X

निमित्त : समाजसेवेचे अविरत व्रत

सामाजिक बांधिलकीचा वसा घेऊन अनेक सामाजिक संस्था वसई-विरार शहरात कार्यरत आहेत.

छत्रपती समाजसेवा मंडळ

ज्या ठिकाणी शासन पोहोचू शकत नाही, त्या भागातील वंचित समाजाला मूलभूत सोयीसुविधा पुरवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नायगावच्या जूचंद्र येथील छत्रपती समाज सेवा मंडळ ही संस्था कार्यरत आहे. गेल्या ३४ वर्षांपासून संस्थेचा हा प्रवास सुरू आहे. दरवर्षी ३५ ते ४० उपक्रम राबवण्याचा संस्थेचा प्रयत्न असतो. त्यांच्या या सेवेमुळे संस्थेला अनेक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

सामाजिक बांधिलकीचा वसा घेऊन अनेक सामाजिक संस्था वसई-विरार शहरात कार्यरत आहेत. त्यातीलच एक आहे नायगावच्या जूचंद्र येथील छत्रपती समाज सेवा मंडळ. आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या भावनेतून स्थापन झालेली ही संस्था गेली ३४ वर्षे अविरत विविध सामाजिक क्षेत्रांत काम करत आहे. आपल्या कार्याची व्याप्ती केवळ वसई-विरारपुरती मर्यादित न ठेवता पालघर जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागापर्यंत संस्थेचे कार्य सुरू आहे. दरवर्षी ३५ ते ४० उपक्रम या संस्थेमार्फत राबवले जात आहेत.

नायगावच्या जूचंद्र गावात सामाजिक कार्य करताना ते अधिक व्यापक स्वरूपात करता यावे यासाठी गावातील पुरुषोत्तम पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १ जानेवारी १९८४ मध्ये संस्थेची स्थापना केली. समाजात असलेल्या गोरगरिबांनी समाजाच्या मूळ प्रवाहात यावे या उद्देश होता. सुरुवातीला वर्षभरात मंडळाने वसई परिसरात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम राबवले. त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून आपले कार्यक्षेत्र ग्रामीण भागापर्यंत नेले. वाडा, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, तलासरी, पालघर, डहाणू, शहापूर, भिवंडी इत्यादी तालुक्यांतील दुर्गम भागातील आदिवासी भागात काम करण्यास सुरुवात केली.

दरवर्षी मंडळाचे ३५ ते ४० उपक्रम होत असतात. ज्या ठिकाणी शासन पोहोचू शकले नाही त्या ठिकाणी हे मंडळ पोहोचले. त्यामध्ये पालघर जिल्ह्य़ातील दुर्गम भागात जाऊन विविध उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. गरीब आदिवासी जनतेसाठी धान्य वाटप, विद्यार्थ्यांना कपडे वाटप, वह्य़ा-पुस्तके वाटप, आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना अन्नदान, घोंगडी, चादरी वाटप यांचा समावेश होता. लग्नासाठी होणारा खर्च लक्षात घेऊन सामुदायिक विवाह सोहळे आयोजित केले. सामुदायिक विवाहाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांची मोफत लग्न लावून दिली जात आहेत आतापर्यंत ११०० सामुदायिक विवाह संपन्न झाले आहेत. सातत्याने रक्तदान शिबिरे, श्रमदान शिबिरे आयोजित होत आहेत. शैक्षणिक क्षेत्रातही संस्थेचे भरीव कार्य आहे. विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व्याख्यानमाला, पदवीधर शालान्त परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार हे शैक्षणिक उपक्रम राबवले जात आहेत.

मंडळाच्या प्रत्येक उपक्रमात दरवर्षी वाढ होत असते. जूचंद्र गाव हे कलावंतांचे गाव म्हणून ओळखले जाते. गावातील रांगोळ्या जगप्रसिद्ध आहेत. त्याचे श्रेय संस्थेने दिलेल्या प्रोत्साहनाला आहे. गावातील तरुणांमधील कलागुणांना वाव मिळावा यासाठी १९८५ साली मखर सजावट स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा भरवण्यात आल्या. त्यामुळे आज जूचंद्र गावात अनेक कलावंत तयार झाले आहेत. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांचा, स्वातंत्र्यसैनिकांचा, पत्रकार तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सर्वाचा सत्कार केला जातो. समाजातील मातबरांना पुरस्कार मिळू शकतील परंतु समाजातील तळागाळातील व समाजाच्या उपयोगी पडणाऱ्या व्यक्तींचे कौतुक कधी होणार या भावनेने २००१ सालापासून प्रवीण पाटील पुरस्कार देण्यात येतो. प्रवीण पाटील पुरस्काराच्या माध्यमातून दरवर्षी सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य सेवेचे कार्य करणाऱ्या तळागाळातील व्यक्तींना प्रोत्साहन दिले जाऊ  लागले आहे, तसेच या मंडळाच्या कार्यकर्त्यांची संख्या सव्वाशेच्या घरात असून सर्वाधिक युवा वर्ग या मंडळामध्ये कार्यरत आहे.

मंडळाच्या कार्याचा गौरव म्हणून या मंडळाला आतापर्यंत समाजसेवा पुरस्कार, महाराष्ट्र रत्नगौरव पुरस्कार, आदर्श संस्था पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार, महाराष्ट्र सन्मान पुरस्कार असे विविध पुरस्कार मिळाले आहेत. भविष्यात संस्थेची अनेक ध्येय आहेत. अनाथ बालकांसाठी आश्रमशाळा काढणे, ग्रामीण भागातील तरुणांना रोजगारनिर्मिती करणे आणि कुपोषित मुलांचे प्रश्न सोडवणे यांचा समावेश आहे. कितीही अडचणी आल्या तरी त्यावर मात करून आपले ध्येय पूर्ण करणार असल्याचे मंडळांनी सांगितले. हीच तीव्र इच्छाशक्ती संस्थेच्या यशाचे कारण आहे.