डोंबिवली गावात पूर्वी ग्रामपंचायत, नंतर नगर परिषदेचा कारभार होता. आगरी समाजाचे प्राबल्य या गावात होते. पुढे नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबईत दाखल झालेल्यांना राहण्यासाठी डोंबिवली हे शहर परवडण्यासारखे असल्याने तेथे शहरी वस्ती वाढू लागली. गेल्या पाच दशकात डोंबिवली शहर जितके बदलत गेले, तितक्याच प्रमाणात येथील अनेक वसतिस्थानेही बदलत गेली. डोंबिवलीच्या टिळक पथावरील अलंकार सोसायटी या स्थित्यंतराचे अचूक उदाहरण आहे.
अलंकार सोसायटी, ताई पिंगळे चौक, डोंबिवली पूर्व

ग्रामपंचायतीपासून महापालिकेपर्यंतचा डोंबिवलीचा प्रवास अनेकांनी पाहिला आहे. या प्रवासादरम्यान डोंबिवलीचे गावापासून शहरापर्यंत रूपांतर झाले. या रूपांतरामुळे शहरात अनेक गोष्टी बदलल्या, मात्र या बदलातही अलंकार सोसायटीने आपले वेगळे वैशिष्टय़ कसोशीने जपले आहे. येत्या दोन वर्षांत सुवर्ण महोत्सवी वर्षांत पदार्पण करणारी पूर्व विभागातील रेल्वे स्थानक परिसरातील अलंकार सोसायटी डोंबिवली शहराच्या जडणघडणीची साक्षीदार आहे. रस्त्यावरील वर्दळीतून सोसायाटीत प्रवेश केल्या केल्या आपण कोणत्या तरी शांत ठिकाणी, निसर्गाच्या सान्निध्यात आल्याचे जाणवते. आत प्रवेश करताच दिसणारे शंकराचे मंदिर पाहून मन प्रसन्न होते. घनदाट वृक्षराजीमुळे या सोसायटीला थंडगार सावलीचे वरदान लाभले आहे. सोसायटीतील कुटुंबे एकमेकांशी शेजारधर्माने जोडली गेली आहेत. कोणत्याही प्रश्नावर, समस्येवर एकीच्या बळाने उत्तर शोधले जाते.
डोंबिवली रेल्वे स्थानकापासून पूर्वेला हाकेच्या अंतरावर असलेल्या या सोसायटीत पाच इमारती आहेत. कायद्यानुसार नोंदणीकृत झालेली अलंकार ही डोंबिवलीतील दुसरी सोसायटी. १९६७ मध्ये ही सोसायटी नोंदणीकृत झाली. सोसायटीतील सर्व इमारती तीन मजली असून १०८ सदनिका व दहा व्यावसायिक गाळे असे एकूण ११८ सभासद आहेत. याव्यतिरिक्त भाडेतत्त्वावर एक कारखाना व एक निवासी गाळा आहे.
डोंबिवली गावात पूर्वी ग्रामपंचायत, नंतर नगर परिषदेचा कारभार होता. आगरी समाजाचे प्राबल्य या गावात होते. पुढे नोकरी-व्यवसायानिमित्त राज्याच्या विविध भागांतील लोक डोंबिवलीत राहण्यासाठी आले. गावाकडून आलेली ही मंडळी चाळी खोल्यांचा आसरा घेऊन वास्तव्य करीत होती. अलंकार सोसायटीतील रहिवाशांचेही काहीसे असेच आहे. १९६४-६६ दरम्यान येथे एक चाळ होती. त्यात दहा ते बारा भाडेकरूराहत होते. याच मंडळींपैकी काहींनी एकत्र येऊन १९६६-६७ मध्ये येथे सोसायटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. केवळ राहण्यासाठी चांगले घर असावे या उद्देशाने या इमारतींची उभारणी करण्यात आली. सोसायटीच्या आवारात दोन इमारतींच्या मध्ये पुरेशी मोकळी जागा, खेळाचे मैदान आहे. नोकरी-व्यवसायानिमित्त आपापले प्रांत सोडून डोंबिवलीत आलेल्या गावकऱ्यांनी अलंकार सोसायटीत त्या काळी १६ ते १७ लाखाला वन रूम किचन, तर २० ते ३० लाखाला टु रूम किचन खरेदी केले. आता याच घरांची किंमत ६० ते ७० लाखांपर्यंत गेली आहे. भविष्यात या ठिकाणी टोलेजंग टॉवर्स उभे राहिले तर येथील घरांची किंमत कोटींच्या घरात जाईल. सर्व भाषिक मध्यमवर्गीय रहिवासी येथे गुण्यागोविंदाने राहतात. वर्षांला साधारण दीड लाख रुपये कर पालिकेला भरला जातो. २०११ मध्ये सोसायटीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. त्यातील शिफारशींनुसार इमारतीच्या आतील दुरुस्तीचे काम झाले असून बाह्य दुरुस्तीचे काम अद्याप बाकी आहे.
पाच दशकांपूर्वी डोंबिवली स्थानक परिसराचे दृश्य वेगळे होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवाई होती. आजूबाजूला बैठी घरे होती. त्यामुळे गावासारखे वातावरण होते. रेल्वे स्थानकाच्या जवळ असल्याने कोणतीही गैरसोय भेडसावत नव्हती. सूतिकागृहही बाजूलाच असल्याने महिलांनाही कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागला नाही. या ठिकाणी फार पूर्वी पुरुषोत्तम गोशाळा व प्राचीन शिवमंदिर आहे. कालांतराने गोशाळा जाऊन तिथे चाळी उभारण्यात आल्या. त्यानंतर बहुमजली इमारतींची सोसायटी झाली. शिवाचे मंदिर मात्र आजही येथे आहे. १९७७ पासून या हरेश्वर मंदिरात रहिवासी शिवरात्री उत्सव मोठय़ा भक्तिभावात साजरा करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी येथे लघुरुद्र केला जातो. या उत्सवासाठी वेगळी अशी देणगी रहिवाशांकडून घेतली जात नाही. तर वर्षभरात दानपेटीत जमा झालेल्या दानातून या उत्सवाचा खर्च भागविला जातो. शिवरात्रीचा उपवास सोडण्यासाठी दुसऱ्या दिवशी सोसायटीतील रहिवाशांना शिवप्रसाद म्हणजेच पारायण भोजन ठेवले जाते. हेच या सोसायटीचे वैशिष्टय़ व वेगळेपण असल्याचे सभासद सांगतात.
या वसाहतीचा कारभार नेटकेपणाने चालावा या उद्देशाने कार्यकारिणी स्थापन झाली. सोसायटीच्या आवारातील नेहमीची झाडलोट, पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, वीज, दर महिन्याचा देखभाल दुरुस्ती खर्च याबाबत घटनेत काटेकोर नियम केले आहेत. अनेक कार्यक्षम पदाधिकारी सोसायटीला लाभले असून आता श्रीकांत पावगी यांच्या अध्यक्षतेखाली सचिव विनायक फडणवीस व सहसचिव अजय आठवले यांची एकूण नऊ जणांची कार्यकारिणी या वसाहतीचा कारभार चालवीत आहे. महिलांनाही यात प्राधान्याने स्थान देण्यात आले आहे. सोसायटीच्या आवारातील प्रत्येक कोपऱ्याची नियमित झाडलोट होत असल्याने कुठेही कागदाचा तुकडा पडलेला नसतो. पार्किंगसाठी सोसायटीच्या आवारातच जागा उपलब्ध असल्याने वाहन पार्किंगचा काही प्रश्न आला नाही. खबरदारीचा उपाय म्हणून सोसायटीनेच खासगी सुरक्षारक्षकांची नेमणूक सोसायटीत केली आहे. सध्या सोसायटीत तीन सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. एक दिवसपाळीसाठी व दोन रात्रपाळीसाठी कार्यरत आहेत.

