22 September 2020

News Flash

वसाहतीचे ठाणे : ‘ब्लॉक’संस्कृतीला माणुसकीची दारे

कल्याण पश्चिम विभागातील लाल चौकी परिसरात आग्रा रोडवर सिल्व्हर रेसिडेन्सी हे संकुल आहे.

सिल्व्हर रेसिडेन्सी, आग्रा रोड, लालचौकी, कल्याण (प.)

सिल्व्हर रेसिडेन्सी, आग्रा रोड, लालचौकी, कल्याण (प.)

शहरातील मोठमोठय़ा संकुलात अनेक सोयी-सुविधा उपलब्ध असतात. मात्र बंद दाराच्या पलीकडे आपल्या शेजारी कोण राहते याची कल्पनाही अनेकांना नसते. कल्याणमधील सिल्व्हर रेसिडेन्सी मात्र त्याला अपवाद आहे. पंधरा-वीस वर्षांपूर्वी उभ्या राहिलेल्या या संकुलातील रहिवासी सामाजिक बांधिलकी जपत, पर्यावरणाचे संवर्धन करीत एकोप्याने राहत आहेत..

कल्याण पश्चिम विभागातील लाल चौकी परिसरात आग्रा रोडवर सिल्व्हर रेसिडेन्सी हे संकुल आहे. लाल चौकी हा वाहनांच्या वर्दळीने गजबजलेला परिसर; मात्र आग्रा रोडने पाच मिनिटे चालत गेलो की आपण सिल्व्हर रेसिडेन्सीमध्ये येतो. रेसिडेन्सीची कमान पार करताच नीरव शांतता तुमचे स्वागत करते. गजबजलेल्या शहरात अशी शांतता दुर्मीळच. त्यामुळे मन प्रसन्न होते. सात मजल्यांच्या या इमारतीत ए, बी, सी अशा तीन विंग असून एकूण ९८ सदनिका आहेत. प्रत्येक विंगची कमिटी ही वेगवेगळी असून त्यांचा कारभार स्वतंत्र आहे. सार्वजनिक उत्सवात; मात्र संकुलातील सारेजण एकत्र असतात. २००० मध्ये साधारणत: या संकुलाचे बांधकाम पूर्ण झाले आणि शहराच्या कानाकोपऱ्यातून सर्व जाती धर्माचे, पंथाचे रहिवासी येथे राहायला आले.

सुरुवातीला हा परिसर अविकसित होता. सोसायटीच्या समोर पडीक जागेवर कचरा टाकला जायचा, रस्त्यावर कुठेही वाहने उभी केली जायची. रस्त्यावर विजेचे खांब नसल्याने रात्री-अपरात्री प्रवास करण्यास नागरिकांना भीती वाटत असे; मात्र रहिवाशांनी प्रत्येक कुटुंबातून निधी जमवून या जागेचे स्वरूप पालटून टाकले.

सोसायटीच्या आवारात वाहन उभे करण्यासाठी पुरेसी जागा आहे. तसेच मुलांना खेळण्यासाठी पाठीमागे बगिचाही उभारण्यात आला आहे. यामध्ये मुलांसाठी विविध खेळणी लावण्यात आली आहेत. येथेच ज्येष्ठांना बसण्यासाठी बाकडे बसविण्यात आली आहेत. जवळच दुर्गाडी किल्ला व गणेशघाट असल्याने सकाळ- संध्याकाळ फेरफटका मारण्यासाठी नागरिक तिथेही जातात. गेल्या दोन वर्षांत लोकप्रतिनिधी मोहन उगले यांनी सोसायटीच्या आवारातील रस्त्याचे डांबरीकरण करून दिले असून त्यावर विजेचीही सोय उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती सुभाष वैद्य यांनी दिली.

