डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृहामध्ये कला-क्रीडा महोत्सवानिमित्ताने शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात रांगोळी, वक्तृत्व आणि सुगमसंगीतचा त्रिवेणी संगम ठाणेकरांना अनुभवायला मिळाला. रांगोळी स्पर्धेच्या अंतिम फेरीत शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. तसेच वक्तृत्व स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्पर्धकांनी ‘सणांचे बदलते स्वरूप ते दहशतवादाच्या छायेत भारत’ अशा महत्त्वाच्या विषयांना हात घातला. त्याचप्रमाणे सुगमसंगीत स्पर्धेच्या अंतिम फेरीत सरस गाणी सादर केली.
दहा प्रभाग समिती स्तरांवर रांगोळी, वक्तृत्व, सुगम संगीत स्पर्धेच्या प्राथमिक फेरी घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील विजेत्यांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. या सर्व स्पर्धकांच्या अंतिम फेरी ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृहामध्ये नुकत्याच पार पडली. रांगोळी स्पर्धेच्या अंतिम फेरीत ३८ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. या स्पर्धकांनी रांगोळीच्या पायघडय़ा, गालिचा रांगोळी, चित्र रांगोळी अशा काढून आपल्या कला सादर केली. या स्पर्धेसाठी किशोर सावंत, उत्तरा गानू, मंजूषा चितळे यांनी काम पाहिले. सुगम संगीत स्पर्धेतील ४४ स्पर्धकांनी एकापेक्षा एक सरस गाणी सादर केली. या स्पर्धेसाठी नीलिमा गोखले, रसिका फडके, रघुनाथ फडके यांनी काम पाहिले.
वक्तृत्व स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी ४४ स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. वक्तृत्व स्पर्धेसाठी पहिली ते चौथी गटासाठी माझी शाळा, माझा आवडता पक्षी, माझा आवडता प्राणी, माझी आई हे विषय देण्यात आले होते. पाचवी ते दहावीसाठी दूरदर्शन वाहिन्यांच्या जाळयात आपण, पालकांसाठी शाळा हवी, सैनिक शिक्षण सक्तीचे हवे, कुणी मोबाइल देता का? असे विषय होते. खुल्या गटासाठी विचारवंतांची परंपराच संपली, या जन्मावर शतदा प्रेम करावे, सोशल मीडियाचा वाढता प्रभाव, सहिष्णुतावाद्यांचा देश,शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दहशतवाद्यांच्या छायेत : भारत आदी विषय देण्यात आले होते. या स्पर्धेसाठी अंजुषा पाटील, राजश्री मेनकुदळे या परीक्षकांनी काम पाहिले.