गणेशोत्सवानंतर आता दिवाळीच्या सुटय़ांमध्ये मुंबई महानगर प्रदेशातील राज्य परिवहन महामंडळाच्या आगारांमध्ये पुन्हा एकदा गर्दी दिसेल. प्रत्येक आगारामधील ही गर्दी आवरण्यासाठी डेपो कंट्रोलर किंवा वाहतूक नियंत्रक कार्यरत असतो. गर्दीच्या वेळी या आगार नियंत्रकाची अवस्था मुंडी कापलेल्या मुरारबाजीसारखी असते. तो आपल्या जिभेच्या पट्टय़ाने समोरच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नात असतो..

‘बस क्रमांक ७४२२.. मुंबई सेंट्रलवरून अलिबागला जाणारी बस क्रमांक ७४२२ फलाट क्रमांक दोनवर उभी आहे.. ‘ठाणे-रत्नागिरी’.. बस क्रमांक १८८१ ठाणे-रत्नागिरी ही गाडी फलाट क्रमांक चारवरून जाणार आहे..’ राज्यातल्या कोणत्याही एसटी आगारामध्ये शिरल्या शिरल्या कानांवर पडणारा हा आवाज! हा आवाज म्हणजे एसटी महामंडळाच्या आगाराचे व्यवच्छेदक लक्षण आहे. आगारात असलेल्या वाहतूक नियंत्रकाच्या कक्षात एखाद्या ध्वनिक्षेपकासमोर बसलेला वाहतूक नियंत्रक हा या आवाजामागचा चेहरा असतो.

आगाराच्या सर्व व्यवस्थापनाची जबाबदारी आगार व्यवस्थापकावर असते. पण आगारातील छोटय़ातल्या छोटय़ा घडामोडी वाहतूक नियंत्रकावर अवलंबून असतात. क्रिकेट संघाचा दाखला द्यायचा झाला, तर संघ व्यवस्थापक आणि संघाचा कर्णधार यांचा दाखला योग्य पडावा. संघ व्यवस्थापक संघाची बांधणी करण्यासाठीची रचना करत असतो. पण संघाचा कर्णधार व्यूहरचना करण्याबरोबरच ती प्रत्यक्षात अमलात आणणे, संपूर्ण संघाला सांभाळणे आदी सगळ्याच आघाडय़ांवर काम करत असतो. त्यामुळेच या दोहोंची भूमिका संघाला विजयापर्यंत नेण्यात मोलाची ठरते. नेमकी हीच बाब आगार व्यवस्थापक आणि वाहतूक नियंत्रक यांच्याबाबत म्हणता येईल. वाहतूक नियंत्रक हा क्रिकेटच्या संघनायकासारखा असतो.

मुंबई महानगर प्रदेशात पनवेल, ठाणे, रायगड येथील काही महत्त्वाचे आगार वगळल्यास इतर आगारांमध्ये रोजची धामधूम कमी असते. पण ‘गाव तिथे एसटी’ हे ब्रीदवाक्य जपत राज्याच्या छोटय़ा आणि दुर्गम गावापर्यंत सेवा देणाऱ्या एसटी महामंडळाच्या राज्यातील इतर आगारांमध्ये दर दिवशी प्रचंड गर्दी असते. तिथे वाहतूक नियंत्रकाची खरी कसोटी लागलेली असते. प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये मोठय़ा प्रमाणात निरक्षरांचा भरणा असतो. त्यांना त्यांच्या गाडीची योग्य माहिती देण्यापासून चालक-वाहक यांच्या डय़ुटय़ा योग्य प्रकारे पार पाडल्या जाताहेत का, हे तपासण्यापर्यंत सगळी कामे वाहतूक नियंत्रकालाच पार पाडावी लागतात.

मोठय़ा आगारांमध्ये एका पाळीला दोन-दोन वाहतूक नियंत्रक काम करत असतात. अशा दिवसभरात तीन पाळ्या असतात. म्हणजेच संपूर्ण आगाराची जबाबदारी या सहा लोकांवर असते. प्रत्येक आगाराचे प्रश्न, तेथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती, तेथून सुटणाऱ्या फेऱ्यांची संख्या या सगळ्या गोष्टी भिन्न असतात. त्यामुळे तेथील वाहतूक नियंत्रकांना त्या-त्या आगाराची माहिती असण्याबरोबरच प्रवाशांच्या सामाजिक पाश्र्वभूमीची माहिती असणेही आवश्यक होऊन बसते.

एसटीच्या वाहतूक नियंत्रकाला उद्घोषणा करण्यापासून ते चालक-वाहक यांच्याकडील त्यांच्या पाळीचा तक्ता भरून घेणे, आगारात प्रवाशांसाठी असलेल्या पायाभूत सुविधांच्या परिस्थितीवर लक्ष देणे, फेऱ्यांचा तक्ता तयार ठेवणे, एखादी गाडी बिघडल्यास त्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देणे, प्रवाशांचे सामान चोरीला गेल्यास त्यांची तक्रार घेऊन त्यांना मदत करणे, आगारातून बाहेर पडणाऱ्या आणि आगारात येणाऱ्या गाडय़ांच्या वेळांची नोंदणी करून त्यांची माहिती ठेवणे, एखाद्या वेळी एखाद्या ठरावीक ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी जास्त असल्यास जादा बस सोडणे आदी कामे पार पाडावी लागतात. वाहतूक नियंत्रक हा थेट प्रवाशांशी संवाद साधणारा घटक असल्याने तो एसटीचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असतो, असे म्हटल्यास वावगे ठरू नये!

