गेल्या तीन महिन्यांपासून दुरुस्तीच्या कारणामुळे मुंब्रा बाह्य़वळण मार्ग बंद असल्याने या मार्गावरील अवजड वाहतुकीचा भार नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि कल्याण शहरांवर आला आहे. साकेत खाडीपूल दुरुस्ती काम आणि नारळीपौर्णिमेमुळे बंद केलेला कळवा खाडीपूल यामुळेही वाहतुकीचा बोऱ्या वाजला होता. लवकरच मुंबई-नाशिक महामार्गावरील कोपरी पुलाचे आणि घोडबंदर मार्गावर मेट्रो मार्गाचे काम सुरू होणार आहे. वाहतूक पोलिसांनी पुढील कोंडीची आव्हाने लक्षात घेऊन ठोस नियोजन करावे.

उरण येथील जेएनपीटी बंदरातून गुजरात आणि मुंबईच्या दिशेने होणाऱ्या अवजड वाहतुकीसाठी मुंब्रा बाह्य़वळण मार्ग महत्त्वाचा मानला जातो. हा मार्ग टोलमुक्त असल्यामुळे अवजड वाहनचालकांना सोयीचा वाटतो. मुंब्रा शहरालगत असलेल्या डोंगर भागातून हा मार्ग जात असल्यामुळे त्या अवजड वाहतुकीचा शहरावर ताणही पडत नाही. हा मार्ग खारेगाव टोलनाका येथून मुंबई-नाशिक महामार्गाला येऊन मिळतो आणि पुढे माजिवाडा येथून घोडबंदर येथील मुंबई-अहमदाबाद महामार्गाला मिळतो. हे सर्वच महामार्ग ठाणे, भिवंडी आणि कल्याण शहरातील अंतर्गत रस्त्यांना जोडलेले आहेत. यापैकी एका मार्गावर वाहतूक कोलमडून पडली तर त्याचा परिणाम ठाण्यासह आसपासच्या शहरातील सर्वच रस्त्यांवर होतो. हे चित्र साकेत खाडीपूल दुरस्ती काम आणि दोन दिवसांपूर्वी नारळी पौर्णिमा उत्सवामुळे वाहतुकीसाठी बंद केलेला कळवा खाडीपूल यातून प्रकर्षांने पुढे आले. मुंब्रा बाह्य़वळण मार्ग बंद असल्यामुळे हे चित्र सातत्याने पाहायला मिळत असून या मार्गामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण आणि नवी मुंबई शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.

Traffic Congestion Worsens in bandra santacruz vakola
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ, वाहतुकीचा प्रश्न सोडविण्याची गरज
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास
national pension scheme marathi news
मार्ग सुबत्तेचा : राष्ट्रीय निवृत्ती योजना (एनपीएस): फायदे आणि तोटे
bogus police
‘त्या’ बोगस पोलिसाला बॅच कोणती ते सांगता आले नाही 

कल्याण शहरातील पत्रीपूलही धोकादायक ठरल्याने वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ठाणे शहरातून जाणारा मुंबई-नाशिक आणि घोडबंदर भागातून जाणारा मुंबई-अहमदाबाद या दोन्ही महामार्गावर खड्डे पडले आहेत. कापूरबावडी येथून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेची अक्षरश: चाळण झाली आहे. कोपरी पुलाच्या पुढेच खड्डे पडत असून भिवंडीतील रस्त्यावरही प्रचंड खड्डे आहेत. त्यामुळे या खड्डय़ांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे असून याकडे संबंधित यंत्रणांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

यंत्रणांमधील समन्वय गरजेचे

अवजड वाहतुकीसाठी मुंब्रा बाह्य़वळण मार्ग बंद करण्यापूर्वी वाहतूक बदलांची अधिसूचना काढण्यापासून सर्वत्र गोंधळाची परिस्थिती होती. त्यामुळे दुरुस्तीकाम एक महिना उशिराने सुरू झाले. त्यामुळे या कामाच्या बदलाबाबत वाहतूक पोलीस किती गंभीर होते, हे यातून स्पष्ट झाले. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी शहरात अवजड वाहतुकीमुळे कोंडी होऊन त्यात नोकरदार वर्गाची वाहने अडकून पडू नयेत यासाठी वाहतूक पोलिसांनी दुपारच्या वेळेत अवजड वाहतुकीला मुभा दिली होती. दुपारी १२ ते ४ अशी अवजड वाहतुकीला परवानगी आहे. मात्र, त्याचेही पालन होत नसल्यामुळे अवेळी अवजड वाहतूक सुरू असते. ठाणे, पालघर आणि नवी मुंबई पोलिसांमध्ये असलेल्या समन्वयाच्या अभावामुळे हे घडत आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत ही बाब उघड झाल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी सर्वच विभागांना समन्वय ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतरही हा प्रकार सुरूच आहे. या विभागांनी समन्वय ठेवून नियंत्रित पद्धतीने ठरलेल्या वेळेत शहरात वाहने सोडली तर नागरिकांना कोंडीतून नक्कीच दिलासा मिळू शकतो.

काय करता येईल?

  • मुंबई-नाशिक महामार्गावरील अरुंद कोपरी पुलाचे आणि घोडबंदर मार्गावर मेट्रो मार्गाचे काम सुरू होणार आहे. आधीच कोंडीच्या विळख्यात सापडलेल्या या दोन्ही मार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमडून पडण्याची भीती आहे. असे असतानाही वाहतूक पोलिसांचा बदलांचा आराखडा अद्यापही तयार झालेला नाही. कोंडी टाळण्यासाठी मुंब्रा बाह्य़वळण मार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतरच कोपरी आणि मेट्रो कामाला परवानगी देण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. हा मार्ग सुरू झाल्यानंतर ही वाहने खारेगावमार्गे घोडबंदर मार्गावर येणार आहेत. त्यामुळे कोपरी पुलाजवळील वाहतुकीचा ताण कमी होणार असला तरी घोडबंदरवरील ताण मात्र तसाच राहणार आहे. त्यामुळे ही वाहने भिवंडीतील ग्रामीण क्षेत्रातील मार्गावरून गुजरातच्या दिशेने वळविली तर काही भार हलका होईल. अन्यथा या मार्गावरचा प्रवास पश्चिम द्रुतगती मार्गासारखाच कोंडीग्रस्त होणार आहे.
  • हे नियोजन करताना मुंबई-नाशिक महामार्गावरील माणकोली, राजनोली या प्रमुख चौकांसह ग्रामीण भागातील रस्ते वाहतुकीवर जास्त भार पडणार नाही, याची काळजी घ्यावी. ठाणे ग्रामीण, ठाणे शहर वाहतूक पोलीस, पालघर पोलिसांनी समन्वय ठेवला तरच हे शक्य होऊ शकेल. अन्यथा ग्रामीण भागासह शहरातील वाहतुकीचे बारा वाजू शकतात. विशेष म्हणजे, हे बदल लागू करण्यात येणारे मार्ग सुस्थितीत आहते का? याची पाहणी करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर भिवंडीतील वेगवेगळ्या भागातील गोदामांच्या सुट्टीचे वेळापत्रक तयार करून त्याचीही चोखपणे अंमलबजावणी केली तर रस्ते वाहतूकीवरील बराचसा भार हलका होऊ शकतो.