महाराष्ट्राचे साहित्य-सांस्कृतिक वैभव कोणते? असे कोणी विचारले तर त्याचे उत्तर दर वर्षी प्रसिद्ध होणारे दिवाळी अंक असे म्हणता येईल. दिवाळी अंकांची एक वैभवशाली परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. अनेक नामवंत साहित्यिकांनी आपली साहित्यिक सेवा दिवाळी अंकांच्या माध्यमातून वाचकांना दिली आहे. ‘आवाज’, ‘माहेर’, ‘मौज’, ‘जत्रा’, ‘वसंत’, ‘किलरेस्कर’, ‘स्त्री’ यांसारख्या किती तरी दिवाळी अंकांचे प्रकाशन गेल्या पन्नासहून अधिक वर्षे सातत्याने होत आहे.
कल्याणमधल्या अशाच एका साहित्य सेवकाने दिवाळी अंकांच्या माध्यमातून केलेल्या सेवेचे योगदान लक्षात ठेवण्यासारखे आहे. कै. शरदचंद्र लक्ष्मण ऊर्फ शरूमामा बर्वे हे कल्याणमधले एक जुने रहिवासी. स्वत:ची आर्थिक परिस्थिती मध्यमवर्गीय, नोकरी पेशातले असले तरी शरूमामा बर्वे यांना साहित्याची आवड होती. वाचनाचे अफाट वेड, तसेच काव्याची आवड आणि काव्य करण्याचा छंद यामधून आपण स्वत: दिवाळी अंक काढावा, असे त्यांच्या मनाने घेतले. दिवाळी अंक सुरू करण्याचा हेतू कल्याणमधल्या साहित्यिकांचे दर्जेदार साहित्य प्रकाशित करणे याचबरोबर नवोदित कवी व साहित्यिकांना वाव देणे असा मुख्यत: हेतू होता. कल्याणसारख्या त्या वेळी छोटय़ा असलेल्या शहरात स्थानिक पातळीवर दीपावली अंक काढणे ही गोष्ट खरोखरच धारिष्टय़ाची आणि शिवधनुष्य पेलण्यासारखी होती; परंतु शरूमामा बर्वे यांनी हे धाडस पत्करावयाचे ठरविले आणि १९५६ च्या दिवाळीत ‘श्री’ या शरदचंद्र लक्ष्मण बर्वे संपादित दिवाळी अंकाचे प्रकाशन झाले. दिवाळी अंकाचे नियोजन, मुद्रितशोधन करणे, जाहिराती मिळविणे, जाहिरातदारांकडून अंक प्रसिद्ध झाल्यानंतर बिले वसूल करणे, अंकाचे मुखपृष्ठ आकर्षकरीत्या तयार करून घेणे, अंकाची दर्जेदार छपाई करून घेणे, दीपावली सुरू होण्याच्या आधी अंकाचे वितरण करणे अशा एक ना अनेक गोष्टी शरूमामांनी १९५६ ते १९७४ अशी सतत १८ वर्षे न थकता न कंटाळता केल्या. स्थानिक स्वरूपात १९५६ ते १९७४ पर्यंत सतत १९ वर्षे दीपावली अंक प्रसिद्ध करणे आणि संपूर्ण १८ वर्षे या अंकाची किंमत फक्त १ रुपया ठेवणे हे खरोखरच वैशिष्टय़पूर्ण म्हटले पाहिजे.
‘श्री’ या दीपावली अंकाचे १८ वर्षांतील अंक पाहिले असता दर वर्षीच्या अंकाच्या सुरुवातीला संपादक शरदचंद्र बर्वे यांनी व्यक्त केलेल्या मनोगतात त्या त्या वेळच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य केलेले दिसते.
या अंकाच्या प्रकाशनाची १२ वर्षे झाल्यानंतर व्यक्त केलेल्या मनोगतात संपादक शरूमामा बर्वे म्हणतात, ‘‘दिवाळी अंकांच्या उपक्रमाला एक तप पूर्ण झाले. या तपाचे फळ काय? तर आमचे मानसिक समाधान. कारण आमचा हा एकखांबी, एकतर्फी प्रयत्न आहे, कित्येक स्थानिक लेखक, लेखिकांच्या साहित्याला उत्तेजन देण्याचे कार्य आम्ही यशस्वीपणे करीत आलो.’’ या त्यांच्या मनोगतांमधूनच पदरमोड करून कोणत्याही व्यावहारिक हिशेबाशिवाय त्यांनी चिकाटीने तब्बल १८ वर्षे ‘श्री’ विशेषांकाचे प्रकाशन केलेले दिसते.
या सर्व अंकांमध्ये वि. आ. बुवा, अंबादास अग्निहोत्री, बंडू सोमठाणकर, बाळ फणसे, त्र्यं. र. दाणेकर, बा. ना. उपासनी, दीपक बर्वे, वा. शि. आपटे, स्वत: शरदचंद्र बर्वे या व इतर अनेकांनी लेखन केल्याचे दिसते. कै. ना. गो. ऊर्फ नानासाहेब चापेकर, गं. ना. ऊर्फ नानासाहेब मुजुमदार यांच्यासारख्या आदींनी या अंकात लिखाण केले आहे. अशा आगळ्यावेगळ्या दिवाळी अंकाचे जनक कै. शरदचंद्र लक्ष्मण ऊर्फ शरूमामा बर्वे यांची जन्मशताब्दी उद्या, ५ डिसेंबर रोजी आहे.
भरपूर वाचन वैगेरे गोष्टी आपल्याकडे निवृत्तीनंतरच करायच्या असा एक ग्रह आहे. शरूमामा बर्वे यांनी त्याला छेद दिला. आजच्या बऱ्याच अंकांचा मूळ उद्देश अर्थार्जन असा असतो. शरूमामांनी मात्र, तसा हेतू कधीच ठेवला नाही. त्यामुळेच त्यांचा दिवाळी अंक वाचकांना जवळचा वाटला. अशा या साहित्यप्रेमी संपादकाला सलाम.

अ‍ॅड. सुरेश पटवर्धन