वरवर पाहता वाहतूक नियंत्रकाचे काम सोपे वाटते. पण प्रवाशांच्या शंकांचे निरसन करणे, हे काम वाहतूक नियंत्रकासाठी सर्वात जास्त अवघड असते. त्या नियंत्रकाच्या कक्षाबाहेर घोळका करून प्रवासी उभे असतात. त्या आगारातून दिवसभरात राज्यातील ५० आगारांमध्ये बसगाडय़ा जात असतील, तर प्रत्येक बसगाडीची चौकशी करण्यासाठी लोक येत असतात. अनेकदा एकच व्यक्ती दोन विरुद्ध दिशांना जाणाऱ्या गाडय़ांची चौकशी करते. त्या व्यक्तीला केवळ गाडय़ांची वेळच नाही, तर ती गाडी पुढील ठिकाणी पोहोचल्यानंतर तेथून सुटणाऱ्या गाडीची वेळही जाणून घ्यायची असते. काहींना तिकीट किती रुपये होईल, यात स्वारस्य असते. हे सगळे हल्ले वाहतूक नियंत्रकाला थंड डोक्याने परतवायचे असतात. कधी कधी ‘तुम्हाला हवी ती बस समोरच्या फलाटावर लागलेली आहे. ती पाच मिनिटांमध्ये सुटणार आहे’, इतके स्पष्ट सांगूनही प्रवासी दुसरीकडे जातो आणि दहा मिनिटांनी पुन्हा त्याच बसची चौकशी करण्यासाठी वाहतूक नियंत्रकाकडे येतो. अशा वेळी संयम बाळगणे कठीण होऊन बसते. प्रवाशांशी खटके उडतात, ते अशाच काही मुद्दय़ांवरून! दर दिवशी हजारो प्रवाशांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन विटलेल्या वाहतूक नियंत्रकाचा स्वर नैसर्गिकरीत्याच तुसडा होतो.

काही वाहतूक नियंत्रकांशी बोलले असता या तुसडय़ा स्वराचा त्यांनाही तिटकारा असल्याचे ते सांगतात. अनेकदा प्रवाशांशी खूप प्रेमळ आवाजात किंवा अगदी नेहमीच्या स्वरात बोलण्याचा प्रयत्न होतो. पण हा आवाज फार काळ टिकत नाही, असा अनुभव ते मांडतात. वाहतूक नियंत्रकांसाठी असलेला आगारातील कक्ष हा प्रवाशांना बसण्यासाठी उपलब्ध केलेल्या जागेच्या मध्यभागी असतो. अनेक आगारांमध्ये या कक्षात केवळ दोन खुच्र्या आणि समोर एक मोठे टेबल एवढाच सरंजाम असतो. आगाराच्या छताला लागलेला पंखा कक्षापर्यंत पोहोचत नाही. अशा वेळी उकाडय़ात बसून काम करणे, हे आव्हान असते. त्याशिवाय दर दिवशी शेकडो गाडय़ांची उद्घोषणा करून घसा सुकतो. आठ तासांच्या पाळीमध्ये गर्दीच्या वेळी तर अर्धा अर्धा तास सलग उद्घोषणा कराव्या लागतात. कधी एखाद्या गाडीत बिघाड झाला असेल, तर ती गाडी तपासण्यासाठी कामगारांबरोबर आगारातच जावे लागते. अशा वेळी दोनपैकी एकाच वाहतूक नियंत्रकाला वाहतूक नियंत्रक कक्षातली आघाडी सांभाळावी लागते.

आता एसटी महामंडळाने अनेक आगारांमध्ये संगणकीय उद्घोषणा अमलात आणल्या आहेत. त्यामुळे या वाहतूक नियंत्रकांवरील मोठा भार कमी झाला आहे. तरीही २५० पैकी काहीच आगारांमध्ये ही तरतूद झाल्याने अजूनही बहुतांश आगारांमध्ये वाहतूक नियंत्रकांची ‘बस क्रमांक ३९५६..’ ही उद्घोषणा ऐकण्यासाठी प्रवासी कान देऊन तयार असतात. एखाद्या प्रचंड गर्दीच्या आगारात वाहतूक नियंत्रक अशी घोषणा करतो, जमलेली गर्दी त्या गाडीकडे धावत जाते, गाडी भरते आणि मागस्थ होते.. वाहतूक नियंत्रक नि:श्वास सोडतो, पण काही क्षणच.. तोपर्यंत त्याच्या कक्षापुढे ‘दादा, पुसद गाडी कवा यायची?’ हा प्रश्न घेऊन एखादा प्रवासी आलेला असतो..

– रोहन टिल्लू

tohan.tillu@expressindia.com

Twitter @rohantillu