सिंधुदुर्ग रहिवासी संघटना-अंबरनाथ
मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यत राहणाऱ्या रहिवाशांनी एकत्र येऊन अंबरनाथ शहरात स्थापन केलेल्या सिंधुदुर्ग रहिवासी संघटनेने गेल्याच आठवडय़ात रौप्य महोत्सवी टप्पा पार केला. आज दोन कोटींचे भांडवल असलेली पतपेढी, सिंधुदुर्ग बाजार, मालवणी महोत्सव, सिंधुदुर्ग विद्यामंदिर अशा अनेक माध्यमांतून ही संस्था अंबरनाथच्या सांस्कृतिक, सामाजिक जडणघडणीत मोलाचे योगदान देत आहे.
परक्या मुलखात आपल्या माणसांचा नेहमीच आधार वाटत असतो. शहरांमध्ये निरनिराळ्या रहिवासी संघटना स्थापन होण्यामागे हीच प्रेरणा असते. अंबरनाथ शहरातही मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात राहणाऱ्या रहिवाशांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या सिंधुदुर्ग रहिवासी संघटनेने गेल्याच आठवडय़ात रौप्य महोत्सवी टप्पा पार केला. २६ जानेवारी १९८७ रोजी संस्थेची रीतसर स्थापना झाली. अंबरनाथच्या वडवली विभागात असलेल्या साटम महाराज मंदिरात संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली. नियमितपणे भेटून एकमेकांची ख्याली खुशाली विचारावी, सहकाराच्या माध्यमातून उत्कर्ष साधावा ही संस्थेची उद्दिष्टे होती. दोनच वर्षांनंतर पतपेढी सुरू करून संघटनेने त्यादृष्टीने पहिले पाऊल टाकले. १९८९ च्या दसऱ्याला रहिवासी संघटनेचे एक सदस्य अप्पा धुरी यांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी सिंधुदुर्ग नागरी रहिवासी संघटनेची स्थापना झाली. सुरुवातीच्या काळात अवघे ५० हजार रुपये भाग भांडवल असलेल्या या पतपेढीचे भांडवल आता दोन कोटींच्या घरात गेले आहे. गेल्या २५ वर्षांत पतपेढीने केलेली कामगिरी नेत्रदीपक अशीच म्हणावी लागेल. कारण १९ कोटी रुपयांचे कर्जवाटप, २५ कोटींच्या ठेवी, ९ कोटी रुपयांची गुंतवणूक असणाऱ्या या पतपेढीने रौप्य महोत्सवी वर्षांत ५५ लाख रुपयांचा नफा मिळवला. ‘एनपीए अर्थात नॉन परफॉर्मिग असेटस्’चे प्रमाण अवघे ०.२३ इतके आहे. एका सभासदाच्या घरात सुरू झालेल्या या पतपेढीचे आता एका वटवृक्षात रूपांतर झाले आहे. अंबरनाथ येथे केंद्रीय कार्यालय असणाऱ्या पतपेढीच्या उल्हासनगर आणि बदलापूर येथे शाखा कार्यरत आहेत. या पतपेढीने महिला बचत गटांना मोठय़ा प्रमाणात सहकार्य केले. आतापर्यंत तीन हजार महिलांना चार कोटी रुपयांचे अर्थ सहकार्य केले आहे. सिंधुदुर्ग महिला गट योजना राबवून पतपेढी महिलांना रोजगार व व्यवसायाभिमुख प्रशिक्षणही उपलब्ध करून देत आहे.
सिंधुदुर्ग बाजार
धान्य, किराणा आणि गृहपयोगी वस्तू किफायतशीर दरात उपलब्ध करून देण्यासाठी सिंधुदुर्ग पतपेढीने सिंधुदुर्ग बाजार सुरू केला. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारी ही जिल्ह्यातील एकमेव पतपेढी होती. हजारो रहिवाशांनी या सुविधेचा लाभ घेतला. सलग चार वर्षे ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर हा उपक्रम राबविण्यात आला. पुढील काळात शासनाच्या धोरणामुळे पतपेढीला हा बाजार बंद करावा लागला. मात्र त्याची उपयुक्तता लक्षात घेऊन संघटनेच्या माध्यमातून हा उपक्रम पुन्हा सुरू करण्याचा विचार सुरू आहे.
