्ये येत्या वर्षांत तीन ते पाच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तब्बल ८० शाळा इमारतींमध्ये २५० सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हे कॅमेरे इमारतीच्या १० फूट उंचीवर लावण्यात येणार आहेत. त्याचे रेकॉर्डिग ४५ दिवसांनी अद्ययावत करण्यात येणार आहे. या सर्व कॅमेऱ्यांचे नियंत्रण त्या त्या शाळांच्या मुख्याध्यापकांकडे ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी टीव्ही मॉनिटर मुखाध्यापकांच्या कक्षात ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेच्या ठिकाणी, सीसीटीव्हीबरोबरच प्रत्येक शाळेच्या संरक्षक भिंतीची उंची वाढविणे आणि काही ठिकाणी नव्याने संरक्षक भिंत उभारण्याचे प्रयोजनही करण्यात आले आहे. यासाठीदेखील यंदाच्या अंदाजपत्रकात भरीव अशी तरतूद करण्यात आली आहे.