सागर नरेकर

गेल्या काही दिवसांत बॉलीवूड नृत्याचे वेड बोकाळल्याने पारंपरिक नृत्य प्रकार काहीसे मागे पडू लागले आहेत. मात्र काही संस्था शास्त्रीय नृत्य प्रकारांच्या प्रसार आणि प्रचाराचे काम अविरत करत आहेत. अंबरनाथ शहरात १० वर्षांपूर्वी स्थापन झालेली नृत्य कलांजली संस्था त्यापैकी एक. या संस्थेने शास्त्रीय नृत्याचे रीतसर प्रशिक्षण दिलेच, पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांना विविध ठिकाणी नृत्यासाठी व्यासपीठही उपलब्ध करून दिले आहे.

सध्या दूरचित्रवाणी वाहिन्यांवर नृत्यविषयक स्पर्धाचा सुळसुळाट झाला आहे. एकेरी, समूह, पाश्चात्त्य, सिनेसंगीत, लोकनृत्य आदी विविध प्रकारचे नृत्यप्रकार दररोज घरबसल्या पाहायला मिळतात. त्यात बहुतेकदा बॉलीवूड, हिप हॉप आणि इतर परदेशी नृत्य प्रकारांना पसंती देणारे अनेक स्पर्धक दिसतात. मात्र या गर्दीतही शास्त्रीय नृत्यप्रकार भाव खाऊन जातात. शास्त्रीय नृत्याला चित्रपटात स्थान नाही, हा समज अंबरनाथच्या नृत्य कलांजलीने खोटा ठरविला आहे. संस्थेचे संस्थापक रमेश कोळी यांनी हजारो विद्यार्थ्यांना शास्त्रीय नृत्य शिकवले आहे. अजूनही त्यांचे कार्य सुरू आहे. केवळ प्रशिक्षण न देता विविध व्यासपीठांवर विद्यार्थ्यांना नृत्य कला सादर करण्याची संधी ते देत आहेत.

रमेश कोळी यांनी भरतनाटय़म्चे रीतसर प्रशिक्षणघेतले. त्यानंतर व्यावसायिक नर्तक म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर त्यांनी अंबरनाथमध्ये नृत्यकलेचे धडे द्यायला सुरुवात केली. त्यातून नृत्य कलांजली या संस्थेचा जन्म झाला. संस्था भारतीय गंधर्व महाविद्यालयाशी संलग्न आहे.

अंबरनाथ शहर परिसरात शास्त्रीय नृत्य शिकण्याचे फारसे पर्याय नव्हते. नृत्य कलांजलीमुळे ही संधी उपलब्ध झाली. भरतनाटय़म, कुचीपुडी आणि पारंपरिक नृत्य शिकवण्याचे अवघड कार्य कोळी यांनी पार पाडले. डोंबिवली, कल्याण ते थेट कर्जतपर्यंतचे विद्यार्थी त्यांच्याकडे प्रशिक्षणासाठी येतात. त्यांच्या विद्यार्थ्यांत चार वर्षांपासून सत्तर वर्षांपर्यंतच्या व्यक्तींचा समावेश आहे. गेल्या दहा वर्षांत शेकडो विद्यार्थ्यांनी नृत्य कलांजलीमधून शिक्षण पूर्ण केले आहे. त्यातील बहुतेक कलाकारांनी विविध स्पर्धा, गाणी, चित्रपट, अल्बममध्ये आपली कला सादर केली आहे. अनेक मोठय़ा कार्यक्रमांमध्येही नृत्य कलांजली आणि रमेश कोळी यांनी सादरीकरण केले आहे. अंबरनाथ शहरात एखादा भव्य नृत्य महोत्सव साजरा व्हावा, अशी त्यांची इच्छा असून त्या दृष्टीने ते प्रयत्न करीत आहेत.

आयपीएल आणि समर्पण

आयपीएलच्या पहिल्या हंगामाचा शुभारंभ नृत्य कलांजलीच्या कलावंतांनी सादर केलेल्या भरतनाटय़म्ने झाला. त्यानंतर विविध स्पर्धामध्ये राज्याचे आणि देशाचेही प्रतिनिधित्व नृत्य कलांजलीने केले आहे. गेल्या काही वर्षांपासून ‘समर्पण’ या वार्षिक कार्यक्रमातून नृत्य कलांजलीचे विद्यार्थी आपली कला देशभरात पोहोचवत आहेत. त्यांनी बसविलेल्या रामायण या नृत्यनाटिकेचे बरेच कौतुक झाले.