01 March 2021

News Flash

शाळेच्या बाकावरून : हौसला बुलंद है!

समाजातील काही व्यक्ती ध्येय निश्चित करून परिश्रमपूर्वक वाटचाल करतात आणि ध्येय पूर्ण करण्यात यश प्राप्त करतात.

| March 17, 2015 12:14 pm

tvlogसमाजातील काही व्यक्ती ध्येय निश्चित करून परिश्रमपूर्वक वाटचाल करतात आणि ध्येय पूर्ण करण्यात यश प्राप्त करतात. ठाण्यातील हरकिशन इंग्लिश हायस्कूलच्या संस्थापिका तेजींदर कौर यांची वाटचाल याच स्वरूपाची आहे.
शिक्षकी पेशाविषयी प्रचंड आकर्षण असलेल्या कौर मॅडमनी १५-१६ र्वष ठाण्यातील अनेक शाळांमधून अध्यापन केले. पण समाजातील आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील मुलांसाठी शाळा काढण्याचे ध्येय त्यांना खुणावत होते. त्यांच्या घरातून समाजासाठी आपण काहीतरी करायला हवे हे संस्कार त्यांच्यावर झाले होते. अखेर ९४ साली आंबेडकर रोड येथे हरकिशन इंग्लिश हायस्कूल शाळा सुरू केली, ती गरीब मुलांना शिक्षणाच्या माध्यमातून आत्मनिर्भर करण्याच्या विचाराने!
९४ साली शाळा सुरू झाल्यावर काही काळ त्यांनी एकटय़ाने सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या. तीन वर्षांतच इ. १ली ते इ. ६वी पर्यंतच्या वर्गामधून तीनशेच्या वर मुले झाली. २०१२ साली ही शाळा लोकपुरमजवळील नळपाडा परिसरात भरू लागली. शाळा चाळसदृश वास्तूमध्ये भरते, पण त्या छोटय़ाशा जागेचा पुरेपूर वापर विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी त्या करतात. या शाळेतील पालक अशिक्षित, काहींना तर फॉर्मही भरता येत नाहीत. त्यामुळे सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात खंबीरपणे उभं राहण्यासाठी मुलांना घडवण्याचा त्या कसोशीने प्रयत्न करतात. विद्यार्थ्यांना पोषक वातावरण मिळावे म्हणून वर्षभर त्या शाळेत अनेकविध उपक्रम, कार्यक्रम केले जातात. या शाळेत सध्या छोटा शिशू ते दहावी इयत्तेमध्ये २४३ विद्यार्थी शिकत आहेत. समाजातील सुहृदांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी शाळेत संगणक कक्ष, प्रयोगशाळा, वाचनालय याबरोबर ळएउऌ ठएळ प्रकल्पही राबवला जातो. इंग्रजी संभाषण वर्गही सुरू आहेत.
विशेषत्वाने नमूद करण्याजोगी बाब म्हणजे दर शनि. ११.३० ते २.३० हा वेळ मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी राखून ठेवण्यात आला आहे. या वेळेत संगीत, वक्तृत्व, वादविवाद, निबंध लेखन इ. विषयांचे तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाते. दर शनिवारी थोडा वेळ विज्ञान विषयासाठी दिला जातो. फिल्म, एखादे प्रात्यक्षिक, पुस्तकं इ. माध्यमातून विज्ञान विषयाशी मुलांना जोडले जाते आणि त्या विषयाचे दडपण वाटणार नाही या दृष्टीने प्रयत्न केला जातो.
सामाजिक संस्थांच्या मार्गदर्शनाखाली पक्षी निरीक्षण, फुलपाखरू उद्यानाला भेट, निसर्ग उद्यान, बायोगॅस प्लांट, गांडूळखत प्रकल्प इ. ठिकाणी शाळा मुलांना आवर्जून घेऊन जाते. पर्यावरण दक्षता मंच संस्थेच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी २० ते २५ झाडे लावून त्याची काळजी घेण्याची जबाबदारी पार पाडत आहेत. मुलांना अनेकविध स्पर्धातून सहभागी होण्यास प्रोत्साहन दिले जाते.
अभ्यासाबरोबर तेजींदर कौर विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षणही देतात. कागदाच्या लगद्यापासून शोभिवंत गोष्टी, मुखवटे, पायपुसणी तयार करणे, साबण तयार करणे इ. गोष्टींचे प्रशिक्षण त्या देतात. त्यासाठी त्यांनी स्वत: कोर्सेस केले आहेत. दर आठवडय़ाला योगविषयक प्रशिक्षणाचाही तास असतो. शाळेतील विद्यार्थ्यांना दहावी उत्तीर्ण होणे सोपे जावे म्हणून शाळेतर्फे विशेष मार्गदर्शन केले जाते. समाजातील कष्टकरी पालकांच्या मुलांसाठी शाळा काढणे आणि ती चालवणे हे एक आव्हान असते. कारण अनेक समस्यांना सतत तोंड द्यावे लागते. पण वयाच्या ६० व्या वर्षीदेखील कौर मॅडमचा उत्साह, शिकवण्याची आवड तरुण शिक्षकांना प्रेरणा देणारी आहे. वेळ मिळेल तेव्हा विद्यार्थ्यांना त्या पाककृतीही शिकवतात, चांगली पुस्तके, कविता, लेख वाचून दाखवतात.
सुखाची नोकरी सोडून दुर्बल घटकातील मुलांसाठी शाळा काढण्याची प्रेरणा कौर मॅडमच्या भावाने दिली. आंबेडकर रोडवरील छोटय़ा जागेत ५० मुलांना घेऊन शाळा सुरू झाली आणि आंबेडकर रोड, राबोडी, नितीन कं., उथळसर येथील वस्त्यांमधील मुलांसाठी ही शाळा वरदान ठरली. अनेक अडचणींना तोंड देत त्यांनी एकहाती शाळा चालवली, पुढे मग सहकारी मिळत गेले आणि आता तर त्यांची मुलगीही त्यांना सहकार्य करीत आहे. कौर मॅडमना रस्त्यावरील अनाथ, बेघर मुलांसाठी शाळा काढायचे स्वप्न खुणावत आहे, शाळेपुढेही अनेक प्रश्न आहेत, पण तरीही त्या निराश होत नाहीत. कौर मॅडम का हौसला बुलंद है! 
हेमा आघारकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2015 12:14 pm

Web Title: article about tejinder kaur founder of the harkrishan english high school
Next Stories
1 तुमची प्रतीक्षा शीतल होवो..
2 ठाणे.. काल, आज, उद्या : पोर्तुगीजांच्या वास्तुखुणा
3 ठाण्यातील स्वागतयात्रेमध्ये यंदा ४५ चित्ररथांचे आकर्षण
Just Now!
X