घराबाहेर जाऊन खाण्याचे लज्जतदार पदार्थ म्हणजे वडा, मिसळ, भजी आणि उडिपी हॉटेलातले पदार्थ. आपल्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी अनेक जण सर्वसाधारणपणे याच पदार्थावर दिवसाआड ताव मारत असतात. मात्र, या बदलत्या जगात या पदार्थाची जागा हळूहळू का होईना पाश्चात्त्य देशातून आलेले पदार्थही घेत आहेत. याला बदलापूरही अपवाद ठरले नसून पारंपरिक खाद्य संस्कृतीपेक्षाही निराळे खाद्यपदार्थ शहरात रुजू लागले आहेत. असेच वेगळ्या प्रकारचे फक्त चॉकलेटचे बहुविध खाद्यप्रकार तयार करणारे ‘कॅड एम, कॅड बी’ बदलापुरात सुरू झाले आहे. ऐन तरुणाईत बँकेची नोकरी सोडून फक्त आपल्या राहत्या बदलापूरला वेगळी चव देण्यासाठी मंगेश देशपांडे या २२ वर्षांच्या तरुणाने या कॅड एम, कॅड बी ची निर्मिती केली असून, अल्पावधीतच ते शहरातल्या तरुणाईसाठी चॉकलेट डेस्टिनेशन ठरू लागले आहे.

तसा शहराला हा नवा प्रकार असला तरी, वेगळी चव देण्याची जिद्द बाळगून असलेल्या मंगेशच्या प्रयत्नांना आता बदलापूरकरांनी चांगलीच दाद दिली आहे. मुळात येथील पदार्थ हे चॉकलेटपासून तयार होतात. याचे नाव कॅड एम आणि कॅड बी असे का, असा प्रश्न अनेकांना पडतो. कॅड एम आणि कॅड बी हे येथील चविष्ट पदार्थ असून कॅड एममध्ये चवीने माइल्ड चॉकलेट असते, तर कॅड बीमध्ये चवीने बिटर चॉकलेट असते. म्हणून त्याचे नाव कॅड एम, कॅड बी पडले आहे. येथील बहुतेक सर्वच पदार्थ हे लिक्विड चॉकेलट स्वरूपात ग्लासमध्ये मिळतात. यात कॅड व्हाईट, कॅड मिंट, कॅड मँगो, कॅड स्निकर्स, कॅड कोकोनट, कॅड आल्मण्ड, कॅड इक्लेअर, कॅड वॉलनट, कॅड ओरिओ, कॅड फरेरो इ. प्रकार येथे असून ग्लासभरून असे चॉकलेट पिण्यासाठी अनेक जण येथे गर्दी करतात. यातील कॅड बीला खवय्यांची विशेष पसंती असून त्यात घट्ट मलई, चॉकलेट पेस्ट आणि चॉकलेट क्रश आदींचा समावेश असतो. चॉकलेट क्रश म्हणजे चॉकलेटचे बारीक तुकडे हे प्रत्येक प्रकारात मिळतात. थंडगार चॉकलेट तोंडात गेल्यावर दाताखाली येणारे चॉकलेट क्रश चावण्याची मजा काही वेगळीच असते. तसेच कोल्ड कॉफीलाही प्रचंड मागणी असून घट्ट दूध, कॉफी व चॉकलेट याने अधिक घट्ट झालेली ही कोल्ड कॉफी  चमच्याने खावी लागते. यातील नावीन्यपूर्ण प्रकार म्हणजे चॉकलेट स्निकर्स. यात बाजारात मिळणारे स्निकर्स चॉकलेट, चॉकलेट पेस्ट व चॉकलेट क्रश आदींचे मिश्रण एकत्र करत ग्लासमध्ये देण्यात येते. येथील चवीला सगळ्यात तुफान प्रकार म्हणजे चॉकलेट शॉट्स. या प्रकाराचे नाव ऐकून वेगळे वाटत असले तरी साठ मिलीच्या छोटय़ा ग्लासमध्ये काळे घट्ट डार्क चॉकलेट व चॉकलेट क्रश टाकून खाण्यास देतात. चॉकलेटची मूळ काहीशी कडवट-गोड चव यातून खवय्यांना मिळते. तर मॅजिक शॉट्समध्ये तीन वेगळ्या प्रकारची चॉकलेट देण्यात येतात. चॉकलेटच्या बरोबरीनेच येथे ३५ प्रकारचे शेक, ३ प्रकारच्या कॉफी, २ प्रकारचे चॉकलेट शॉट्स, ५ प्रकारचे आईसक्रीम व मँगो मस्तानी, ८ प्रकारचे स्नॅक्सही खवय्यांना आनंद देतात. या स्नॅक्समध्ये सँडवीच व पोटॅटो वेजेस आता लोकप्रिय होत आहेत.

खाऊखुशाल

कॅड एम, कॅड बी

शॉप नं. ३, न्यू सृष्टी अपार्टमेंट, एचडीएफसी बँकेसमोर, कात्रप रोड, बदलापूर (पू.)

वेळ- सकाळी ९.३० ते ११.३० (दररोज चालू)

-संकेत सबनीस