पर्यावरणाचे संवर्धन

पर्यावरणाचा होणारा ऱ्हास पाहता आपण काही देणे लागतो हे येथील लोकांनी जाणले आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली. गणेशोत्सवापासून याची सुरुवात झाली. गेल्या वर्षी गणेशोत्सवात सोसायटीमध्ये घरोघरी बसविले जाणारे गणपती हे कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात आले. सोसायटीच्या आवारातच कृत्रिम तलाव तयार करण्यात आला होता. सोसायटीमधील  ७० टक्के घरगुती गणपतींचे याच तलावात विसर्जन केले गेले. या तलावातील माती नंतर सोसायटीच्याच बगिच्यामध्ये वापरण्यात आली. यासोबतच झाडे लावण्याचा उपक्रमही सोसायटीने राबविण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात आंबा, पेरु, औदुंबर, सुरुची, बांबू, नारळ, निलगिरी, पळस, गुलमोहर, पिंपळ, प्राजक्त, कडुलिंब अशा प्रकारची ५० झाडे रहिवाशांनी लावली. यंदाही ५० झाडे लावण्याचा त्यांचा संकल्प आहे. वृक्षांना वेळेत पाणी, खत घालणे, त्यांची छाटणी, पालापाचोळ्याची साफसफाई आदी कामांसाठी एका माळ्याची नेमणूक सोसायटीने केली. माळ्याच्या अनुपस्थितीत सोसायटीमधील नागरिकही झाडांना पाणी घालणे, निगा राखणे अशी कामे करतात.

यंदा पावसाळी सहल

संकुलात १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे राष्ट्रीय सण साजरे केले जातात. त्यासोबतच दिवाळीत सोसायटीच्या संपूर्ण परिसरात दीपोत्सव करून एकमेकांना फराळ दिला जातो. विविध जातीधर्माचे लोक येथे राहात असल्याने इतर धर्मीय सणही साजरे होतात. होळी, भोंडला, धुलिवंदन, जैन धर्मीयांचे काही पर्व येथे साजरे केले जातात. यंदा पावसाळी सहल काढण्याचाही रहिवाशांचा विचार असल्याची माहिती शरदचंद्र खेडेकर यांनी दिली.

ज्येष्ठांनी केली मंदिराची स्थापना

सोसायटीच्या आवाराबाहेर एक पडीक जागा होती, तिथे पूर्वी होळी साजरी केली जात असे, परंतु या जागेवर नागरिक कचरा टाकत होते. त्यामुळे या जागेचा सदुपयोग करण्याचा निर्णय येथील ज्येष्ठ नागरिकांनी घेतला. रहिवाशांनीच निधी जमा करून इथे दक्षिणाभिमुखी मारुतीचे मंदिर बांधले. या परिसराचे स्थानिक लोकप्रतिनिधी मोहन उगले यांनी या सर्व मंडळींना साथ देत मंदिरासाठी पाणी व वीज उपलब्ध करून दिली. या मंदिरातील देखभालीची सर्व कामे अशोक वखडकर व प्रदीप व्यास करतात. या मंदिराच्या आवारात विविध प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत.

उघडा नाला आणि कचराभूमीचा त्रास

सोसायटीच्या पाठीमागे एक मोठा नाला असून तो उघडा आहे. या नाल्याच्या दरुगधीचा सामना नागरिकांना रोज करावा लागतो. तसेच तो पालिकेकडून साफ केला जात नसल्याने पावसाळ्यात तो तुंबण्याची शक्यता असते. नाला उघडाच असल्याने त्यामध्ये कधीकधी नागरिक पडण्याचीही भीती असते. हा नाला पालिका प्रशासनाने बंद करावा अशी मागणी येथील नागरिक करतात. तसेच संकुलापासून हाकेच्या अंतरावर आधारवाडीची कचराभूमी आहे. ही कचराभूमी बंद व्हावी अशी स्थानिक रहिवाशांची मागणी आहे. सोसायटीच्या मागे फडके मैदान आहे. या मैदानाच्या एका बाजूला पालिकेच्या वाहनांचे गॅरेज आहे. या गॅरेजमध्ये मोडकळीस आलेली वाहने, वाहनांचे टायर मोठय़ा प्रमाणात साचवून ठेवलेले आहेत. त्यामध्ये पावसाळ्यात पाणी साचून डेंग्यूचा फैलाव होण्याची शक्यता नागरिक व्यक्त करतात. त्यामुळे इथे नियमित स्वच्छता व्हावी, अशी अपेक्षा प्रदीप व्यास यांनी व्यक्त केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2017 3:30 am

Web Title: article about silver residency in kalyan
Next Stories
1 भाज्या महागच..
2 महिलांच्या तक्रारींबाबत तपासासाठी पोलीस ठाण्यात स्वतंत्र कक्ष
3 रानमेव्यासाठी स्वतंत्र बाजार
Just Now!
X