पुढे ढकलण्यास महापौरांचा नकार
आशियाई क्रीडा स्पर्धाच्या धर्तीवर महापालिका आयोजित कला-क्रीडा महोत्सव महापौर संजय मोरे यांच्या मातोश्रींच्या निधनामुळे पुढे ढकलण्याचा आग्रह काही पदाधिकाऱ्यांनी धरला होता. त्यामुळे येत्या रविवारी होणारा महोत्सव उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द होण्याची चिन्हे निर्माण झाली होती. मात्र, महापौर मोरे यांनी महोत्सव पुढे ढकलण्यास नकार दिल्यामुळे आता हा महोत्सवाचा नियोजित कार्यक्रम होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ठाण्याचे महापौर संजय मोरे यांच्या संकल्पनेतून ठाणे शहरात यंदा कला-क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीपासून महोत्सवाला सुरुवात झाली आहे. या महोत्सवामध्ये पहिल्यांदाच प्रभाग समिती स्तरावर विविध खेळांसह लोककला, वक्तृत्व स्पर्धा, पथनाटय़, मिस ठाणे, मास्टर ठाणे आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत. या स्पर्धाची प्राथमिक फेरी प्रभाग समिती स्तरावर सुरू झाली असून त्यास खेळाडूंसोबतच ठाणेकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या महोत्सवाच्या अंतिम फेरीतील स्पर्धा येत्या रविवारी दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात होणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या धर्तीवर या स्पर्धा घेण्यात येणार असून त्याच्या उद्घाटन सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. यामुळे ठाण्यातील सांस्कृतिक, साहित्यिक व क्रीडाविश्वात मानाचे पान ठरणारा व आशियाई क्रीडा स्पर्धाच्या धर्तीवरील भव्य उद्घाटन सोहळा ठाणेकरांना अनुभवण्याची संधी मिळणार आहे. महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला दोन दिवस शिल्लक राहिले असतानाच महापौर संजय मोरे यांच्या मातोश्री पुष्पलता यांचे निधन झाले. या महोत्सवाच्या नियोजनात महापौर मोरे हे अग्रस्थानी असल्यामुळे काही पदाधिकाऱ्यांनी हा महोत्सव पुढे ढकलण्याचा आग्रह धरला होता.
मात्र, महापौर मोरे यांनी त्यास नकार दिला आहे. आपल्या वैयक्तिक दु:खामुळे ठाणेकर खेळाडू व कलाकारांचे नाहक नुकसान होईल. त्यामुळे उद्घाटन सोहळा रविवारीच घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

महापौर रजनी लांबणीवर
कला-क्रीडा महोत्सवात ७ फेब्रुवारी रोजी महापौर रजनीचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी महापौर उपस्थित असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर महापौरांच्या प्रत्यक्ष उपस्थितीनेच अनेक संकल्पना चांगल्या पद्धतीने राबविता येऊ शकतील, असे मत काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे तूर्त रजनी काही दिवसांसाठी लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.