मनोबल सोसायटी, सावरकर नगर, ठाणे (प.)
ठाणे शहरातील निवासी संकुले आता शहराच्या पार डोंगराच्या पायथ्याशी येऊन ठेपली आहेत. असाच एक भाग म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर नगर. या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात म्हाडाच्या वसाहती आहेत. या वसाहतींपैकी बहुतेक बैठय़ा स्वरूपाच्या असल्या तरी काही बहुमजली इमारतीही आहेत. साधारणत: या सर्व इमारती चांगल्या अवस्थेत आहेत. अशाच वसाहतींपैकी एक म्हणजे मनोबल. इतरांपुढे आदर्श ठरावा, अशा मोजक्या वसाहतींपैकी ही एक आहे.

ठाणे स्थानकापासून साधारण सहा किलामीटर अंतरावर स्वातंत्र्यवीर सावरकर नगर येथे मनोबल निवासी वसाहत आहे. म्हाडाचा असलेला ११ गुंठेचा भूखंड ३० जणांच्या समूहाने २००५ मध्ये १९ लाख रुपयांना विकत घेतला. या ३० जणांच्या समूहातील सभासदांमध्ये मुंबई महापालिका रुग्णालयातील १९ डॉक्टरांचा समावेश आहे तर इतर सभासदांमध्ये महापालिकेचे अधिकारी आहेत. या तुलनेने कमी जागेत वास्तुविशारद प्रवीण जाधव यांनी एका अप्रतिम इमारतीची रचना कली आहे. ठाण्यात सध्या मोठय़ा प्रमाणात पार्किंग समस्या भेडसावते. मनोबल वसाहतीने या समस्येवर उपाय स्वउदाहरणाने दाखवून दिला आहे. या ११ गुंठे जागेत सदनिका आणि स्टील पार्किंगची आखणी इतकी नियोजनबद्ध केली आहे की सभासदांना तक्रार करायला जागाच उरली नाही.
सभासदांनी वास्तुविशारदाने सांगितल्याप्रमाणेच इमारत बांधल्याने सर्वाना समाधानकारक जागा मिळाल्या आहेत. आताच्या जमान्यात सुपरबिल्टपच्या नावाखाली ४० ते ४५ लोडिंगचे बांधकाम होत असल्याने आलेल्या रहिवाशांना कारपेटच्या दृष्टीने मुळातच राहण्यासाठी जागा कमी मिळते. ‘मनोबल’मध्ये मात्र तसे नाही. ‘मनोबल’मध्ये एकूण ३० सदनिका आहेत. वास्तुविशारदाच्या सल्ल्याने सभासदांनी स्वत: देखरेख ठेऊन बांधकाम व्यावसायिकाकडून इमारतीचे काम करून घेतले आहे. त्यामुळे सर्वाना सुमारे ८५० चौ.फुटाची ऐसपैस सदनिका मिळाली असून २० गाडय़ा उभ्या राहतील अशी स्टील पार्किंगची सोय झाली आहे. त्यामुळे सर्वच रहिवासी खूश आहेत. या इमारतीत ९० टक्के महाराष्ट्रीय आहेत. सरकारी कर्मचारी आणि डॉक्टर्स येथे असल्याने सरकारी वा आरोग्याच्या दृष्टीने कोणत्याही समस्या येथे उद्भवत नाहीत. दोन सुरक्षा रक्षक दिवसरात्र रहिवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात असतात. शेजारीच आई माता मंदिर आणि उद्यानही आहे.
एक मजला आणखी वाढवणार
या इमारतीला पाच मजल्यांची परवानगी मिळाली आहे. उद्वाहनाची जागाही निश्चित करण्यात आली आहे. मात्र त्यावेळी सभासद संख्या कमी असल्याने ही इमारत पुढील बाजूने तळ अधिक चार मजले तर मागील बाजूने तळ अधिक तीन मजल्यांचीच बांधण्यात आली. मात्र आता या इमारतीचा एक मजला वाढवून एकूण १२ सदनिका काढण्याचा त्यांनी निर्णय घेतला असून त्यासाठी उद्वाहनाची सोयही करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
वृक्ष संवर्धन
नियोजनबद्ध काम केले तर कमी जागेत खूप काही करता येते, याचा प्रत्यय या मनोबल निवासी संकुलात येतो. येथे स्टील पार्किंग तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी बैठक व्यवस्था आहे. इमारतीच्या आवारात मोठे वृक्ष तसेच विविध शोभिवंत झाडे आहेत.
सेवेसाठी डॉक्टर सदैव तत्पर
