03 March 2021

News Flash

वसाहतीचे ठाणे : शहराच्या तिठय़ावरील मध्यमवर्गीयांचा आशियाना

गेल्या दोन दशकांत मुख्य ठाणे शहरापासून दूर अनेक वसाहती उभ्या राहिल्या. इतर विभागाच्या तुलनेत अधिक ‘नियोजनबद्ध’ स्वरूपात या वसाहतींची पायाभरणी झाली.

| March 17, 2015 12:17 pm

लोढा पॅराडाइज- ठाणे
tnt05गेल्या दोन दशकांत मुख्य ठाणे शहरापासून दूर अनेक वसाहती उभ्या राहिल्या. इतर विभागाच्या तुलनेत अधिक ‘नियोजनबद्ध’ स्वरूपात या वसाहतींची पायाभरणी झाली. त्यापैकी एक वसाहत म्हणजे माजिवाडा भागातील ‘लोढा पॅरेडाइज’. मोकळ्या जागेचा पुरेपूर वापर करून लोकांच्या गरजेप्रमाणे टप्याटप्याने या भागात इमारती उभ्या राहत गेल्या. सध्या माजिवडा परिसरात लोढा वसाहतीच्या रूपाने मध्यमवर्गीयांचे एक शहरच विकसित झाले आहे.
मुंठाणे रेल्वे स्थानकापासून २० मिनिटांच्या अंतरावर शहराबाहेर जाणाऱ्या मुख्य रस्त्यांना खेटून माजिवडा विभागात लोढा पॅराडाइज उभी आहे. वसाहतीसमोरचा पूर्व दुर्तगती महामार्ग, एका बाजूला हाकेच्या अंतरावर असणारा घोडबंदरकडे जाणारा रस्ता आणि नाशिक-भिवंडी उत्तन (बायपास) रस्ता अशा दळणवळणाच्या तिहेरी सोयीच्या ठिकाणी ही वस्ती आहे. २००६ पासून मध्यमवर्गीयांचा हा आशियाना उभारण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत १६ टोलेजंग इमारती लोढा वसाहतीत तयार झाल्या आहेत. सात मजल्यांपासून ३० मजल्यापर्यंत उत्तुंग इमारती लोढा वसाहतीत आहेत. अ‍ॅटलास, ऑलंपिया, ज्युपिटर, फॉच्युना, अ‍ॅलेक्झांड्रा, व्हिक्टोरिया, फ्लोराडिना, व्हॅलेन्टिना, ओडीसी, अ‍ॅफ्रेडाइट, मॅक्झिम्स, ऑगस्टस, अपोलो, हक्युलर्स, वेस्टा, अ‍ॅथीन अशा तब्बल सोळा इमारती लोढा वसाहतीत आहेत. ग्रीक देवदेवतांची नावे या इमारतीस देण्यात आली आहेत. तीन ते चार इमारतींची एक समिती तयार करून या समितीतील प्रत्येकी एक सभासद ‘लोढा फेडरेशन’या समुच्चय समितीत आहे. समुच्चय समिती धोरणात्मक निर्णय घेते आणि वसाहतीतील सर्व सभासद त्याची अंमलबजावणी करतात. ६०० सदनिका असणाऱ्या लोढा वसाहतीची लोकसंख्या दोन हजारच्या आसपास असून त्यात महाराष्ट्रीयांप्रमाणेच दक्षिण भारतीयांची संख्या लक्षणीय आहे. वसाहतीत प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला गणपतीचे भव्य मंदिर आहे. वसाहतीतील रस्ते ठीक असून काही ठिकाणीच गतिरोधक दृष्टिक्षेपास पडतात. वसाहतीच्या अगदी अंतर्गत भागात ठाणे परिवहन आणि बेस्टची बससेवा असल्याने नागरिकांना त्याचा खूपच फायदा होतो. वसाहतीतून ठाणे स्थानक ते अगदी मुंबईतील ठिकठिकाणी वातानुकूलित बसगाडय़ा चालविल्या जातात. वसाहतीच्या आकारमानाच्या तुलनेत येथील सुरक्षारक्षकांचे प्रमाण अगदी नगण्य आहे. इतक्या मोठय़ा वसाहतीत पर्जन्य जलसंधारण योजना राबविण्यात आलेली नाही. मात्र सौरऊर्जेची उपकरणे कार्यान्वित असल्याचा दावा लोढावासीयांनी केला. वसाहतीच्या मध्यभागी लहान मुलांना खेळण्यासाठी सुसज्ज असे उद्यान आहे. वसाहतीत मोठे वृक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्या आधाराने खूप पक्षी येथे आहेत.
अ‍ॅम्पी थिएटरचे मैदान, तरणतलाव कोरडे
 अ‍ॅम्पी थिएटरची दुरवस्था झाली असून मुलांना खेळण्यासाठी मोकळे मैदान नसल्याने सध्या मुले त्याचा वापर मैदानी खेळासाठी करतात. वसाहतीतील व्यायामशाळा सुस्थितीत असून कारंजे योग्य काळजी न घेतल्याने आणि तरणतलाव पाण्याअभावी बंद आहेत. वसाहतीतच दहावी इयत्तेपर्यंतची इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेला क्रिकेटपटू आविष्कार साळवी लोढा वसाहतीचा रहिवासी असल्याचे लोढावासीय अभिमानाने सांगतात. सध्याच्या बाजारभावाप्रमाणे लोढा वसाहतीत सदनिकांची किंमत ७९ ते ९८ लाखांच्या घरात गेली आहे.
महिलावर्गाची ‘प्रेरणा’
