कोलमडलेल्या आजारी मनाला देशी

साथ ही दुर्दम्य इच्छाशक्तीची

स्वमदत गटाशी जुळता मैत्री

फिनिक्स पक्ष्यापरी घे तू उंच भरारी!

राखेतून भरारी मारणारा तो फिनिक्स पक्षी! अशी कल्पना आहे, स्किझोफ्रेनिया/ छिन्नमनस्कता आजार त्या रुग्णाचे भावविश्वच नव्हे तर शिक्षण, करिअर, सर्वच गोष्टींवर छिन्नविच्छिन्न करीत असतो. त्या राखेतून, त्या अवस्थेतून बाहेर येऊन पुनर्वसनाकडे जाण्याची, शुभार्थी बनण्याची अवस्था म्हणजे फिनिक्सभरारी!

स्किझोक्रेनियाच्या आजाराचा परिणाम म्हणून एक प्रकारचे रिकामपण, आळस, समाजविन्मुख अवस्था, भावनाशून्यता असे नकारात्मक परिणाम (रुग्णावर) शुभार्थीवर झालेला असतो. औषधांबरोबरच त्यामुळे त्यांना पुनर्वसनाची गरज असते. त्यांना समाजात पुन्हा साथ मिळवून देण्याची गरज असते. या त्यांच्याविषयीच्या आंतरिक तळमळीतून, इच्छाशक्तीतून डॉ. अद्वैत पाध्ये यांनी अशा स्वमदत गटाची सुरुवात केली. शुभंकरांचा स्वमदत गट सुरू होऊन सहा महिने झाल्यानंतर १५ ऑगस्ट २००८ रोजी शुभार्थीनी आजारातून ‘स्वातंत्र्या’च्या दिशेने पाऊल टाकण्यास सुरुवात केली आणि ‘फिनिक्स’ स्वमदत गटाची सुरुवात झाली. त्यासाठी गीता मोंडकर यांनीदेखील मोलाचे सहकार्य केले.

सुरुवातीला सहा-सात वर्षांपूर्वी अगदी चार-पाच शुभार्थीनी सुरू झालेल्या या गटात आता २८-३० शुभार्थी रोज येतात. नावाप्रमाणेच हा गट आता हळूहळू उंच भरारी घेण्याकडे पंख पसरत आहे. आता हा आमचा गट न राहता जणू एक छोटा परिवारच तयार झाला आहे. जिथे शुभार्थी आपला आनंद, दु:ख हक्काने, मोकळेपणाने व्यक्त करतात.

आमचा हा स्वमदत गट दररोज सोमवार ते शुक्रवार दुपारी १.३० ते ५ या वेळेत मानस सायकॉलॉजिकल हेल्थ सेंटर गौतमेश्वर धाम, तिसरा मजला, टंडन रोड, डोंबिवली (पूर्व) येथे चालतो.

दीड वाजता आल्यावर आमच्या योगशिक्षिका रेखा जोशी यांच्याकडून ओमकार, योगासने, सूर्यनमस्कार प्राणायाम/ दीर्घश्वसन हे शुभार्थीच्या शारीरिक व मानसिक कुवतीनुसार करून घेतात. त्यानंतर मनाला उभारी येण्यासाठी समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक, योगावरची गाणी असा एक तासाचा उपक्रम चालतो. याचाच परिणाम म्हणून मध्यंतरी स्वामी विवेकानंदांच्या १५०व्या जयंतीदिनी डोंबिवलीत ५००० जणांनी सामूहिक सूर्यनमस्कार घातले तेव्हा त्यात आमचेही १०-१२ शुभार्थी सामील होते! व अत्यंत सफाईदारपणे, धीटपणे सादर करीत होते!

नंतर अडीच ते साडेतीन या वेळेत ‘पोळीभाजी’ केंद्र वा अन्य दुकानांसाठी कागदी पिशव्या बनवल्या जातात. रोज साधारणपणे तीन-चार किलो पिशव्या (१ केजी = २२० नग) बनवल्या जातात. त्यासाठी लागणारी खळही शुभार्थीच बनवतात. पिशव्या बनवताना कंटाळा येऊ नये म्हणून सीडी प्लेअरवर मराठी, हिंदी, जुनी-नवी गाणी, ओमकार, श्लोक, भक्तिगीते लावली जातात.

साडेतीन वाजता पिशव्यांचे काम झाल्यावर पाच वाजेपर्यंत दर दिवशी छोटे उपक्रम दिले जातात. जसे कोडी सोडविणे, गणिते सोडवणे (हिशेबासाठी). गोष्टी लिहिणे वगैरे. दर मंगळवारी खेळ (गेम्स) खेळायला वेळ असतो. पत्ते, कॅरम, दर शुक्रवारी चित्रे/ पेंटिंग, शुभार्थीच फळ्यावर चित्रे काढतात. आमच्या संस्थेत दोन शिलाई मशीन व पिठाची गिरणी आहे. शिलाई मशीनवर शुभार्थी पिशव्या, फोल्डर, पर्सेस, अ‍ॅप्रन शिवतात. नयना केळुस्कर त्यासाठी त्यांना मार्गदर्शन करतात. ‘पूर्णान्न’ हे वेगवेगळ्या डाळी, दाणे, धान्य भाजून सर्व वयोगटांसाठी पौष्टिक पीठ आम्ही तयार करतो. त्यासाठी धान्य भाजून, दळून, वजन करून पिशव्या भरण्याचे व पॅक करण्याचे सर्व काम शुभार्थीच करतात. सणानुसार राख्या, कंठी, तोरणे, पणत्याही बनवल्या जातात.

शुभार्थीसाठी नाममात्र शुल्क घेऊन वाचनालयही चालू केले आहे. जेणेकरून त्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी. त्यासाठी त्यांना एक नोंदवही तयार करण्यास सांगितली आहे, ज्यात त्यांनी कोणते पुस्तक वाचले, काय वाचले, सारांश असे ते नमूद करतात.

गेल्या दीड वर्षांपासून आम्ही त्यांचे त्रमासिक पण सुरू केले आहे. त्यांना विषय दिला जातो व त्यावर लेख, चित्र, माहिती लिहायला सांगतो. त्यांचे हस्तलिखित वा कधी संगणकावर टायपिंग वगैरे करतो. (शुभार्थीच) करतात. आतापर्यंत गुरुपौर्णिमा, ऋतू, पावसाळा संवाद, मैत्री, सिनेमासृष्टीची १०० वर्षे वगैरे विषयांवर ‘मनोगत’ त्रमासिके झाली आहेत.

वर्षभरातले सणही साजरे करतो. १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात त्यांची सहल दर वर्षी एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी नेतो.

एकाकीपणा, भीती, संशय, गमावलेला आत्मविश्वास या लक्षणांवर स्वमदत गटाच्या साह्य़ाने मात करून आज अनेक शुभार्थी वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीसुद्धा करीत आहेत, जीवनात स्थिरावत आहेत. म्हणून म्हणावेसे वाटते.

ज्योतीने ज्योत लावत जाऊनी

मनातला तिमिरही दूर करोनी

एकमेका बळ देऊन साहाय्य करोनी

सारा आसमंत टाकू उजळुनी!

-राजश्री जोशी