मालवणी महोत्सव
गेल्या दशकभरात शहरी विभागात मालवणी खाद्यपदार्थ, मसाले तसेच कोकणच्या मातीतील सांस्कृतिक कार्यक्रम भलतेच लोकप्रिय होऊ लागले आहेत. अंबरनाथमध्येही संघटनेच्या माध्यमातून जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात मालवणी महोत्सव आणि सभासदांचे स्नेहसंमेलन आयोजित केले जाते. खास मालवणी पद्धतीचे सुग्रास भोजन, सांस्कृतिक कार्यक्रम असे या महोत्सवाचे स्वरूप असते. गेली काही वर्षे या महोत्सवानिमित्ताने संघटनेने गाजलेली दशावतारी नाटके आयोजित करून अंबरनाथमध्ये कोकणातील अस्सल कलेचे दर्शन घडविले आहे.  
सिंधुदुर्ग विद्यामंदिर
शहरातील शाळांची कमतरता लक्षात घेऊन संघटनेने ‘मागेल त्याला प्रवेश’ या तत्त्वावर पहिली ते चौथीपर्यंतची सिंधुदुर्ग विद्यामंदिर ही शाळा सुरू केली होती. या शाळेस स्थानिक नागरिकांचा चांगला प्रतिसाद होता. मात्र शासनाच्या मराठी शाळांबाबतच्या उदासीन धोरणामुळे नाइलाजाने सहा वर्षांनंतर शाळा बंद करावी लागली. शाळेचा उपक्रम बंद करताना कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता संस्थेने घेतली.   
जिजामाता शिक्षण निधी
हल्ली दहावीपर्यंतच्या शिक्षणासाठी फारसा खर्च येत नसला तरी उच्च शिक्षण महागडे असून तो खर्च सर्वसामान्यांना परवडत नाही. प्रचलित शिक्षण क्षेत्रातील हे वास्तव लक्षात घेऊन संघटनेच्या कार्यक्षेत्रातील सिंधुदुर्गवासीय विद्यार्थ्यांसाठी जिजामाता शिक्षण निधी स्थापन करण्यात आला आहे. गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात त्याद्वारे मदत केली जाते. या योजनेअंतर्गत संस्थेकडे सध्या एक लाख रुपयांचा निधी आहे. पुढील वर्षांत तो दोन लाख रुपये करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अशा स्वरूपाची मदत मिळविण्यासाठी गरजू विद्यार्थ्यांच्या पालकांना जून-जुलै महिन्यात संघटनेकडे अर्ज करावा लागतो. संघटनेतील सभासद तसेच उद्योजकांनी मोठय़ा प्रमाणात या योजनेस हातभार लावावा, असे आवाहनही कार्यकारिणी मंडळाने केले आहे. दहावी, बारावी, पदवी अथवा अन्य शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या संघटनेतील सदस्यांच्या पाल्यांचा जाहीर कार्यक्रमात पारितोषिक देऊन कौतुक केले जाते. लवकरच संघटनेच्या वतीने स्पर्धा परीक्षाविषयक मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.
आरोग्य आणि स्वास्थ्य
संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी शहरात नियमितपणे आरोग्य शिबिरे आयोजित केली जातात. डॉ. दीपक होनाळे यांचा याकामी पुढाकार असतो. त्याचप्रमाणे वडवली येथे सिंधुदुर्ग हेल्थ क्लब ही अद्ययावत व्यायामशाळा सुरू केली आहे. सध्या पाचशे सभासद नियमितपणे या व्यायामशाळेचा लाभ घेतात. व्यायाम आणि शरीरस्वास्थ्य याविषयी जनजागृती व्हावी या हेतूने संघटनेने शरीर सौष्ठव स्पर्धाही भरवल्या होत्या. सध्या सदानंद चव्हाण संघटनेचे तर जी. एम. पाटील पतपेढीचे अध्यक्ष आहेत.
कलामंच
संघटनेतील सदस्यांच्या मुला-मुलींच्या कलागुणांना प्रोत्साहन तसेच व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सिंधुदुर्ग कलामंचाची स्थापना करण्यात आली आहे. दरवर्षी होणाऱ्या स्नेहसंमेलनात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतून ते आपली कला सादर करीत असतात. संघटनेतील ज्ञानेश्वर धुरी आणि रमेश कदम कलामंचची जबाबदारी सांभाळतात.
प्रशांत मोरे