नक्षत्र उद्यान

पुलाजवळील खाडीकिनारी असलेले नक्षत्र उद्यान म्हणजे कळव्यातील नागरिकांना मिळालेले जणू वरदानच आहे. व्यायाम, योगसाधना तसेच खेळण्यासाठी इथे नियमितपणे नागरिकांचा राबता असतो. येथील हिरवाई मन प्रसन्न करते आणि दिवसाची सुरुवात खऱ्या अर्थाने मंगल प्रभातने होते..

Auctions in market committees of Nashik district also stopped for fifth day
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांतील लिलाव पाचव्या दिवशीही ठप्प
Tungareshwar Protected Forest is in danger
तुंगारेश्वरचे संरक्षित वन धोक्यात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रदूषणकारी कारखाने व अतिक्रमण
village maps
गाव नकाशे नसल्याने मच्छीमारांचे अस्तित्व धोक्यात, पंचवीस वर्षांपासून प्रतीक्षा
trees Thane-Belapur industrial city
हरित पट्ट्याच्या मुळावर एमआयडीसी, २०० झाडांची कत्तल होणार, पर्यावरणवादी संस्थेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

खाडीकिनारी, सुंदर आणि मोकळे उद्यान, उद्यानामध्ये खुली व्यायामशाळा, कारंजे, शोभिवंत झाडे, हिरवळ आणि चालण्यासाठी ट्रॅक.. बच्चेकंपनीसाठी टॉय ट्रेन आणि घनदाट झाडांची साथ. विहार आणि व्यायाम करण्यासाठी असे ठिकाण प्रत्येकालाच हवेहवेसे वाटेल. मात्र वाढत्या नागरीकरणात अशी ठिकाणे दुर्लभ झाली आहेत. कळवा येथील नक्षत्रवनात मात्र या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. ‘कळवेकरांना लाभलेले नक्षत्र’ असेच या उद्यानाचे वर्णन करणे योग्य ठरेल. ठाणे आणि कळव्याला जोडणाऱ्या पुलावरून खाली आल्यावर उजवीकडे हे उद्यान असून सकाळी सहा वाजता नागरिकांसाठी ते खुले होते. स्वच्छ वातावरण, झाडांची दाटी, हिरवळीचे गालिचे आणि व्यायामासाठीची साधने यामुळे हे ठिकाण व्यायाम करणाऱ्यांना आकर्षित करते. त्यामुळे कळवा आणि ठाण्यातील अनेक नागरिक या मैदानावर भल्या पहाटे व्यायामासाठी पोहचतात.

आध्यात्मिक प्रभात..

उद्यानाच्या प्रवेशद्वारावर गणेश मंदिर आहे. त्यामुळे त्या विघ्नहर्त्यांच्या दर्शनाने नागरिकांची खऱ्या अर्थाने मंगल प्रभात होते. या मंदिरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी आरती केली जाते. पहाटेची सुरुवात अशा आध्यात्मिक वातावरणात झाल्याने पुढील दिवस चांगला जातो, असे येथे नियमित फिरायला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचे मत आहे.

योग, व्यायाम, खेळ आणि चालणे..

प्रत्येक जण आपापल्या आवडीनिवडीनुसार येथे व्यायाम करतात. काही जण चालतात. काही धावतात. काही जण वेगवेगळे खेळ खेळतात, तर काही योगसाधना. छोटी चटई अंथरून जागोजागी योग साधना करीत असलेले अनेक नागरिक येथे दिसतात. याशिवाय व्यायाम करण्यासाठी दोन व्यवस्था या मैदानाच्या आसपास आहेत. त्यामध्ये खुली व्यायामशाळा ही सर्वत्र प्रचलित असणारी सोय इथेही आहे. या ठिकाणच्या विस्तृत जॉगिंग ट्रॅकचा पुरेपूर वापर चालणारी आणि धावणारी मंडळी करतात. विशेष म्हणजे चालण्यासाठी तयार करण्यात आलेला ट्रॅक हा वाळूने तयार करण्यात आला आहे. खेळणाऱ्यांसाठी बंदिस्त मैदान असून त्यामध्ये वेगवेगळे खेळ खेळता येतात. जॉगिंग ट्रॅकच्या बाजूला हिरवळीवर बसण्यासाठी आसनांची व्यवस्था करण्यात आली आहे. दहा वर्षांखालील मुलांसाठी खेळण्यासाठी घसरगुंडी, झोपाळा, शिसॉसारखी खेळणीही उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवाय या मैदानाची देखभाल दुरुस्ती आणि सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कळवा खाडीचा उद्यानाला शेजार..

कळवा खाडीच्या किनाऱ्यालगतच हे उद्यान उभारण्यात आले आहे. त्यामुळे इथे सतत गारवा असतो. त्यामुळे अनेकदा ज्येष्ठ मंडळी येथे काही निवांत क्षण घालविण्यासाठी येतात. पहाटेच्या वेळी खाडीकिनाऱ्याचा गारवा आणि उद्यानातील हिरवळ पाहून अनेक जण येथे ध्यान करताना दिसून येतात.

शहरालगत असूनही भरपूर हिरवाई असलेला हा परिसर आहे. त्यामुळे निसर्गाचा मनमुराद आनंद घेत येथे व्यायाम करता येतो प्रत्येकाला हवे ते इथे मिळत असल्याने आम्ही समाधानी आहोत. या परिसरातील खुल्या व्यायामशाळेचे साहित्य वाढवावे, तसेच त्यांची योग्य देखभाल दुरुस्ती राखून हे साहित्य कायमस्वरूपी वापरायोग्य ठेवावे, इतकीच आमची अपेक्षा आहे. – वैशाली जाधव

कळवा खाडीलगत असलेल्या या भागात आम्ही गेल्या पाच वर्षांपासून येत असून वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, प्राणी आणि निसर्गातील निरनिराळ्या वनस्पतींचे दर्शन इथे घडते. त्यामुळे नेहमीच इथे यायला आवडते. शिवाय इथे स्वच्छता मोहीम राबवून मनाला समाधान मिळते. – अरविंद कांबळी, ज्येष्ठ नागरिक

उद्यानामुळे ज्येष्ठ नागरिकांना एकत्र भेटण्याचे चांगले ठिकाण उपलब्ध झाले आहे. वृद्धापकाळात आरोग्याचा तोल राखण्यासाठी येथील वातावरण आणि भोवतालच्या सुविधांची मदत होते. तसेच निसर्ग सान्निध्यात वेळ घालवल्याचे मोठे मानसिक समाधान मिळते.
 – अनघा खराडे