लोढा वसाहतीतील महिलांनी मिळून नुकतीच ‘प्रेरणा महिला बहुद्देशीय सेवाभावी संस्था’ स्थापन केली आहे. या संस्थेअंर्तगत नुकताच महिला दिन साजरा करण्यात आला. सध्याच्या काळात अनेक वसाहतींची डोकेदुखी बनलेला कबुतरांच्या उपद्रवाच्या प्रश्नावर संस्थेच्या महिलांनी आवाज उठवला. वसाहतीच्या मोकळ्या जागेत कबुतरांना धान्य खायला घातल्याने, कबुतरांची संख्या वसाहतीत वारेमाप वाढली होती. त्यामुळे श्वसनाचे विकार होण्याचे प्रमाण वाढू लागले. कबुतरांना खायला घालणाऱ्या नागरिकांना विरोध करून त्यांना त्याचे दुष्परिणाम प्रेरणा संस्थेने समजावून सांगितले. त्यामुळे कबुतरांच्या उपद्रवाच्या प्रश्नावर कायमचा तोडगा निघाला. वसाहतीतील सदनिकाधारकांकडून कपडे जमवून अनाथ आश्रमातील मुलांना देण्याचा अभिनव कार्यक्रम संस्थेने पूर्णत्वास नेला असून सहा महिन्यांच्या अंतराने हा कार्यक्रम संस्था करणार आहे. असा निश्चय वसाहतीतील महिलांनी केला आहे.
तरुणाईचा अभिनव सहभाग
हल्ली बहुतेक वसाहतीत अनेक सण उत्सव साजरे केले जातात, पण त्यासाठी दारोदार फिरून वर्गणी मागण्याचे प्रकार काळानुरूप ‘फ्लॅट संस्कृतीमुळे’ बंद होत आहेत. लोढा वसाहतीतील तरुणाई मात्र याला अपवाद आहे.
सोसायटीतील तरुणांनी ‘ओम पॅराडाइज सार्वजनिक उत्सव मंडळ’ तयार केले असून गणपती उत्सवाअगोदर प्रत्येक सदनिकाधारकाकडे जाऊन कमीतकमी तीनशे रुपये वर्गणीची मागणी तरुण मंडळी करतात. त्यानुसार ६०० सदनिकाधारकांचे पैसे जमवून वर्षभर सणउत्सव जल्लोषात साजरे केले जातात. यामध्ये प्रजासत्ताकदिन, एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त महापूजा, स्वातंत्र्यदिन, गोकुळाष्टमी, पाच दिवसांचा गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आदी कार्यक्रम तसेच दिवाळीत तीन दिवसांचा भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम होतो. यात प्रत्येक वयोगटाचा विचार करून कार्यक्रमांची आखणी केली जाते. नाताळ सणात घोडागाडी आणि त्यातून येणारा नाताळबाबा (सांताक्लॉज) वसाहतीतील लहान मुलांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे, असे ओम पॅराडाइज सार्वजनिक उत्सव मंडळाचे मोहन हेगडे यांने सांगितले.
समस्यांचा ‘लोंढा’
* लोढा वसाहतीला चारही बाजूने भक्कम अशी संरक्षक भिंत नसल्याने वसाहतीत घरफोडय़ा होतात. वसाहतीच्या आवारात गाडय़ा उभ्या करण्यासाठी तुंटपुंजी जागा असल्याने वसाहतीतील बहुतेक गाडय़ा वसाहतीच्या मुख्य रस्त्यावर दाटीवाटीने उभ्या केल्या जातात. त्यामुळेच चारचाकी गाडय़ांच्या काचा फोडून त्यातील ऐवज चोरण्याच्या घटनेत गेल्या काही दिवसांत लक्षणीय वाढ झाली आहे.
* महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून मोटारसायकलवरून चोरटे पळून गेल्याच्या घटनाही वसाहतीतील मुख्य रस्त्यावर घडत असल्याचे महिलांनी सांगितले. या घटनांमुळे वसाहतीसाठी पोलीस चौकीची मागणी लोढावासीय करत आहेत. वसाहतीत मोकाट कुत्र्यांचा वावर रहिवाशांची डोकेदुखी बनला आहे.
* वसाहतीबाहेरील मुख्य रस्त्यावर ठाण्यातील एका प्रतिष्ठित शाळेच्या बसगाडय़ा उभ्या केल्या जातात. त्या बसगाडय़ांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा नाहक त्रास लोढावासीयांना सहन करावा लागत आहे.
* वसाहतीबाहेरील सेवा रस्त्याची (सव्‍‌र्हिस रोड) प्रचंड दुरवस्था झाली आहे. खड्डेमय असलेल्या या सेवा रस्त्यामुळे रिक्षाचालक लोढा वसाहतीत येण्यास नकार देतात.
* वसाहतीत दवाखाने नसल्याने रहिवाशांना वृंदावन सोसायटीसारख्या भागात उपचारासाठी जावे लागते. अथवा वसाहतीत राहणाऱ्या डॉक्टरांवर अवलंबून राहावे लागते.  
विनित जांगळे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2015 12:17 pm

Web Title: article about lodha paradise in thane
Next Stories
1 ठाणे शहरबात : खोटय़ा अस्मितेचा आजार
2 वाहतुकीचा रेड सिग्नल : ‘दिवा’भीतांचे ‘दिवा’स्वप्न
3 शाळेच्या बाकावरून : हौसला बुलंद है!
Just Now!
X