tvlogसध्या येऊरच्या जंगलात ‘कप अँड सॉसर’ म्हणजे ‘कपबशी’ असं गमतीशीर नाव असणारे झुडूप फुललं आहे. पुरुषभर उंची असणाऱ्या या झुडपाला लागलेल्या कपबशा पाहण्यासारख्या आहेत. या झुडपाच्या फांद्या सर्वागांनी पसरलेल्या असतात आणि त्यांच्या सर्वागात पांढरा चिक असतो. पान पुढे गोलाकार असून एक आड एक असतात. ती वरून हिरवीगार दिसत असली तरी पाठीमागच्या बाजूला त्यांना निळी झाक असते. पसरलेल्या हिरव्या गोलाकार पानांच्या देठाच्या वर आलेले फुलांचे नाजूक देठ आणि त्यावरती हिरवी बशी. या थोडय़ाशा खोलगट पण पसरट बशीच्या बरोबर मध्यभागी गोलाकार लालसर रंगाच्या डेमच्या आकाराचा कप असतो. एकेका फांदीवर ओळीने मांडलेल्या कपबशा फारच मजेशीर दिसतात.
खरं तर हिरवी बशी म्हणजे मादी फुलाचा संदल किंवा बाह्य पुष्पकोश असतो. त्याचे सहा भाग गोलाकार पाकळय़ांसारखे असून मधल्या खाचांमुळे वेगळे-वेगळे दिसतात. त्यालाच फूल समजले जाते. पण खरं फूल या संदलच्या आत असून हिरव्या रंगाचं असतं. त्यातून पिवळसर रंगाचा बाहेर आलेला स्त्रीकेसर पुढच्या बाजूला दुभंगलेला असतो. फांदीच्या वरच्या बाजूला अशी मादी फुलं असतात, तर नर फूल म्हणजे फांदीच्या खालच्या बाजूला एका धाग्याला उलटे लटकणारे पिवळय़ा रंगाचं आईस्क्रीमचा कोन. कोनाची निमुळती बाजू वर आणि पसरट बाजू खाली. वाऱ्यावरती हे कोन झाडाच्या कर्णफुलासारखे हेलकावे खातात. परागीभवन झाल्यावर या हिरव्या बशीमध्ये एक लालसर, वरून दबलेल्या कपासारख्या फळाची धारणा होते. एकंदरीत या झुडपाचा कारभार फार झटकन आटोपतो. गेल्या आठवडय़ात फुलं आली म्हणता म्हणता या आठवडय़ात फळंसुद्धा दिसायला लागली.
कप अँड सॉसरसारख्या अनेक हटके, स्वत:चं काहीतरी वेगळेपण जपणाऱ्या अनेक वनस्पती या जंगलात आहेत. त्यांत दैनंदिन जीवनात कामी येतील अशा आणि औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतीही असतीलच. पण आज त्यावर हवा तेवढा अभ्यास झालेला नाही. कदाचित आज ते आजार नसतील, पण भविष्यात त्यांची गरज पडू शकेल. आज या झाडांपासून किती पैसा मिळतो या निकषावर त्यांचे मूल्यमापन करणे घातक ठरणार आहे.
पण आपल्याकडे काय होते की एखाद्या गोष्टीला मागणी नसली की त्याचं उत्पादन आपण थांबवतो. मागणी असणे म्हणजे एखादी गोष्ट विकून पैसे मिळत असतील तर त्याच्या उत्पादनाला जोरात सुरुवात होते. ज्याला मागणी आहे त्याची लागवड होते. जंगलातील इतर झाडझाडोरा काढून, साफसफाई करून, तिथे पैसे मिळवून देणाऱ्या वनस्पती लावून वनशेती केली जाते. त्यासाठी निवडल्या गेलेल्या वनस्पतींमध्ये प्रामुख्याने साग, बांबू, चंदन यांची लागवड होते. सुरुवातीच्या काळात या नवीन पण लहान झाडांबरोबर जुन्या वृक्षवेली आपली लढाई चालू ठेवतात आणि जिवंत राहण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. पण सतत त्यांची होणारी काटछाट एका बाजूला आणि नवीन वनशेतीत लावल्या गेलेल्या पैसे मिळवून देणाऱ्या झाडांचे नको तितके लाड दुसऱ्या बाजूला. या परिस्थितीत या नाजूक वृक्षवेलींना हार मानावी लागते. हळूहळू त्या नष्ट होतात.
तेव्हा सद्यपरिस्थितीत पैसे मिळवून न देणारा जंगलातला हा ठेवा जपणं आणि त्याचा वारसा पुढच्या पिढीकडे सोपवणं हे जास्त महत्त्वाचं आहे.

येऊरच्या जंगलात अनेक रानफुले फुललेली आहेत. ती अल्पायुषी असल्याने फार काळ टिकणारी नसतात. त्यांना जाणून घेण्यासाठी वृक्षप्रेमी मेधा कारखानीस यांनी ‘नेचर-ट्रेल’चे आयोजन केले आहे. हा ट्रेल रविवारी १९ जुलै रोजी होत आहे. यात सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे.
संपर्क : ९८२०१०१८६९.

Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
traffic police action against goon nilesh ghaiwal
गुंड नीलेश घायवळला वाहतूक शाखेचा दणका, मोटारींना काळ्या रंगाच्या काचांचा वापर केल्याप्रकरणी दंड
In redevelopment of flat holders Redevelopment Senior
पुनर्विकासातील ज्येष्ठ!
Textile Mill Workers, Transit Camps, Hazardous Building, Issue Persists, shivadi, byculla, lalbaug, parel,
संक्रमण शिबिरांना कंटाळलेल्या गिरणी कामगारांची सुटका कधी ? चाळी मोडकळीस, पुनर्विकास रखडलेला