वाहनांच्या वर्दळीचा त्रास
सोसायटीच्या समोरच टिळकपथ हा सार्वजनिक रस्ता आहे. या रस्त्यावर वाहनांची सतत वर्दळ असल्याने या वाहनांच्या धुराचा आणि त्यांच्या कर्णकर्कश्श आवाजाचा रहिवाशांना कायमस्वरूपी त्रास आहे. येथील ताई पिंगळे चौकात एकही वाहतूक नियंत्रक पोलीस नसतो. येथे एक तरी वाहतूक पोलीस नेमण्यात यावा, अशी मागणी सोसायटीतील रहिवासी गेली कित्येक वर्षे करीत आहेत. २० वर्षांपूर्वी याच मागणीसाठी रहिवाशांनी आंदोलनही केले, परंतु त्याचा काहीएक परिणाम झाला नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

सांस्कृतिक उपक्रम
जानेवारी महिन्यात सोसायटीच्या प्रांगणात आनंद मेळा भरविण्यात येतो. वैयक्तिक खेळांच्या स्पर्धा भरविल्या जातात. दिवाळी तसेच गुढीपाडव्याला सोसायटीच्या आवारात दीपोत्सवाचा कार्यक्रम होतो. अलंकार महिला मंडळ यात हिरिरीने भाग घेते. कार्यक्रमाचे नियोजन तसेच परिसर स्वच्छतेबाबतही महिला मंडळ काटेकोरपणे लक्ष देते. सोसायटीत ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कट्टाही स्थापन करण्यात आला आहे. सोसायटीला अनेक साहित्यिक, कलावंतांचा वारसा लाभला आहे. त्यात प्रामुख्याने डॉ. उज्ज्वला करंडे, कुसुमताई पवार, प्रमोद पवार, प्राजक्ता केसकर, योगेश चिंचणकर, शुभदा पावगी यांची नावे प्रामुख्याने घेता येतील.