कल्याण : शहापूरजवळील कवडास गावातील दलित वस्तीमधील दलित स्त्री-पुरुषांना जातीवाचक शिवीगाळ केल्याने १५० जणांविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याने (अ‍ॅट्रॉसिटी) शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर वस्तीला गुरुवारी रात्री गावातील १५० जणांनी घेराव घातला. जातीद्वेषातून हा प्रकार करण्यात आला आहे, असा आरोप दलित वस्तीमधील रहिवाशांनी केला.

कवडास गावातील दलित वस्तीमधील शंतनू गायकवाड याला गुरुवारी गावातील श्रावण घरत याने दुचाकीवरून जात असताना हुलकावणी दिली. त्याचा जाब विचारण्यासाठी शंतनूचे कुटुंबिय हे श्रावणचा सासरा संजय यांच्या घरी गेले. तिथे साळवे कुटुंबीयांची बाजू ऐकण्याऐवजी त्यांना शिवीगाळ करण्यात आली. दरम्यान, संजय यांना जाब विचारल्याचा राग मनात धरून गावातील १५० जणांनी दलित वस्तीला घेराव घालून जिवे मारण्याच्या धमक्या तसेच जातीवाचक शिवीगाळ केली, असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी मंगळाबाई साळवी (६५) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी विनोद गोळे, रोहित घरत, श्रावण घरत, महादू घरत, पऱ्या घरत, सुभाष गोळे, दीपक गोळे, बबल्या गोळे, कल्पेश घरत, ज्ञानेश्वर घरत यांच्यासह १५० रहिवाशांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी दिलीप सावंत यांनी गावाला भेट दिली. तक्रारीतील आरोपींना अटक करण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम आढाव यांनी सांगितले.