कल्पेश भोईर

साईधाम कॉम्प्लेक्स, नायगाव पूर्व

सामाजिक बांधिलकी अनोख्या प्रकारे जोपसणारे संकूल म्हणजे नायगाव पूर्वेतील साईधाम कॉम्प्लेक्स. संकुलातील सर्व कुटुंब एकोप्याने राहत असून विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत. वृक्ष रोपण व संवर्धन, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिरे, पाणी वाचवा मोहीम अशा अनेक उपक्रम या संकुलाने राबवले आहेत.

समाज ही संकल्पना फार मोठी असली तरी एकमेकांच्या मदतीला एकमेकांच्या सुख-दु:खात प्रत्येकासोबत उभे राहणे, अशी प्राथमिक स्वरूपात असते. मग त्याची सुरुवात आपण राहत असलेल्या आजूबाजूच्या परिसरातूनच होत असते. केवळ एकोप्याने न राहता सामाजिक बांधिलकी अनोख्या प्रकारे जोपासणारे असेच गृहसंकुल आहे, ते म्हणजे नायगाव पूर्वेतील साईधाम कॉम्प्लेक्स. या संकुलात ९ विंग असून जवळपास २५०हून अधिक कुटुंब एकत्र राहतात. यामध्ये विविध जाती-धर्माच्या लोकांचा समावेश आहे.

२००२मध्ये स्थापन झालेले संकुल केवळ स्वत:पुरते मर्यादित न राहता परिसरातच सामाजिक काम करत नावारूपाला आलेले आहे. आपल्या संकुलाचे हित जपताना सामाजिक बांधिलकी जपली जावी हा विचार सदस्यांनी केला. यातूनच सोसायटीच्या सदस्यांची एकजूट झाली. विविध सण-उत्सव साजरे करण्यास, विविध उपक्रम राबवण्यास त्यांनी सुरू केली. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हे ब्रीदवाक्य घेऊन सुरुवातीला ६० झाडांचे रोपण व संवर्धन करण्यात आले आणि प्रत्येक वर्षी यांमध्ये २० झाडांनी वाढ होऊ  लागली. ‘स्त्रीभ्रूण हत्या टाळा’ हा उपक्रम सोसायटीच्या वतीने राबवण्यात आला. महिला सक्षमीकरण आणि महिला सबलीकरण चळवळ सोसायटीत चांगल्या प्रकारे राबवली जावी हा त्यामागे उद्देश आहे. सोसायटीसोबतच इतरांचाही विचार करत अनाथ मुलांसाठी सोसायटीतील कपडे जमा करून त्याचे वाटप दरवर्षी करण्यात येते. वृद्धाश्रमाला मदतीचा हात दिला जातो. गांधी जयंतीनिमित्ताने स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिरे, शाळकरी मुलांसाठी स्पर्धा, आगीच्या कोणत्याही घटना घडू नये यासाठी फायर फायटिंग ट्रेनिंग, पाणी वाचवा मोहीम असे अनेक उपक्रम राबवले जातात.

२००७ पासून गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली. सहा जणांनी केलेली सुरुवात शंभरीच्या आसपास पोहचली आहे. सोसायटीच्या आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर आणि सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्यामध्ये पार्किंग, खेळण्यासाठी मुलांना जागा अशा अनेक गोष्टी या सोसायटीमध्ये आहेत.

दरवर्षी सोसायटीमध्ये होणाऱ्या १५ ऑगस्ट व २६ जानेवारीच्या निमित्ताने पोलीस आणि निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांना ध्वजारोहण करण्याचा मान देण्यात येतो. सोसायटीतील प्रत्येक कार्यक्रम आम्ही सर्वजण एकत्रित येऊन साजरा करतो. महिलांचे जे काही प्रश्न असतील तेही आमच्या महिला मंडळाच्या वतीने सोडवण्याचा प्रयत्न करतो. सोसायटीतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात, असे संकुलाच्या महिला प्रमुख ताराराणी शेट्टी यांनी सांगितले.

मी व माझे सहकारी मित्र सोसायटीमध्ये विविध उपक्रम राबवण्यासाठी नेहमीच सक्रिय असतो. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले या सर्वाचा चांगला सहभाग लाभल्यामुळे आमच्या सोसायटीतील इतर कामे आणि उपक्रम चांगल्या प्रकारे राबवू शकतो. आमची सोसायटी आदर्श सोसायटी बनवण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असे साईधाम सोसायटीचे उपाध्यक्ष किरण जाधव यांनी सांगितले.

भविष्यात या संकुलाला अनेक उपक्रम राबवायचे आहेत. महिला सक्षमीकरण, ओला आणि सुका कचऱ्याच्या नियोजनासाठी डब्बे वाटप, अनाथ मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आदी उपक्रम राबवायचे आहेत. सोसायटीची असलेली एकता कायम टिकून राहावी, असा सर्व सदस्यांचा प्रयत्न आहे. या सोसायटीने जोपासलेले सर्वधर्मसमभाव हे मूल्य खऱ्या अर्थाने या सोसायटीच्या एकतेची ओळख करून देणारे आहे.