05 December 2020

News Flash

शहरबात : ग्रामीण ठाण्याचे आरोग्य सक्षमीकरण कधी?

मुंबईत उपचारासाठी घेऊन जाताना अनेक रुग्ण दगावल्याचेही प्रकार समोर आले आहेत.

आशीष धनगर

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एप्रिल महिन्यापासून करोनाचा मोठय़ा प्रमाणात शिरकाव झाला. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेच्या मर्यादा पुन्हा आधोरेखित झाल्या. वाढता संसर्ग लक्षात घेत जिल्हा प्रशासनाने प्राप्त झालेल्या आपत्ती व्यवस्थापन निधीचा वापर करून तात्काळ ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय आणि भिवंडीतील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयाचा कायापालट केला. त्यामुळे ग्रामीण भागातील करोना रुग्णांना तात्पुरता आधार मिळाला. असे असले तरी वेगाने वाढणाऱ्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील उर्वरित आरोग्य व्यवस्था मात्र रिक्त पदे, सुसज्ज रुग्णालये आणि अद्ययावत आरोग्य सुविधांच्या अभावामुळे ‘सलाइन’वर आहे. करोनाच्या निमित्ताने समोर आलेल्या ग्रामीण भागाच्या अतिशय मर्यादित आरोग्य व्यवस्थेला सक्षम करण्याची हीच खरी वेळ आहे.

कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर या पाच तालुक्यांचा जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये समावेश होतो. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी, मुंबई ठाण्यासारखी मोठी शहरे गाठण्यासाठी उपलब्ध असलेली जलद वाहतूक व्यवस्था आणि उपनगरांच्या तुलनेत कमी असलेल्या घरांच्या किमती यांमुळे ग्रामीण भागाला लागूनच असलेल्या शहरी वस्त्यांचे गेल्या काही वर्षांपासून झपाटय़ाने नागरीकरण होऊ लागले आहे. ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागातील ४३० ग्रामपंचायतींपैकी शहराला लागून असलेल्या ग्रामपंचायतींचे अर्धनागरी क्षेत्रांमध्ये रूपांतर होत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे ग्रामीण भागाची लोकसंख्या १४ लाखांहून अधिक झाली आहे. या ग्रामीण भागासाठी एक ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय, भिवंडी आणि उल्हासनगर येथे दोन उपजिल्हा रुग्णालये, सहा ग्रामीण रुग्णालये, ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि १८७ उपकेंद्रे अशी आरोग्य व्यवस्था सध्या उपलब्ध आहे. मात्र या सर्वच ठिकाणी मोठय़ा प्रमाणात असुविधा असल्याचे प्रकार वेळोवेळी निदर्शनास आले आहेत. या सर्व आरोग्य व्यवस्थेतील जिल्हा सामान्य रुग्णालय, भिवंडी आणि उल्हासनगर येथे दोन उपजिल्हा रुग्णालयांमध्ये कित्येक वर्षांपासून अद्ययावत सुविधांचा अभाव असल्यामुळे प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांना अनेकदा मुंबईतील सरकारी रुग्णालयात दाखल करण्याची वेळ ओढवते. मुंबईत उपचारासाठी घेऊन जाताना अनेक रुग्ण दगावल्याचेही प्रकार समोर आले आहेत.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात एप्रिलमध्ये करोनाचा शिरकाव झाल्याचे समोर आले. ग्रामीण भागात वास्तव्यास असणारे आणि मुंबई ठाण्यातील अत्यावश्यक सेवेत कामाला असणाऱ्या नागरिकांमुळे या भागात करोनाचा संसर्ग वाढत असल्याचे आढळले. करोनाचा शिरकाव वाढू लागल्यावर जिल्ह्यातील मर्यादित आरोग्य व्यवस्थेचे वास्तव पुन्हा पुढे आले. ग्रामीण भागातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडून आलेला आपत्ती व्यवस्थापन निधी वापरला आणि जिल्हा सामान्य रुग्णालय, भिवंडीतील इंदिरा गांधी रुग्णालयाचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला. येथे केंद्रीभूत प्राणवायू सुविधेसह कृत्रिम श्वसन यंत्रणा उभारली. बदलापूर, शहापूर आणि मुरबाडमध्ये काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचे विलगीकरण कक्ष उभारण्यात आले. या गंभीर काळात प्रशासनाने तात्काळ पावले उचलल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळू लागले. ग्रामीण भागात आतापर्यंत १६ हजार ३९२ नागरिकांना करोनाची लागण झाली असून ५०७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, वेळेवर उपचार मिळाल्याने यातील ८५ टक्के म्हणजे १४ हजार रुग्ण करोनामुक्त झाले. तर २ हजारांहून कमी रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.

प्रशासनाने आरोग्य व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी काही पावले उचलल्याने अनेकांचे प्राण वाचले असले तरी जिल्ह्यातील ४३० पैकी ३८६ ग्रामपंचायतींमध्ये करोना पसरला हेही वास्तव आहे. ग्रामीण भागासाठी रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे जरी पुरेशा प्रमाणात असली तरी त्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात असुविधा असल्याचेही दिसून आले आहे. ग्रामीण भागातील या आरोग्य व्यवस्थेत वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून ते सफाई कर्मचाऱ्यांपर्यंत सध्या ४० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त आहेत. त्यामुळे तीन कर्मचाऱ्यांचे काम एका कर्मचाऱ्याला करावे लागत असल्याचे काही वरिष्ठ अधिकारी खासगीत सांगतात. ग्रामीण भागासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय आणि दोन उपजिल्हा रुग्णालये सोडल्यास फारशी सक्षम अशी आरोग्य व्यवस्था उभी नाही. कर्करोगासारख्या दुर्धर आजारांच्या रुग्णांना मुंबई, ठाण्याच्या दिशेनेच हेलपाटे मारावे लागतात. या ठिकाणी ‘सीटी स्कॅन’ आणि कृत्रिम श्वसन यंत्रणेसारख्या सुविधाही अतिशय मर्यादित आहेत. साथीच्या आजारांच्या चाचण्या करण्यासाठी अत्यंत गरजेची असलेली अद्ययावत प्रयोगशाळा ग्रामीण भागात कुठेही नाही. करोनाच्या निमित्ताने का होईना, ग्रामीण भागाची आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याची हीच खरी वेळ आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 2:20 am

Web Title: article about empowerment of health sector in thane rural area zws 70
Next Stories
1 पोलिसांच्या शोधमोहिमेत ‘एका शब्दा’चा आधार
2 रात्र निवारा केंद्राच्या इमारतीची दुरवस्था
3 लोकप्रतिनिधींना करोना नियमांचा विसर
Just Now!
X