संकुलात डॉक्टर अधिक प्रमाणात असल्याने आरोग्याचा प्रश्न फारसा उद्भवत नाही. रात्री-अपरात्री अचानक कुणाची तब्येत ढासळली तर दूरध्वनी करताच डॉक्टर धावून येतात. अनेक वेळा असे प्रसंग आले आहेत. एकदा तर एका सभासदाची तब्येत बिघडल्यानंतर परिस्थिती गंभीर झाली होती. रुग्णालयात नेणे जोखमीचे काम होते. तेव्हा येथील डॉक्टरांनी या कुटुंबीयांना धीर देत या सभासदावर तातडीने प्राथमिक उपचार केले. या उपचारांमुळे त्या सभासदाला रुग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल करणे शक्य झाल्याचा प्रसंग सोसायटीचे सचिव बी.पी. हिवाळे यांनी सांगितला. कुणाला काही आजार असेल तर डॉक्टर प्रत्यक्ष त्याची तपासणी करतात किंवा दूरध्वनीवरून अमुक एक औषध घ्या म्हणून डॉक्टरी सल्ला देत असतात, असे हिवाळे यांनी सांगितले. हिवाळे यांची मुलेही डॉक्टर आहेत. संकुलात डॉक्टर असल्यामुळे संकुलाच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनाही त्यांचा आधार मिळाला आहे.
कुटुंब संकुल
सार्वजनिक सण तसेच वाढदिवस, लग्नासारखा व्यक्तिगत सोहळा सर्व सभासद मिळून साजरा करतात. एखादे कुटुंब अडचणीत असेल, तर त्याला तप्तरतेने मदतही केली जाते. एकूणच आम्ही मनोबलवासी एका मोठय़ा कुटुंबासारखे राहतो, असे सभासद शशिकांत जगताप यांनी सांगितले.
स्वच्छता अभियान
स्वच्छता ही जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहे. त्याची जाण संकुलातील रहिवाशांना येथे राहण्यापासूनच आहे. दरवर्षी येथे स्वच्छता अभियान राबविले जाते. संकुलातील सदस्य हातात झाडू घेऊन कचरा साफ करण्यास घेत असतात. इमारतीच्या भिंतीवरील धूळ झटकण्यापासून रंगरंगोटी करण्यार्प्यत ही कामे होतात. स्वच्छता टिकून राहावी, यासाठीही प्रयत्न केले जातात.
वाद नाही
दुरुस्तीपोटी मासिक रकम देण्यावरून अनेक वसाहतीत वाद निर्माण होत असतात. परंतु ‘मनोबल’मध्ये तसे काही होत नाही. मासिक खर्च कोणतीही तक्रार न करता सभासद देत असतात. जादा खर्च काढल्यास त्याबाबतही कोणीही विचारणा करीत नाही एवढा विश्वास सभासदांना व्यवस्थापन समितीवर आहे.
तरुणांचा गणेशोत्सव<br />वर्षभरातील सण-उत्सव साजरे केले जातात. पाच दिवसांचा गणेशोत्सव येथे साजरा केला जातो. हा उत्सव येथील तरुण मंडळीच करीत असतात. त्यात स्पर्धा, करमणुकीचे कार्यक्रम आदींची रेलचेल असते. उत्सवाचे एक वेगळे रूप येथे पाहावयास मिळते असे येथील सभासदांकडून ऐकण्यास मिळते.
वाहतूक व्यवस्था हाकेच्या अंतरावर आहे. तर शाळा-महाविद्यालये शेजारीच आहेत. बाजारपेठ म्हणून वर्तकनगर परिसराला ते प्राधान्य देतात. परिसर रात्री उशिरापर्यंत गजबजलेला असल्याने कोणताची अनुचित प्रकार येथे घडत नाही. वैद्यकीय सेवा म्हटले तर प्रत्येकाच्या शेजारीच एक
डॉक्टर राहात असल्यामुळे त्याची फार काही आवश्यकता भासत नाही. परंतु तसेच काही झाल्यास शेजारीच रुग्णालयेही सेवेस तत्पर असतात. एकंदरीत ‘मनोबल’चे सर्वकाही आलबेल आहे असेच म्हणावे
लागेल.

संकुलातील वैशिष्टय़े
’ कोणताही वाद नाही.
’ मोठय़ा प्रमाणात निवासी डॉक्टर.
’ दरवर्षी स्वच्छता मोहीम.
’ कुटुंबवत्सल रहिवासी.
’ अनुचित प्रकार नाही.

भविष्यातील उपक्रम
’ इमारतीचा एक  मजला वाढवणार.
’ कचऱ्यापासून खत निर्मिती.
’ पावसाचे पाणी संचय.
’ सौर ऊर्जेचा उद्यानातील दिव्यांसाठी वापर.
’ अधिक सुरक्षेसाठी सी. सी. टीव्हीचा वापर.